दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या अहेरीच्या राजघराण्यातील रुक्मिणी महालात एका साध्या खुर्चीवर राजे अंब्रीशराव आत्राम विराजमान झालेले. त्यांच्यासमोर अंथरलेल्या सतरंजीवर रांगेत काही तरुण आदिवासी मुले बसली आहेत. या मुलांच्या हाती गणपतीच्या वर्गणीचे पावती पुस्तक आहे. दिसायला देखणे अंब्रीशराव समोर बसलेल्या एकेकाचे चेहरे न्याहाळत आहेत. राजांच्या आजूबाजूला असलेले त्यांचे दोन मदतनीस मुलांनी दिलेले वर्गणीचे पुस्तक बघत कोणता वॉर्ड, मंडळाचे नाव काय, किती वर्षांपासून गणेशाची स्थापना होत आहे, असे वर्गणी देण्याआधी नेहमी उपस्थित होणारे प्रश्न मुले कम् कार्यकर्त्यांना विचारत आहेत. सारी चौकशी झाल्यावर मग राजे आकडा सांगतात. लगेच मदतनीस पावती फाडतात. महालातून वर्गणीच्या पैशाची व्यवस्था केली जाते आणि मुले ‘येतो महाराज..’ असे म्हणत त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करून निघून जातात.
एकेकाळी मोठे राजवैभव अनुभवणाऱ्या ‘अहेरी इस्टेट’च्या राजाचे आजचे हे नवे रूप आहे. राजे अंब्रीशराव केवळ २८ वर्षांचे आहेत. अजूनही अविवाहित असलेल्या आत्राम घराण्यातील या सहाव्या वारसदाराला तीन वर्षांपूर्वी वडील सत्यवानराव यांचे निधन झाल्याने अचानक राजगादीवर बसावे लागले. राजघराण्याच्या परंपरेनुसार राजाची गादी रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे महालाच्या दर्शनी भागात एकीकडे सत्यवानरावांचे पार्थिव विसावलेले असताना दुसरीकडे अंब्रीशरावांचा राज्याभिषेक होत होता. तेव्हा ते अवघे २५ वर्षांचे होते. पुणे, पांचगणी, नागपूर येथील नामांकित शाळांमधून शिक्षण घेतल्यानंतर इंग्लंडला जाऊन बिझनेस लॉची पदवी प्राप्त केलेल्या अंब्रीशरावांना वडिलांच्या अचानक जाण्याने लवकर राजेपद स्वीकारावे लागले. इंग्लंडमध्ये अर्धवेळ नोकरी करून आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या या तरुण राजाला नोकरी करण्याची इच्छा होती. तसे ते आताही बोलून दाखवतात. मात्र, वडिलांच्या मृत्यूमुळे गोंड राजवटीच्या या वंशजाचे आयुष्यच पूर्णपणे बदलून गेले.
‘राजेपणाची झूल अंगावर पांघरल्यावर अवघडलेपण येत नाही काय?,’ असे विचारले असता, ‘लहानपणापासूनच राजपुत्र म्हणून जगण्याची मला सवय झाली आहे,’ असे सावध उत्तर ते देतात. दिवसभर लोकांना भेटणे, महिन्यातले २० दिवस अहेरी विधानसभा मतदारसंघात दौरे करणे आणि काही काम असेल तर नागपूर वा बाहेरगावी जाणे असा राजांचा व्यस्त दिनक्रम असतो. या नव्या राजाविषयी संपूर्ण अहेरी परिसरात कुतूहल आहे. परंतु राजवाडय़ात यापूर्वी व्हायची तशी गर्दी आता होत नाही, हे तिथे काही काळ वावरल्यावर सहज लक्षात येते. आणि राजे अंब्रीशरावांचे समर्थकही त्यास भीत भीत दुजोरा देतात.
