Zohran Mamdani New York Mayor Election 2025: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क शहराचे निर्वाचित महापौर झोहरान ममदानी यांच्या विजयी भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की न्यूयॉर्कचे सर्वात तरुण महापौर झोहरान ममदानी यांनी आमच्या प्रशासनाशी नव्याने आणि चांगले संबंध प्रस्थापित करावेत. जर ममदानी सहकार्य करण्यात अयशस्वी झाले तर त्यांना खूप काही गमवावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर झोहरान ममदानी यांच्या विजयी भाषणाबद्दल फॉक्स न्यूजच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की ते माझ्यावर केंद्रित असे “अत्यंत संतप्त भाषण” होते. यावेळी ट्रम्प यांनी नवीन महापौरांना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी चांगले वागण्याची धमकी दिली. कारण ममदानींना न्यूयॉर्कचे महापौर म्हणू काम करताना अनेक गोष्टींसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मान्यतेची आवश्यकता असेल.
“मला वाटले की ते खूप संतप्त भाषण होते. निश्चितच ते माझ्यावर रागावलेले होते. मला वाटते की त्यांनी माझ्याशी खूप चांगले वागले पाहिजे, कारण मीच त्यांना लागणाऱ्या अनेक गोष्टींना मान्यता देणार आहे. म्हणून त्यांची सुरुवात वाईट झाली आहे”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजच्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
झोहरान ममदानी यांबद्दलची आपली भूमिका मांडताना ट्रम्प म्हणाले की ममदानींनी “चांगले काम करावे” ही त्यांची इच्छा आहे, कारण त्यांना न्यूयॉर्क आवडते. परंतु ट्रम्प यांनी आधी ममदानींचा उल्लेख “कम्युनिस्ट” म्हणून केला होता. हा संदर्भ देत त्यांनी पुन्हा म्हटले: “हजार वर्षांपासून साम्यवाद चालला नाही. साम्यवादाची संकल्पना चालत नाही. मला शंका आहे की ती यावेळीही चालेल.”
विजयी भाषणादरम्यान झोहरान ममदानी यांनी थेट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत म्हटले होते, “डोनाल्ड ट्रम्प जर ऐकत असतील, तर त्यांना आवाज वाढवून माझे भाषण ऐकावे.”
झोहरान ममदानी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, “देशाचा विश्वासघात करणाऱ्या ट्रम्प यांचा पराभव कसा करायचा हे कोणीतरी दाखवून दिले असेल, तर ते हेच शहर आहे, ज्या शहराने त्यांना मोठे केले. जर या हुकूमशहांमध्ये आणखी भीती निर्माण करायची असेल, तर सत्तेचे केंद्रीकरण करण्याच्या जे-जे उपाययोजना आहेत, त्या तोडाव्या लागतील.”
