जगभरातील अनेक देशांमध्ये विविध कायदे, नियम, श्रद्धा आणि परंपरा पाळल्या जातात. प्रत्येक देशात कायदे जरी सरकार बनवत असले तर परंपरा ह्या खूप वर्षांपासून चालत आलेल्या आहेत ज्या आजही पाळल्या जातात. पण कायदा आणि रुढी- परंपरा या दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक आहेत. पण अनेक देशांतील काही गोष्टी इतक्या विचित्र असतात की ज्या ऐकल्यानंतर आपणही आश्चर्यचकित होतो. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच १० विचित्र निर्बंधांबद्दल सांगणार आहोत. जे जगातील विविध देशांमध्ये लागू आहेत. ऑडी वेबसाइटच्या रिपोर्टनुसार ही बातमी समोर आली आहे.

पेन्सिल

ट्युनिशिया देशात पेन्सिलवर बंदी घालण्यात आली आहे. यामागचे कारण अद्याप कोणालाच माहीत नाही. इथे चुकून जर कोणी पेन्सिल सोबत आणली तर काही अडचण नाही, पण मोठ्या प्रमाणात पेन्सिल सोबत आणल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. पेन्सिल आयात करण्यासही येथे बंदी आहे.

बॉल पॉइंट पेन

पश्चिम आफ्रिकेतील नायजेरियामध्ये बॉल पॉइंट पेनच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. पेनच्या रिफिल कार्टेजच्या आयातीवरही बंदी आहे.

मुलेट हेअरस्टाइल

१९९० च्या दशकात संजय दत्त, अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांसारखे भारतीय अभिनेते मुलेट हेअरस्टाइल ठेवताना दिसले. यामध्ये पुढचे केस छोटे मागचे केस लांब अशी ही हेअरस्टाईल आहे. पण इराणमध्ये या हेअरस्टाइलवर बंदी आहे. जर तुम्ही पहिल्यांदा अशाप्रकारची हेअरस्टाईल करताना दिसलात तर तुमचे मुंडन केले जाऊ शकते. आणि जर दुसऱ्यांदाही असे केल्यास तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो.

लग्न

अमेरिकेसारख्या विकसित देशातही काही विचित्र कायदे आहे. येथील एका राज्यात चक्क लग्नावर बंदी आहे. पण या बंदीमागचे कारणही तसेच आहे. नेब्रास्का राज्यात ज्या लोकांना STD आजार आहे, म्हणजे लैंगिक संक्रमित संसर्ग आहे, ते लोक लग्न करू शकत नाहीत. कारण अशाप्रकारे संक्रमित व्यक्तीने लग्नानंतर मुलं जन्माला घातले तर हा संसर्ग पुढच्या पिढीलाही होऊ शकतो.

लेस असलेले अंडरगारमेंट्स

ग्लॅमरस लुकसाठी अनेक महिला लेस असलेले अंडरगारमेंट वापरतात. परंतु रशिया, बेलारूस आणि कझाकस्तानमध्ये यावर बंदी आहे. स्पष्टपणे सांगायचे तर, ६ टक्क्यांपेक्षा कमी कॉटनचा वापर केलेल्या अंडरगारमेंट्सवर या देशांमध्ये बंदी आहे. ही बंदी २०१४ मध्ये लागू करण्यात आली होती.

कुत्र्याचा मालक

जर तुम्ही रोम, इटलीसारख्या देशात राहत असाल आणि तुम्ही कुत्र्यांची काळजी घेऊ शकत नसाल तर तुम्हाला त्यांचा मालक होण्याचा अधिकार नाही. येथे अशाप्रकारे कुत्र्याचा मालक असण्यास बंदी आहे. कुत्र्यांना रोज फिरायला घेऊन जाणे आणि त्यांची चांगली काळजी घेणे हा येथील कायदा आहे. असे न केल्यास ५७,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.

ब्लू जीन्स

उत्तर कोरिया आपल्या हुकूमशाही सत्तेसाठी कुप्रसिद्ध आहे. येथे असे अनेक नियम आहेत जे खूप विचित्र आहेत. असाच एक नियम म्हणजे उत्तर कोरियात ब्लू जीन्स घालण्यावर बंदी आहे. ब्लू जीन्स अमेरिकन संपत्ती आणि संस्कृतीशी संबंधित असल्याचे पाहिले जाते, म्हणून त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

लिप्सिंग 

अनेकांना त्यांचे आवडते गाणे वाजल्यानंतर ते गुणगुण्याची सवय असते. चित्रपटांमध्येही गायकाकडून गाणे गाऊन घेतले जाते आणि अभिनेता त्यावर फक्त लिप्सिंग करतो. पण तुर्कमेनिस्तानमध्ये लिप्सिंग करण्यावर बंदी आहे. २००५ मध्ये राष्ट्रपती सपारमूर्त नियाजो यांनी लिप्सिंगवर बंदी घातली होती जेणेकरून तेथील संगीत संस्कृतीचे संरक्षण करता येईल.

कॅसिनोमध्ये जुगार खेळणे

मोनॅको देशात अनेक कॅसिनो आहेत, परंतु त्यामध्ये जुगार खेळण्यास बंदी आहे. मात्र ही बंदी परदेशी नागरिकांवर नाहीत स्थानिक नागरिकांसाठी लागू आहे. इथे असे मानले जाते की, हे एक वाईट काम आहे जे केवळ परदेशी लोकांवर सोडले पाहिजे, तेथील स्थानिक लोकांनी त्यात गुंतू नये.

बेयॉन्से

जर तुम्हाला वाटत असेल की फक्त वस्तू किंवा कोणत्याही सेवेवर बंदी आहे, तर असे नाही. प्रसिद्ध गायिका बेयॉन्सेवरही मलेशियामध्ये बंदी आहे. प्रशासनाचे असे मत आहे की, तिचे अनेक शो खूप वादग्रस्त आणि बोल्ड असतात, त्यामुळे तिला मलेशियामध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.