दीडशे वर्षांपूर्वी अहेरी इस्टेटचा पसारा ५५० चौरस मैल परिसरात पसरलेला होता. ५४८ गावांची जमीनदारी व त्यातल्या १८ गावांची मालगुजारी (मालकी) असे या राजवटीचे स्वरूप होते. हजारो एकर शेतीसोबत संपूर्ण परिसरात असलेले जंगल, त्यातले प्राणी व हाडामांसाची माणसे या साऱ्यांवर अहेरीच्या आत्राम राजघराण्याचा अंमल होता. ब्रिटिशांच्या राजवटीत हे राजघराणे आणखीन बहरले. ब्रिटिशांबरोबरच्या सौहादपूर्ण संबंधांची बक्षिसी म्हणून त्यांनी या घराण्याला एक भव्य राजमहाल बांधून दिला. सध्याच्या घडीला १२० वर्षांचा असलेला हा महाल गतवैभवाची साक्ष पटवत उभा आहे. कालौघात झालेल्या हानीमुळे हा राजमहाल दुरुस्त करणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यावर राजे सत्यवानरावांनी तात्पुरता महाल उभारण्याचा निर्णय २५ वर्षांपूर्वी घेतला. राजघराण्याचे सध्या वास्तव्य असलेला ‘रुक्मिणी महाल’ हेच आता या राजवटीचे मुख्य केंद्र झाले आहे. ब्रिटिशांनी बांधून दिलेला जुना महाल तसाच पडून आहे.
या राजघराण्याचे पहिले राजे धर्मराव, नंतर भुजंगराव, तिसरे श्रीमंत धर्मराव, चौथे विश्वेश्वरराव, त्यानंतर सत्यवान व आता अंब्रीशराव. श्रीमंत धर्मरावांना विश्वेश्वर व भगवंत अशी दोन मुले. भगवंत धाकटे असल्याने राजेपद विश्वेश्वररावांकडे गेले. भगवंतरावांचे चिरंजीव म्हणजे सध्या राजकारणात सक्रिय असलेले धर्मरावबाबा आत्राम. राज्य मंत्रिमंडळात तीनदा मंत्रिपद भूषविणाऱ्या धर्मरावबाबांचे घर या राजवाडय़ाला लागूनच आहे. सहाव्या पिढीपर्यंत चालत आलेल्या या राजघराण्यातील श्रीमंत धर्मराव व विश्वेश्वरराव या दोनच राजांना अमाप लोकप्रियता लाभली. धर्मरावांना शास्त्रीय संगीत, नाटक, साहित्य यांत रुची होती. संगीताच्या अनेक मैफली त्यांनी तेव्हा दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरीच्या राजवाडय़ात भरवल्या. प्रख्यात लेखिका दुर्गाबाई भागवत यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. त्यांना परिक्रमेसाठी मदत करणारे राजे अशी धर्मरावांची ओळख होती. आत्राम राजघराण्याची मालमत्ता केवळ अहेरीतच नाही, तर संपूर्ण विदर्भात होती. एकदा नागपुरात ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या सीपी क्लबमध्ये धर्मरावांना ते गोरे नाहीत म्हणून प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या या गोंड राजाने लगेचच नागपुरातील त्यांच्या जमिनीवर नवा क्लब स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आता गोंडवाना क्लब म्हणून उच्चभ्रूंच्या वर्तुळात परिचित असलेला हा क्लब राजे धर्मराव यांची देन आहे. आताचे राजे अंब्रीशराव यांना ही घडामोड ठाऊक नाही. ‘आपण कधीही गोंडवाना क्लबमध्ये गेलेलो नाही,’ असे ते प्रांजळपणे सांगतात.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे अहेरीचे संस्थानसुद्धा खालसा झाले. १९५१ सालातली ही गोष्ट. तेव्हा या संस्थानाला वर्षांला सात लाखांचा तनखा मिळत होता. तोसुद्धा बंद झाला. संस्थान खालसा झाल्याच्या धक्क्यानं धर्मरावांचे निधन झाले आणि विश्वेश्वरराव राजेपदावर आले. नंतर सीलिंगचा कायदा आला. त्यामुळे संस्थानी राज्यांतील अनेक राजांनी जमिनी दुसऱ्याच्या नावावर करायला सुरुवात केली. हे करताना काही राजांनी ‘जमिनीवरील जंगल कापून टाका, लाकडे आणून द्या आणि जमीन मोफत घ्या,’ असा प्रस्ताव लोकांसमोर ठेवून मिळेल ते गाठीशी मारण्याचा प्रयत्न केला. अहेरीचे राजे विश्वेश्वरराव मात्र याला अपवाद ठरले. त्यांनी जंगलासकट जमिनी आदिवासींना दान केल्या. त्यामुळे या भागातील जंगल टिकून राहिले, अशी आठवण अहेरीचे पत्तीवार गुरुजी सांगतात.
