ऑनलाइन खाद्य पदार्थ डिलिव्हर करणाऱ्या प्रसिद्ध ‘झोमॅटो’ कंपनीने ‘उबर इट्स इंडिया’ या आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीला विकत घेतले आहे. या व्यवहारानुसार, झोमॅटोनं उबर इट्सचा भारतीय व्यवसाय सुमारे ३५ कोटी डॉलर अर्थात २४८५ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. यामुळे झोमॅटोमध्ये आता उबरचा केवळ ९.९९ टक्के हिस्साच असणार आहे. कॅब सेवा पुरवणारी प्रसिद्ध कंपनी ‘उबर’चा खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या शाखेचा भारतात चांगला व्यवसाय होत नव्हता, त्यामुळेच कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. बऱ्याच काळापासून याची चर्चाही सुरु होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘उबर’च्या धोरणानुसार, जर कंपनी मार्केटमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानवर नसेल तर ती तो व्यवसाय सोडून देते. त्यामुळे याच धोरणांतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचे मानण्यात येत आहे. दरम्यान, उबरच्या सुत्रांनुसार, कंपनीचे हे अधिग्रहण केवळ भारतातील उबर इट्ससाठीच आहे. जगातील इतर देशांमध्ये उबर इट्स आपली सेवा कायम ठेवणार आहे. कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की, हा व्यवहार केवळ उबर इट्ससाठी असून कॅब सेवेसाठी नाही.

या व्यवहाराची माहिती असलेल्या सुत्रांनुसार, ‘उबर इट्स’चा आता भारतात स्वतंत्र व्यवसाय अस्तित्वात राहणार नाही त्यामुळे त्यांच्या युजर्सना झोमॅटोच्या अॅपवर जोडण्यात येणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, भारतात उबर इट्सच्या कर्मचाऱ्यांना झोमॅटो आपल्यामध्ये सामावून घेणार नाही. त्यामुळे उबर इट्सचे सुमारे १०० एक्झेक्युटिव्हज उबरच्या इतर कंपन्यांमध्ये सामावून घेतले जातील किंवा त्यांना कॉस्ट कटिंगचा सामना करावा लागेल. मात्र, यावर झोमॅटो आणि उबर यांनी कोणतेही स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे.

उबरच्या कॅब सेवेने यंदाच्या कॅलेंडर वर्षात २०० शहरांमध्ये सेवेचा विस्तार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये आता बाईक सेवेवरही जास्त लक्ष्य केंद्रीत करण्यात येणार आहे. दरम्यान, फायद्यात असलेल्या आपल्या कॅब सेवेवर जास्त लक्ष्य देण्यासाठीच उबरने उबर इट्स विकण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zomato acquires uber eats business in india to consolidate position aau
First published on: 21-01-2020 at 11:06 IST