YouTuber Ajeet Bharti Casteist Posts Against CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर अजीत भारती याला नोएडा सेक्टर ५८ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत. सरन्यायाधीशांवर न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेवर अजीत भारती याने वादग्रस्त व चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. अजीत भारती हा उजव्या विचारसरणीचा युट्यूबर बऱ्याचदा समाजमाध्यमांवरून भाजपाचा प्रचार करताना दिसतो. यावरून आम आदमी पार्टीने भाजपावर टीका केली आहे.
पंजाब सरकारमधील आपचे मंत्री हरपाल सिंग चिमा यांनी चंदीगडमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत या घटनेचा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले, भाजपा देशभर दलितविरोधी भावना पेरण्याचं काम करतेय.
राकेश किशोर यांच्याविरोधात बंगळुरूत गुन्हा दाखल
दुसऱ्या बाजूला, सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेप्रकरणी बंगळुरूमधील (कर्नाटक) एका व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बंगळुरू पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे राकेश किशोर (यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता) या वकिलाविरोधात गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आलं आहे.
अजीत भारतीविरोधात १२ ते १५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावरील गुन्ह्यांची संख्या वाढू शकते कारण पोलीस अजूनही याप्रकरणी कारवाई करत आहेत. या प्रकरणात इतर २८ आरोपींचाही समावेश आहे. ज्यामध्ये अनेक सोशल मीडिया हँडल्स व पोस्ट्सची पोलिसांनी यादी तयार केली आहे. हिंदुस्तान टाइम्सने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यापैकी अनेक आरोपी हे पंजाब व दिल्लीच्या बाहेरचे आहेत. त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे की जातीवाचक पोस्ट करण्याऱ्यांमध्ये अजीत भारती व इतर इन्फ्लुएन्सर्स, काही राइट-विंग पोर्टल्सशी (उजव्या विचारसरणीचा प्रचार करणारी संकेतस्थळं) संबंधित लोक आहेत. या लोकांचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये ते सरन्यायाधीशांच्या हिंदू देवतांच्या मूर्तीसंबंधीच्या टिप्पणीवर चर्चा करत होते. हा व्हिडीओ डिसेंबर महिन्यातील आहे. मात्र, सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सर्व मंडळी गवई यांच्याविरोधात हिंदूंना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.