संस्थाने खालसा झाली, जमिनी गेल्या, तनखा बंद झाला.. अशा प्रतिकूल स्थितीत विश्वेश्वरराव राजगादीवर विराजमान झाले. अशाही परिस्थितीत न डगमगता त्यांनी अहेरी परिसरातील जनतेचा विश्वास संपादन करण्यास सुरुवात केली. तेव्हा कमालीची गरिबी अनुभवणाऱ्या या राजाने हाताशी असलेल्या तुटपुंज्या शेतीतून आपले उत्पन्न वाढविण्यावर भर दिला. त्याचवेळी या भागातील आदिवासी शिक्षित झाले पाहिजेत यासाठी १९५८ साली धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना करून या भागात शाळा व महाविद्यालयांचे जाळे विणायलाही सुरुवात केली. लोकशाही व्यवस्थेत लोकांचे प्रेम आणि आपुलकी संपादन करायची असेल तर समाजकारणासोबत राजकारण करण्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून मग विश्वेश्वररावांनी आदिवासी सेवा मंडळ स्थापन करून त्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले. पुढे याच मंडळाचे ‘नागविदर्भ आंदोलन समिती’ असे नामकरण झाले. काळी टोपी व टोकाचा काँग्रेसविरोध या बळावर तीनदा आमदार व दोनदा खासदारपद भूषविणाऱ्या विश्वेश्वररावांना या भागात कमालीची लोकप्रियता लाभली. त्यांनी काँग्रेसमध्ये यावे म्हणून पं. नेहरूंपासून शंकरराव चव्हाणांपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले. पण महाराज बधले नाहीत. कायम विरोधी पक्षात राहिलेला हा राजा बसने प्रवास करायचा. आज त्याच गादीवर विराजमान झालेला त्यांचा नातू वातानुकूलित वाहनाशिवाय फिरत नाही, असे या भागातील जनता बोलून दाखवते. खुद्द अंब्रीशरावांना याबद्दल विचारले असता ‘काळाच्या ओघात सर्व काही बदलते,’ असे उत्तर त्यांनी दिले. विश्वेश्वरराव दुर्गम भागात फिरायचे तेव्हा राजघराण्याचे डाकबंगले होते. काळाच्या ओघात हे बंगले आता नष्ट झाले आहेत. राजघराण्याचे अनेक बंगले सरकारने ताब्यात घेतले आणि त्यांना विश्रामगृहाचा दर्जा दिला, असे अंब्रीशराव सांगतात.
राजा गावात येतो म्हटल्यावर कमानी उभारून, त्यांचे पाय धुऊन स्वागत करणारी जनता असे चित्र एकेकाळी या भागाने अनुभवले. सुमारे ४० वष्रे राजगादी सांभाळणाऱ्या विश्वेश्वररावांचे १९९७ मध्ये निधन झाले. त्यांच्यानंतर गादीवर विराजमान झालेल्या सत्यवानराजांची कारकीर्द अवघी १३ वर्षांची राहिली. एकदा आमदार म्हणून निवडून आलेले सत्यवानराव महाराज अहेरीत कमी व नागपुरातच जास्त काळ राहात. त्यांची तब्येत साथ देत नसल्याने त्यांचा जनतेशी संपर्क कमी राहिला, हे सध्याचे राजे अंब्रीशराव हेही मान्य करतात.
वडिलांच्या निधनानंतर अहेरीत दाखल झालेल्या अंब्रीशरावांनी पुन्हा सक्रिय होण्याचा ध्यास घेतला असला तरी आता पूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही. हे या भागात फिरताना आणि सामान्य जनतेशी बोलतानाही जाणवते. ‘सध्याचा राजा दुपारी बारा वाजता झोपून उठतो, कुणाचे फोन घेत नाही,’ असे आक्षेप राजाबद्दल बोलताना लोक व्यक्त करतात. अंब्रीशराव मात्र ‘हे सर्व झूठ आहे,’ असे ठामपणे सांगतात. ‘ज्यांचा क्रमांक माझ्याकडे ‘सेव्ह’ आहे त्यांचाच फोन मी घेतो,’ असे त्यांचे म्हणणे आहे. असे म्हणताना अजूनही आपण राजेपण विसरलेलो नाही याची जाणीव ते करून देतात.
