श्री ४२० हा चित्रपट १९५५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती राज कपूर यांनी केली होती. यामध्ये नर्गिस, नादिरा आणि स्वतः राज कपूर हे मुख्य भूमिकेत होते. यातील ‘रमैया वस्तावैय्या’ हे गाणे प्रचंड गाजले. ६८ वर्षांनंतरही लोकांच्या ओठावर हे गाणे ऐकायला मिळत आहे. आता पुन्हा हे गाणे चर्चेत आले आहे ते म्हणजे शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ चित्रपटामुळे.

शाहरुखच्या आगामी ‘जवान’ चित्रपटात या गाण्याचे मुख्य शब्द ‘रमैया वस्तावैय्या’ वापरुन एक रिमेक गाणे नुकतेच सादर करण्यात आले. कित्येक वर्षांपासून लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून बसलेलं हे गाणं आणि यामागील एक खास किस्सा आपण जाणून घेणार आहोत. ‘रमैया वस्तावैय्या’ हे गाणं नेमकं कसं सुचलं? त्यातील या शब्दांचा अर्थ नेमका काय? यामागे एक रंजक कथा आहे, तीच आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा : ‘जवान’मध्ये दाक्षिणात्य कलाकारांची मांदियाळी का? बॉलिवूडच्या ‘या’ स्ट्रॅटेजीविषयी जाणून घ्या

राज कपूर यांच्या चित्रपटातील ‘रमैया वस्तावैया’ या गाण्याचे शब्द शैलेंद्र यांनी लिहिले होते. लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि मुकेश यांनी याला आवाज दिला तर शंकर-जयकिशन, हसरत जयपुरी आणि शैलेंद्र यांना चित्रपटातील गाणी संगीतबद्ध करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी हे चौघे बऱ्याचदा खंडाळ्याला जायचे, तिथे हायवेच्या कडेला असलेल्या ढाब्यावर थांबायचे.

यावेळीही हे चौघे त्याच ढाब्यावर गेले होते. तिथे काम करणाऱ्या वेटरचे नाव रमैय्या असे होते. शंकर हैदराबादमध्ये लहानाचे मोठे झाले असल्याने त्यांना तेलुगू भाषा येत होती. शंकर यांनी रमैय्याला तेलुगूमध्ये ऑर्डर देण्यासाठी बोलावले. पण तो व्यस्त होता. काहीवेळ शंकर त्याला म्हणाले ‘वस्तावैय्या?’ तेलुगूमध्ये याचा अर्थ इथे येणार की नाही? यानंतर शंकर ‘रमैया वस्तावैया’ गुणगुणायला लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मग काय, रमैया वस्तावैय्यापुढे शैलेंद्रने ‘मैने दिल तुझको दिया’ जोडले आणि ते अशाप्रकारे हे अजरामर गाणे जन्माला आले. हे गाणे चित्रपटात वापरण्यासाठी राज कपूर यांनी एक खास सीनही तयार केला होता. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटामुळे पुन्हा हे गाणे चर्चेत आले आहे. ‘जवान’ ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.