एलिफंटाला जाणारी पहिली बोट सकाळी साडेसातला गेटवे ऑफ इंडियावरून सुटायची. म्हणून मारुतीला सकाळी साडेसहा वाजता पोचावं लागायचं. आधी केर काढायचा. प्रवाशांनी केलेला कचरा काढायचा. मग अख्खी बोट धुवायची. फडकं घेऊन सगळी बाकं, खुच्र्या स्वच्छ पुसायच्या. रोजचं हे काम. मारुतीच्या कामावर मालक खूश होता; पण शिव्या पुष्कळ द्यायचा. मनात नसायचं त्याच्या काही. केवळ तोंडाचा पट्टा. पण शिव्या त्या शिव्या. सगळी घाणच. आय-माय एक करायचा. मालकाची लुंगी अर्धी वर. कपाळावर मोठा भला सहा बोटांचा गंधाचा पट्टा. सकाळी सकाळीच तो देवांना जागं करायचा, बहुतेक. बोटीचं न्हाणं-धुणं होता होता. तोवर धक्क्य़ावर प्रवाशांची गर्दी जमू लागायची.
पहिल्या फेरीला साधारणपणे एजंट मंडळींचे ग्रुप असायचे. बहुतेक परदेशी पर्यटक. अमेरिकन, जपानी असे. पहिल्या ग्रुपची माणसं समोरच्या ताज हॉटेलमधून सरळ धक्क्य़ावर यायची. बहुतेक असंच व्हायचं. त्या परदेशी पर्यटकांच्या हातात छोटय़ा-छोटय़ा बॅगा, डोक्याला टोप्या, गळ्यात कॅमेरे अन् दुर्बिणी..
पहिली बोट निघाल्यानंतर दुसऱ्या बोटीची साफसफाई करावी लागायची. ते मात्र मुश्कील काम. पहिल्या बोटीत जागा न मिळालेले प्रवाशी आणि दुसऱ्या बोटीसाठी वाढत जाणारी बाजारबुणग्यांची गर्दी- असा मामला. गर्दीचा वाढता गलका, दबाव. सकाळी सकाळी मालकाच्या शेलक्या शिव्या आणि नंतर प्रवाशांच्या शिव्या सणाणत बरसायच्या. उन्हं वर चढू लागली की शिव्याही तेजीत.
मारुतीचा मालक नरसिंग राव. त्याच्या तीन बोटी होत्या. एलिफंटाला जायचं, प्रवाशांना तिथं सोडायचं आणि तिकडच्यांना घेऊन परत यायचं. गेटवेच्या भोज्ज्याला शिवून पुन्हा परत जायचं. केवढा कचरा बोटीत! चटपटीत काहीतरी खाऊन झालं की चुरगळलेल्या पुडय़ा तिथंच टाकून द्यायच्या. शेंगदाणे, संत्र्याची सालं, चॉकलेट अन् टॉफ्यांचे रॅपर, प्रवाशांच्या उलटय़ांची घाण, वैतागून टाकलेली निरोधची पाकिटं, एखादी तुटलेली माळ, कुणाची टोपी, कुणाचा रुमाल- असं बरंचसं. ते सगळं उचलता उचलता आणि कचऱ्याच्या पेटीत टाकता टाकता मारुतीचे हात भरून यायचे.
समुद्रात कचरा टाकायला बंदी होती. परंतु त्यावरून मारुतीनं कधी प्रवाशांना रोकलं-टोकलं नाही. काम जेवढं कमी, तेवढं चांगलं. सगळ्यात कठीण काम प्रवाशांच्या उलटय़ा साफ करण्याचं. पहिल्यावहिल्यांदा बोटीचा प्रवास करणाऱ्यांना उलटीचा त्रास सर्रास होतोच. माणसं सवयीप्रमाणे समुद्राच्या बाजूनं तोंड करून अन् झुकून उलटी करायची. या प्रयत्नात व्हायचं असं, की सगळी घाण कपडय़ांवर अन् बाकडय़ांवर पडायची. भरतीच्या वेळी तर लोकांचे खूप हाल व्हायचे. खाल्लं-प्यालं सगळं बाहेर यायचं. टाकीतलं पाणी घेऊन सगळी घाण साफ करायची, असा नरसिंग रावचा हुकूम होता. मारुतीच्या कंबरेचे टाके ढिले पडायचे. कधी कधी तर बोटीच्या सुपीरिअरची लाथ पडायची त्याला. मारुतीला सगळे ‘मेहतर’ म्हणायचे. बोटीवरचा सगळ्यात खालचा माणूस. कुणीही काहीही ऐकवून जायचं त्याला. इंजिनचे कॅप्टन जेवणाचा डबा आणायचे आणि ताट-वाटी घेऊन जेवायचे. मारुतीला दोन्ही कामं लागलेली. डबा धुवा अन् ताट-वाटीसुद्धा. शिवाय, परतण्यापूर्वी कॅप्टनचं बास्केट तयार करावं लागायचं.