आज शिक्षणाचा सर्वत्र प्रसार झाल्याने समाजाचा राजेशाहीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. आपला राजा नामधारी आहे याची जाणीव इथल्या लोकांना आता होऊ लागली आहे. पण या वास्तवापासून राजे अंब्रीशराव कोसो दूर आहेत हे त्यांच्याशी बोलताना सतत जाणवते. जनतेची राजदरबारातील वर्दळ कमी झाली आहे. जे येतात ते आपल्याच शिक्षणसंस्थेतले कर्मचारी तसेच खूशमस्करे असल्याची जाणीव राजांना नसल्याचे दिसून येते. स्वतंत्र विदर्भ, चेवेल्ला धरणाला विरोध आणि अहेरी हा स्वतंत्र जिल्हा झाला पाहिजे, हे तीनच मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे राजे अंब्रीशराव सांगतात. राजांना आपल्या जनतेला नेमके काय हवे आहे याची नेमकी जाण नसल्याचे त्यातून दिसून येते.
अहेरीच्या राजघराण्यात होणारा दसरा महोत्सवाचा सोहळा अतिशय महत्त्वाचा असतो. या महोत्सवाला १२० वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी या महोत्सवात किती लोक सहभागी होतात यावरून राजाची लोकप्रियता जोखण्याची पद्धत या भागात प्रचलित आहे. राजे विश्वेश्वररावांच्या काळात हजारो आदिवासी आठ दिवस आधीपासूनच या महोत्सवासाठी अहेरीत ठाण मांडायचे. तेव्हा दळणवळणाची फारशी साधने नव्हती. बैलगाडी हेच प्रवासाचे वाहन होते. शेतातली भाताची रोवणी आटोपली की आदिवासी दसऱ्याची वाट बघायचे. आदिवासी आपल्या कुटुंबकबिल्यासह या दसरा सोहळ्यासाठी अहेरीच्या राजवाडय़ावर गर्दी करीत. राजवाडय़ासमोरच्या मोकळ्या मैदानावर एखाद्या गावाचा कबिला पोहोचला, की त्यातल्या प्रमुखाने राजवाडय़ात वर्दी द्यायची. नंतर वाडय़ातील मदतनीसांनी या कबिल्याला अन्नाचा शिधा द्यायचा अशी परंपरा होती. हजारो आदिवासी गोळा झाले की राजाने त्यांच्यात फेरफटका मारून प्रत्येकाची विचारपूस करायची, हेही ठरलेले. दसऱ्याच्या आदल्या दिवशी राजाने पालखीतून राजवाडय़ाबाहेर यायचे. या पालखीमागे जनतेने मिरवणुकीने जायचे. पालखी गडेरीच्या तलावावर पोहोचली की तलावात एक कोंबडी सोडून राजाने तिची शिकार करायची. नंतर शस्त्रपूजन होऊन पालखी राजवाडय़ावर परतायची.
त्या रात्री या सोहळ्याला आलेले आदिवासी गोंडीनृत्य करून राजाला रिझवीत. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी राजा मुख्य महालाच्या देवघरात जाऊन देवांची पूजा करत असे. पूजेचा हा सोहळा जनतेला बघण्याची मुभा नसे. पूजा झाल्यावर राजा पालखीत बसून मिरवणुकीने गावाबाहेर जात असे. तिथे ते आपटय़ाची पाने लुटत. त्यानंतर सगळेजण एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत. नंतर पालखी राजवाडय़ात परतल्यावर राजा एका मोठय़ा व्यासपीठावरून जनतेशी संवाद साधत असे. या सोहळ्यानिमित्ताने प्रजेच्या सुखदु:खाची विचारपूस करायची, असे या महोत्सवाचे स्वरूप असे. आजही हा महोत्सव याच पद्धतीने होतो. पण त्यातली गर्दी दिवसेंदिवस कमी कमी होत चालली आहे. राजा आणि जनतेत वाढत चाललेली दरी हे त्यामागील प्रमुख कारण आहे. यापूर्वी राजे विश्वेश्वरराव आणि सत्यवानराव दसऱ्याच्या दिवशी जनतेशी त्यांच्या माडिया व गोंडी भाषेत संवाद साधत. आजच्या राजाला या