तुमच्या वडिलांना इतर देशांनी जरी क्लीन चिट दिली असली तरी त्याचं आयुष्य भ्रष्टाचारी म्हणून संपलं, असं पंतप्रधान मोदी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना उद्देशून म्हणाले. शनिवारी उत्तर प्रदेशात एका सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यालाच प्रत्युत्तर म्हणून रविवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी टिका केली आहे.
‘मिस्टर क्लीन’ असा कार्यकाळ ठेवणा-या तुमच्या वडिलांचा शेवट ‘भ्रष्टाचारी नंबर-वन’ च्या रूपात झाला होता, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच राफेलप्रकरणी काँग्रेसकडून सातत्याने लक्ष्य केले जात असल्याने, काँग्रेस जाणीवपुर्वक आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही मोदींनी केला आहे.
उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील प्रचारादरम्यान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, राहुल गांधींनी एका मुलाखतीत हे मान्य केले आहे की ते मोदींचा पराभव तोपर्यंत करू शकत नाहीत, जोपर्यंत मोदींच्या कष्ट, इमानदारी व देशभक्तीवर डाग लागत नाही. तर दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींचे नाव न घेता राहुल गांधींना उद्देशून मोदी म्हणाले की, तुमच्या वडिलांना तुमच्या नेत्यांनी मोठा गाजावजा करत मिस्टर क्लीन बनवले होते. मात्र, पाहता पाहता त्यांचा शेवट भ्रष्टाचारी नंबर वन च्या रूपात झाला. नामदार हा अहंकार तुम्हाला संपवून टाकेल. हा देश चुकांना माफ करतो पण धोकेबाजी कधी माफ करत नाही. तर काँग्रेसवर निशाणा साधत मोदी म्हणाले की, जी पार्टी पहिल्या टप्प्यातील मतदाना अगोदरच स्वतःला पंतप्रधान पदाचा दावेदार मानत होती, ती आता हे मान्य करू लागली आहे की आपण तर उत्तर प्रदेशात केवळ मत खाण्यासाठी निवडणूक लढवत आहे. आज काँग्रेसची जी अवस्था झाली आहे ते याचे जीवंत उदाहरण आहे.
दरम्यान, मोदी जी, लढाई संपलेली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतेय. तुमची तुमच्याबद्दलची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नाही, असा पलटवार राहुल गांधी यांनी मोदीवर केला आहे. तर एका अनियंत्रित सनकी व्यक्तीने स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्माचा अपमान केला आहे, अशा कडक शब्दांत प्रियंका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.