सलग दहा तास मारुती बोटीवर हलत-डुलत होता. पाण्याच्या मर्जीनुसार इथनं तिथं हेलकावे खात होता, अन् स्वत:चा कसाबसा तोल सावरत होता. असे दहा तास त्यानं काढल्यावर संध्याकाळी बोट धक्क्य़ाला लागली तेव्हा मारुतीची हाडं खिळखिळी झाली होती. बोटीची साफसफाई करण्याचं त्राण त्याच्यात नव्हतं. खरं तर नरसिंग रावनं आईवरची एक शिवी हासडून मारुतीला सांगितलं, ‘‘च्यायला, का नाही करत रे बोटीची सफाई? उद्या सकाळी सकाळी आल्या आल्या पुन्हा आपली xxxx! तुझंच काम कमी होईल ना?’’
उत्तर देण्याचीसुद्धा हिंमत नव्हती मारुतीमध्ये. हात हलवून सांगितलं त्यानं मालकाला- कसंबसं समजावल्यासारखं, ‘‘सकाळी करीन. आता ताकद नाही.’’
मुंबईच्या रस्त्यांवर उसळलेली गर्दी. त्या गर्दीत सोलून-सोलपाटून निघत तो चर्चगेट स्टेशनला आला. लोकल पकडली. प्रवासात उभ्या उभ्या मान कलंडत्येय, डोळे मिटताहेत, असं झालं. जोगेश्वरी स्टेशनला गर्दीनं आपोआप त्याला ढकलून बाहेर फेकून दिलं. दररोजचा शिरस्ता. त्याचा अन् गर्दीचाही!
कसाबसा दोन पायांवर स्वत:ला सावरत हायवेजवळच्या टेकडीवर असलेल्या सावंतनगर झोपडपट्टीत मारुती दाखल झाला आणि खोली नंबर १०९ मध्ये आला. लाकडी कॉटवर मळलेले कपडे, डबे वगैरे सामान होतं. ते सगळं एकीकडे लोटून तो कॉटवर आडवा झाला. स्वच्छ, चमकदार पितळी ग्लासात कळशीतलं ताजं पाणी घेऊन तुळशीबाई त्याच्यापाशी आली अन् नेहमीप्रमाणे तिनं विचारलं..
‘‘काय रे, थकलास का? घे- पाणी घे.’’
दोन्ही हातांच्या कोपऱ्यांवर जोर देऊन मारुती उठला आणि गटागटा पाणी प्याला. तुळशी त्याच्या शेजारी बसली. हळूहळू त्याचे पाय चेपू लागली आणि अख्ख्या दिवसाची गोष्ट त्याला सांगू लागली.
‘‘लक्ष्मी आलीती सासरहून. व्याही भावोजी नाशकाला गेलेत.’’
मारुतीनं डोळे मिटून घेतले. थोडा वेळ असाच गेला. तुळशी परत म्हणाली, ‘‘धाकटी फार दुष्ट झाल्येय. मला आजी म्हणते, तुम्हाला नावानं हाक मारते. बोबडय़ा भाषेत सारखी विचारत असते : ‘मालुती केव्हा येणार?’..’’
मारुतीच्या चेहऱ्यावर हसू पसरलं.
‘‘हिंदी बोलते?’’
‘‘हौऊ!’’
‘‘मराठी शिकली नाही?’’
‘‘शिकेल.’’
दिवसभराचा थकवटा थोडा कमी झाला. हात डोक्याखाली घेऊन मारुतीनं विचारलं :
‘‘परत कशी गेली?’’
‘‘परत कुठं गेली? सिनेमा बघायला गेलेत.’’
‘‘बारकीसुद्धा?’’
‘‘हो.. सोडतच नाही ती आईला. काय करायचं? घेले घेऊन संगती.’’