स्थानिक बोली अवगत नाहीत. विश्वेश्वरराव असेपर्यंत दसरा सोहळा हे अहेरीचे मोठे आकर्षण होते. पुढे हळूहळू त्यातला जनतेचा सहभाग कमी होत गेला. आता दळणवळणाची साधनेही वाढली आहेत. त्यामुळे लोक आठ दिवस आधीच मुक्कामाला येत नाहीत. दसऱ्याच्या दिवशी येतात व भाषण ऐकून निघून जातात. पूर्वी दसरा महोत्सवात खेडय़ापाडय़ांतील आदिवासी तरुणांचा मोठा सहभाग असे. आता शिक्षण घेतलेला हा तरुण या सोहळ्याकडे फिरकायला तयार नाही. जोवर या भागातील जनता राजाच्या पूर्ण प्रभावाखाली होती तोवर दसऱ्याला गर्दी व्हायची. हा प्रभाव हळूहळू ओसरत गेला आणि मग जनतेने त्याकडे पाठ फिरवली, असे शिक्षित तरुणांचे म्हणणे आहे. राजघराण्यावर श्रद्धा असलेले वयोवृद्ध पत्तीवार गुरुजी मात्र ‘गर्दी कमी झाली असली तरी राजाविषयी जनतेच्या मनात प्रेम कायम आहे,’ असे ठामपणे सांगतात. राजे अंब्रीशरावही दसरा महोत्सवाचा प्रभाव अजूनही कायम आहे असा दावा करतात. देशात फक्त म्हैसूर व अहेरी या दोनच राजघराण्यांत दसऱ्याचा भव्य सोहळा साजरा होतो याकडेही ते लक्ष वेधतात.
अंब्रीशरावांचा राज्याभिषेक झाल्यानंतरच्या दसऱ्याला २५ हजार लोक जमले होते. या महोत्सवाला गर्दी व्हायची तेव्हा राजाकडून जनतेची विचारपूस होत असे. आता त्यातल्या आपुलकीची जागा औपचारिकतेने घेतली आहे. त्याकाळी या सोहळ्याला येणाऱ्यांना राजघराण्याकडून शिधा दिला जायचा. आता ही पद्धत जवळजवळ बंद झाली आहे. राजे अंब्रीशराव मात्र अजूनही हा महोत्सव आपले महत्त्व राखून आहे असे सांगतात.
देशातील संस्थाने खालसा झाल्यानंतर व राजेपद अधिकृतपणे गेल्यावर तिथल्या राजांचा जनतेवरील प्रभाव झपाटय़ाने ओसरला हे वास्तव आहे. अहेरीचे राजघराणे मात्र याला अपवाद आहे. याचे कारण या घराण्याने नंतर राजकारणात सक्रीय सहभाग घेतला, हे आहे. अहेरी राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत मागास राहिल्याचा लाभ आत्राम राजघराण्याला राजकारणात झाला, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत या भागाने आत्राम घराण्याला साथ दिली. हे घराणे काँग्रेसविरोधी असल्याने जनतेचा कौलही तसाच राहिला. इथल्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर मात्र राजे विश्वेश्वरराव यांना १९७७ चा अपवाद वगळता यश मिळाले नाही. कारण या मतदारसंघात अहेरी-सिरोंचा वगळता इतर भागांतील मतदारांची संख्या वाढली. सिरोंचा विधानसभा मतदारसंघावर मात्र २००९ पर्यंत या घराण्याचेच वर्चस्व राहिले. अपवाद फक्त १९८० चा! या निवडणुकीत सत्यवानरावांचा अर्ज तांत्रिक कारणाने बाद झाल्याने काँग्रेसचे पेंटारामा तलांडी बिनविरोध निवडून आले.
त्यानंतर सत्यवानराव व धर्मराव या दोन चुलत भावांमधील लढाई हेच या मतदारसंघातील निवडणुकीचे वैशिष्टय़ झाले. धर्मरावबाबांनी घराण्याचे वैशिष्टय़ असलेला काँग्रेसविरोध बाजूला सारत प्रारंभी काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीकडून निवडणुका लढवून यश संपादन केले. त्यामुळे मूळ राजघराणे मात्र आमदारकीपासून वंचित राहिले. या दोन भावांमधील राजकीय वैर आता नवा राजा गादीवर विराजमान झाला तरी कायम आहे.
