Alimony : आज काल नवरा बायको या नात्यात न पटणं, नात्यात निर्माण झालेले मतभेद टोकाला जाणं यासह विविध कारणांमुळे घटस्फोट होतो. घटस्फोटाकडे एकेकाळी अरे बापरे घटस्फोटीत पुरुष किंवा घटस्फोटीत स्त्री अशा भावनेने म्हणजेच कलंकित भावनेने पाहिलं जायचं. मात्र आता ती परिस्थिती नाही. घटस्फोट सामंज्यसानेही घेतले जातात. तसंच घटस्फोटानंतरचा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे अॅलिमनी अर्थात पोटगीचा. पोटगीवरही कर लागतो का? हे आपण जाणून घेऊ.

पोटगीची रक्कम म्हणजे काय?

घटस्फोट झाल्यानंतर पतीकडून पत्नीला दिली जाणारी रक्कम म्हणजे पोटगी. ही रक्कम मासिकही असू शकते किंवा मालमत्तेचा एक मोठा हिस्सा देऊन वन टाइम सेटलमेंट म्हणूनही पोटगी दिली जाऊ शकते. जी स्त्री आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे अशा स्त्रीला घटस्फोटानंतर पतीकडून उदरनिर्वाहाच्या दृष्टीने जी रक्कम दिली जाते त्याला पोटगी म्हणतात. यावर टॅक्स लागतो का हे आपण जाणून घेऊ.

पोटगीवर कर लागतो का?

भारतात पोटगीच्या रक्कमेवर कर लागतो का? याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. भारतीय प्राप्तीकर कायद्याच्या अन्वये घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला मिळणाऱ्या पोटगीवर कर लागत नाही. सामान्यतः पोटगीची रक्कम ही करांच्या कक्षेत येत नाही. मात्र काही विशेष प्रकरणात पोटगीवरही कर द्यावा लागतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पोटगीवर कर भरावा लागणं हे त्यावर अवलंबून असतं की पोटगी नेमकी कुठल्या प्रकारात दिली जाते आहे? पोटगी देण्याचे तीन प्रकार आहेत. लंपसंप पेमेंट, मासिक पोटगी आणि वार्षिक पोटगी तसंच एक प्रकार मालमत्तेच्याबाबतीतही आहे. या बाबत करांचे नियम वेगवेगळे आहेत. जाणून घेऊ.

लंपसम पेमेंटच्या बाबतीतला नियम काय?

एखाद्या स्त्रीला तिच्या घटस्फोटानंतर लंपसम पेमेंट म्हणजेच एकदाच जी पोटगी दिली जाते ती करमुक्त असते. या रकमेला कॅपिटल रिसीट म्हटलं जातं. ही रक्कम म्हणजे कुठलंच उत्पन्न नसतं. त्यामुळे या रकमेवर कर लागत नाही.

मासिक किंवा वार्षिक पोटगी बाबतचा नियम काय?

एखाद्या स्त्रीला घटस्फोटानंतर तिचा पती मासिक किंवा वार्षिक ठराविक रक्कम पोटगी म्हणून देतो आहे तर ती रक्कम ही त्या स्त्रीचं उत्पन्न मानलं जातं आणि त्यावर कर लागतो. दिल्ली उच्च न्यायालयात मीनाक्षी खन्ना प्रकरणात या प्रकारचा निर्णय देण्यात आला. यामध्ये न्यायालयाने सांगितलं होतं की जर पोटगीची रक्कम वन टाइम सेटलमेंट लंपसम झाली तर त्यावर कुठलाही कर लागणार नाही. मात्र मासिक किंवा वार्षिक पोटगी द्यायची असेल तर ते उत्पन्न मानलं जाईल Income From Other Sources च्या अंतर्गत या प्रकारच्या पोटगीवर कर द्यावा लागेल.

मालमत्तेच्या वाटा पोटगी म्हणून दिल्यास कर लागतो का?

पती आणि पत्नी यांच्यात घटस्फोट झाल्यानंतर मालमत्तेचे वाटा हा पोटगी म्हणून दिला गेला तर ती मालमत्ता ट्रान्सफर कधी झाली? यावर कर लागणं किंवा न लागणं अवलंबून असतं. उदाहरणार्थ घटस्फोटाच्या आधीच जर पत्नीच्या नावे एखादी मालमत्ता पतीने केली असेल तर त्याला गिफ्ट मानलं जातं. अशा प्रकारच्या मालमत्ता ट्रान्सफरवर कुठलाही कर लागत नाही.

मात्र घटस्फोटानंतर पती आणि पत्नी हे नातं संपतं त्यामुळे घटस्फोटानंतर मालमत्ता ट्रान्सफर करण्यात आली तर त्यावर कर भरावा लागतो. तसंच सदर जमीन किंवा घर यातून काही उत्पन्न मिळत असेल उदाहरणार्थ घरभाडे किंवा तत्सम प्रकारचं उत्पन्न तर त्यावरही कर द्यावा लागतो.

पत्नीला पोटगी देणाऱ्या पतीला करात सवलत मिळते का?

घटस्फोटित पत्नीला पोटगी देणाऱ्या पतीला करामध्ये कुठलीही सवलत मिळत नाही. बॉम्बे हायकोर्टाच्या एका निकालानुसार पतीच्या पगारातून पत्नीला दरमहा दिली जाणारी रक्कम ही करपात्र ठरते. NDTV ने हे वृत्त दिलं आहे.