Fear Of Small Holes: ट्रायपोफोबिया हा इंटरनेटवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या फोबियांपैकी एक आहे पण आश्चर्य म्हणजे नेमका याचा अर्थ काय आणि तुम्हाला याचा त्रास आहे की नाही हे कसे ओळखायचं हे अनेकांना माहित नसतं. सुरुवातीला आपण हा शब्द काय आहे हे पाहूया. ट्रायपोफोबियाची फोड करताच ट्रायपो + फोबिया हे दोन शब्द पुढे येतात. यातील ट्रायपोचा अर्थ होतो लहान छिद्र आणि फोबिया म्हणजे भीती. यानुसार ट्रायपोफोबिया म्हणजे लहान छिद्रांची भीती.
नॅशनल जिओग्राफिकच्या माहितीनुसार, हा शब्द २००९ च्या वेळी शब्दकोषात समाविष्ट झाला. SUNY-Albany मधील एका विद्यार्थ्याने हा शब्द तयार केला होता. २०१३ ला प्रकाशित ‘फिअर ऑफ होल्स’ हेडिंग असलेल्या अभ्यासात एसेक्स विद्यापीठातील दोन संशोधकांनी याविषयी माहिती दिली होती. या अभ्यासात सहभागी असलेल्या २८६ प्रौढांपैकी १६ टक्के लोकांना लहान छिद्र पाहून किळस वाटत असल्याचे नोंदवले गेले होते. त्यांनी असा सिद्धांत मांडला की, काही कोळी, साप आणि विंचू यांसारख्या प्राण्यांच्या अंगावर अशा खुणा असल्याने त्यांच्याविषयी सुद्धा काही व्यक्तींना घृणा वाटते.
कॉग्निशन अँड इमोशन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या केंट युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात आणखी एक सिद्धांत मांडला होता. अभ्यासाचे लेखक टॉम कुफर म्हणाले की, “संसर्गजन्य रोग आणि रोगजनकांपासून दूर राहण्याची आपली मानसिकता असते लहानश्या छिद्रांचे फोटो हे अनेकांमधील आजारांची भीती जागृत करते परिणामी त्यांना पाहिल्यावर किळस किंवा भीती वाटू शकते.”
दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, या छिद्रांमुळे काही लोकांना आजारांचा भास होतो. उदाहरणार्थ कांजण्या, गोवर, टायफस सारखे आजार ज्यात शरीरावर लहान छिद्र किंवा व्रण उमटतात यामुळे छिद्रांचे फोटो पाहिल्यावर लोकांना या आजारांचा भास होऊन भीती वाटू शकते.
यासंदर्भात झालेल्या एका अभ्यासात ३०० सहभागी प्रतिनिधींना १६ फोटो दाखवण्यात आले होते, यातील ८ फोटो हे आजारांनी ग्रस्त शारीरिक अवयवाचे होते तर ८ फोटो हे आजाराशी संबंधित नसलेल्या लहान छिद्रांचे होते, जसे की, विटांचे छिद्र, कमळाच्या बिया.. या फोटोंवर प्रतिक्रिया देताना ट्रायपोफोबिक गटाला आजाराशी संबंधित नसलेल्या फोटोंना पाहून सुद्धा किळस वाटल्याचे नोंदवण्यात आले होते.
कॉफीचे बुडबुडे हे अभ्यासात चाचणी केलेल्या ट्रायपोफोबिया ट्रिगर्सपैकी एक होते.
दरम्यान, लक्षात घ्या ट्रायपोफोबिया हा रोग नाही तुम्हाला जर भीती किंवा किळस वाटत असेल तरी त्यामुळे शारीरिक स्थिती बिघडण्याची शक्यता नगण्य असते. पण मानसिक अस्वास्थ्य जाणवत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या