यादरम्यान या भागात शिक्षणाचा प्रसार झाला. नक्षलवादी चळवळीने मूळ धरले. या दोन्ही घटकांकडून राजे हे केवळ नामधारी आहेत, ही बाब लोकांच्या मनावर सतत बिंबवली गेली. दोन भावांमधील राजकीय भांडणात तसेही जनतेचे विभाजन झालेच होते. त्यात ‘नामधारी राजा’च्या प्रचाराची भर पडली. आदिवासींमधील शिक्षित तरुणांनी आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारण सुरू केले. त्याचा आलेख सतत वाढत गेला आणि त्याची परिणती २००९ साली दीपक आत्राम या शिक्षित आदिवासी तरुणाच्या विजयात झाली. दोन्ही राजांचा पराभव करायचा, या ईष्र्येने जनतेने मतदान केले. त्यामुळे दीपक आत्राम ३५ हजारांच्या फरकाने विजयी झाले. आज आत्राम यांच्याविषयीसुद्धा नाराजी असली तरी २००९ हे साल या राजघराण्याचा जनतेवरील प्रभाव पूर्णपणे ओसरला आहे, या वास्तवावर शिक्कामोर्तब करणारे ठरले. एवढे मोठे स्थित्यंतर घडूनही सध्याचे राजे अंब्रीशराव तसेच राष्ट्रवादीत असलेले धर्मरावबाबा आत्राम अजूनही राजघराण्याचा प्रभाव ओसरला हे मान्य करायला तयार नाहीत. ‘प्रस्थापित नेते’ अशी ओळख निर्माण झाल्याने पराभव झाला असे धर्मरावबाबांना वाटते. तर आता निवडणुकांमध्ये पैसा हा महत्त्वाचा घटक ठरू लागला आहे, म्हणून जनता आमच्यापासून थोडीशी दूर गेली असे अंब्रीशराव यांना वाटते. आपण जनतेत मिसळलो तर ती पुन्हा निवडणुकीत सोबत येईल अशी आशा हा राजा बाळगून आहे.
२००९ ची निवडणूक महत्त्वाची आहेच; पण आता केवळ राजकारणातच नाही तर सर्वच क्षेत्रांत राजाचा प्रभाव ओसरू लागल्याचे मत या भागातील शिक्षित तरुण बोलून दाखवतात. एकेकाळी या भागातील जनतेला राजापलीकडे सरकार आहे ही गोष्टच ठाऊक नव्हती. आता सर्वाना ती ठाऊक झाली आहे. त्याचबरोबर नक्षलवाद्यांकडून होणारा प्रचार हासुद्धा राजाचा प्रभाव कमी करण्यात महत्त्वाचा ठरला आहे. विश्वेश्वरराव महाराजांनी आरंभापासून या चळवळीच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यांचा जनतेवर मोठा प्रभाव असल्याने नक्षलवादीसुद्धा त्यांना वचकून असत. त्यानंतर आलेले सत्यवानराव आणि अंब्रीशराव यांची या मुद्दय़ावरील भूमिका तळ्यात मळ्यात अशीच राहिली आहे. ‘ते त्यांचे काम करतात, आम्ही आमचे..’ अशी भूमिका राजे घेतात. अपहरणनाटय़ापासून धर्मरावबाबासुद्धा हीच भूमिका घेऊन राजकारण करत आहेत. केवळ राजघराणेच नाही, तर इथला प्रत्येक लोकप्रतिनिधी हीच भूमिका घेतो. त्यामुळे मोठय़ा संख्येत आदिवासी मारले जात असूनही राजे गप्पच राहतात. ‘नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे आम्ही पारतंत्र्यात आहोत,’ असे म्हणणारे आदिवासी या भागात खूप आहेत. ही लक्षणे राजांचा प्रभाव ओसरल्याचीच आहेत. दुर्दैवाने राजे मात्र अजूनही हे वास्तव स्वीकारायला राजी नाहीत. या भागातील शिक्षित तरुणांच्या मते, बदलत्या काळानुसार राजाने जनतेला कोणताच नवा कार्यक्रम दिला नाही. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आता क्षीण झाला आहे. तेव्हा या मुद्दय़ावर जनतेला सोबत घेण्याची आशा बाळगणे मूर्खपणाचे आहे, असे बरेच तरुण बोलून दाखवतात. तिकडे राजे अंब्रीशराव मात्र नागविदर्भ आंदोलन समितीचा जन्मच या मुद्दय़ावर झाल्याने तो मुद्दा कसा सोडणार, असा प्रश्न उपस्थित करतात. या भागातील तरुणांच्या मते, आजघडीला राजघराण्यावर श्रद्धा असलेल्या आदिवासींची संख्या २५ हजारांपेक्षा जास्त नाही. दिवसेंदिवस ती कमी होत चालली आहे. अंब्रीशराव मात्र हे मान्य करायला तयार नाहीत. जिल्हा परिषदेत आमचे चार सदस्य आहेत. त्यांची संख्या वाढेल, अशी भविष्यवाणी ते वर्तवतात.