मारुती ‘हूं’ म्हणाला अन् गप्प झाला. एक मोठा श्वास घेतला त्यानं.
‘‘आणि कार्तिक कुठाय?’’
‘‘आज पुन्ना शाळेत कुणाकडं तरी भांडून आला.’’
‘‘त्याच्या आयची..’’
कूस बदलून मारुती उठून बसला.
‘‘साला, रोज मार खाऊन येतो. घाटी कुठचा. मराठी माणसाचं नाक कापलं.’’
तुळशीसुद्धा उठली.
‘‘चला, तोंड-हात धुऊन घ्या. पोहे केलेत. थोडे खाऊन घ्या.’’
टावेल खेचला आणि मारुती मोरीत अंघोळीला बसला.
‘‘धोतर-पेहरण काढ माझं.’’
चूल पेटली. दिवाबत्ती झाली. अंघोळ आटपून मारुती कोपऱ्यात ठेवलेल्या मूर्तीपाशी दोन्ही हात जोडून उभा राहिला. थोडं पुटपुटला आणि धुतलेली धोतर-पेहरण अंगावर चढवून तयार झाला. एवढय़ात कार्तिक आला. दोन्ही ढांगांमधून हात घालून मारुतीनं त्याला फर्रदिशी उचललं, कॉटवर आपटलं आणि खाली दाबून टाकलन् त्याला..
‘‘चल साल्या, आपल्यासंगती कुस्ती लढ.’’
तर कार्तिकला गुदगुल्या झाल्या. मारुती म्हणाला, ‘‘उद्यापास्नं दररोज राईच्या तेलाची मालीश करा, अन् आखाडय़ात जाऊन जोर-बैठका काढा. पुस्तकंबिस्तकं वाचून ज्ञानदेव झाल्यानं काही नाही होणार.’’
कार्तिक हसत होता. तुळशी चुलीपाशी बसलेली म्हणाली, ‘‘काय उलटं शिकवताय त्याला?’’
‘‘बरोबरच सांगतोय. मराठय़ाचं पोरगं मराठाच होणार.’’
एवढय़ात बाबू आला. बाहेरनं हाक दिली त्यानं..
‘‘काय मारुती? पाटकरच्या मीटिंगला जायचंय की नाही?’’
मारुती आतनंच म्हणाला, ‘‘हट् साला. त्या मीटिंगला का जातात ठाऊकेय मला. बाई बोलते आणि तू समोर बसून मांडय़ा खाजवत असतोस.’’
तुळशीनं स्वैपाक करता करता दोन्ही पुरुषांना एक इरसाल शिवी हासडली.
‘‘हलकट साले!’’
मारुती बाहेर पडला.
‘‘ऐकलेस.. माझ्या बायकोचे बोल ऐकलेस?’’
मीटिंग संपल्यावर गुत्त्यात खूप चर्चा झाली. बाबासाहेब आंबेडकरांपास्नं ते थेट मेधा पाटकरांपर्यंत. चव्हाणांपास्नं पवारांपर्यंत सगळ्यांची पिसं व्यवस्थित काढण्यात आली.
दोन-तीन बेवडे आरडाओरडा करत गल्लीत आले तेव्हा अर्धी रात्र झाली होती. तुळशी उठली. तिनं स्टोव्ह पेटवला आणि जेवण गरम करू लागली. जावई बाहेर खाटेवर झोपला होता. शेजारीच मारुतीची चारपाई. मारुती हसत हसत आत आला. लक्ष्मी छोटीला जवळ घेऊन झोपलेली. दोघांच्या डोक्यावर मारुतीनं हात ठेवला. लहानगीचे गाल कुरवाळले.
‘‘मालुतीची आई.’’
‘‘तिला उठवू नका आता,’’ तुळशीनं मारुतीला दटावलं.
कार्तिक कॉटवर झोपला होता. लक्ष्मीला जाग आली. उठली आणि बापाला बिलगली. छोटीसुद्धा जागी झाली. कार्तिकनं कूस बदलली आणि ‘बापू’ असं झोपे-झोपेतच पुटपुटला. जावयानं येऊन मारुतीला वाकून नमस्कार केला.
आणि आता मारुती स्टीम बोटचा मेहतर नव्हता. आपल्या कुटुंबाचा कॅप्टन वाटत होता तो. आपल्या सात घोडय़ांच्या रथाचा सारथी!!