एक मात्र खरे की, शिकलेल्या पिढीने राजघराण्याला नाकारले आहे. हे लक्षात घेऊनच धर्मरावबाबांनी राजकीय पक्षाची साथ धरली. अंब्रीशराव मात्र या मुद्दय़ावर अजून द्विधा मन:स्थितीत दिसतात. या राजघराण्याने या भागातील गरिबी हटवण्यासाठी काही केले नाही. शिक्षणाच्या प्रसारासाठी शाळा काढल्या, पण आज या शिक्षणसंस्थांचा व्यवसाय झाला आहे. या संस्थांमध्ये किती स्थानिक तरुणांना नोकरी मिळाली, हा संशोधनाचा विषय आहे. राजे अंब्रीशराव मात्र व्यावसायिकीकरणाचा हा आरोप फेटाळून लावतात. ‘बदलत्या परिस्थितीनुसार राजानेही बदलायला हवे. आता नव्या व्यवस्थेत नव्या राजाचा राज्याभिषेक करण्याची गरजच काय?,’ असा सवाल शिक्षित तरुण उपस्थित करू लागले आहेत. अजूनही या राजांना प्रजेला गुलाम म्हणून ठेवायची इच्छा आहे काय, असा सवालही ते करतात. राजे अंब्रीशराव मात्र परंपरेचा दाखला देत ‘आमची गुलामगिरीची मानसिकता नाही,’ अशा शब्दांत या आक्षेपाचे खंडन करतात.
आमदार दीपक आत्राम यांच्या विजयाने राजघराण्याला आता सुशिक्षित तरुणांकडून राजकारणात धोका जाणवू लागला आहे. या तरुणांना सोबत घेत आपण विकासाचे राजकारण करू, अशी भूमिका राजाने खरे तर घ्यायला हवी होती. पण तसे घडताना दिसत नाही. म्हणूनच राजा व प्रजेमधील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. राजघराण्याचा दरारा, डौल आणि थाटमाट यांतच मग्न असलेल्या राजांना सद्य:स्थितीची जाणीव नाही, असे स्थानिक तरुणांचे म्हणणे आहे. त्यात तथ्यही आहे. पण राजे अंब्रीशरावांना हे मान्य नाही. घराण्याची पूर्वापार परंपरा आहे, ती मोडीत कशी काढणार, असा प्रश्न ते उपस्थित करतात. या नव्या राजाला आपल्याकडे सध्या किती शेती आहे, हेही माहीत नाही. अनेक ठिकाणची शेती बटईने दिलेली आहे. त्यातून उत्पन्न येते व त्यावरच कारभार चालतो, असे ते सांगतात. राजे विश्वेश्वररावांनी हजारो एकर जमीन शासनाला व आदिवासींना दान केली, असे ते सांगतात.
एकूणच या भागात फिरताना अहेरीच्या राजघराण्याचे आकर्षण कमी होत चालले आहे हे प्रकर्षांने जाणवते. पण राजे ते मान्य करायला तयार नाहीत. या राजघराण्याचे एक वैशिष्टय़ म्हणजे या राजांनी जनतेवर कधी जुलूम केला नाही. राजगादी नसलेले धर्मरावबाबा आत्राम शिकारीच्या गुन्हय़ात अडकले, पण मानवी अत्याचारांचा कलंक मात्र त्यांना कधी लागला नाही. जनतेने नाकारल्याने तिच्यावर राग काढायचा, डुख धरायचा, अत्याचार करून त्याचा बदला घ्यायचा आणि या अत्याचारांतून आपण राजे आहोत हे जनतेला स्वीकारणे भाग पाडायचे, असे इतरत्र घडलेले प्रकार अहेरी इस्टेटीत मात्र कधीच घडले नाहीत. हीच एकमेव जमेची बाजू असलेल्या या राजघराण्याची वाटचाल संथ झाली असली तरी अजूनही सुरूच आहे.