विमानानं फिरायला सर्वांनाच आवडतं. तुम्हीही कधीतरी विमानात बसला असालच. दरम्यान, यावेळी तुम्हालाही विमान उड्डाण करण्यापूर्वी एक मोठा आवाज आलाच असेल. त्या आवाजाने अनेक प्रवासी घाबरतातही; मात्र हा आवाज कसला असतो याबद्दल जाणून घेऊ…
एअरबस ए३२० आणि एअरबस ए३३० यांसारख्या विशिष्ट विमानांमधील प्रवाशांना अनेकदा एक विशिष्ट आवाज ऐकू येतो. उड्डाण करतानाचा हा आवाज अनेकदा त्रासदायक, विचित्र वाटू शकतो किंवा तुम्हाला तुमच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटू शकते. त्यामुळे तुम्हाला नेहमीच या अनोख्या आवाजाबद्दल अधिक जाणून घेण्यात रस असेल किंवा तो आकर्षक वाटत असेल, तर याबद्दल जाणून घेऊ…
एक विमान पाच प्रकारचे आवाज निर्माण करते. टेकऑफ करण्यापूर्वी तुम्हाला ऐकू येणारा पहिला आवाज हा एक मोठा आवाज असतो. विमान उड्डाण करण्यापूर्वी आणि हवेत गेल्यानंतर, तुम्हाला चक्राकार आवाज ऐकू येतो. मात्र, ही फक्त एक नियमित विमान यंत्रणा आहे, असे ‘एव्हिएशन ट्रेनिंग इंडिया’चे संस्थापक कर्नल राजगोपालन यांनी स्पष्ट केले.
दाब राखण्यासाठी स्वयंचलितपणे कार्यरत असलेल्या हायड्रॉलिक पंपचा आवाज आहे. सिंगल-इंजिन टॅक्सी ऑपरेशन्सदरम्यान पॉवर ट्रान्स्फर युनिट (PTU) मुळे हे घडते. राजगोपालन यांच्या मते, विमान उड्डाणादरम्यान व उड्डाणापूर्वी इंधन वाचविण्यासाठी, एका इंजिनावर स्विच करते आणि उड्डाणापूर्वी होल्डिंग पॉइंटजवळ असतानाही ते चालू राहते. “जेव्हा एक इंजिन कार्यरत असते, तेव्हा फक्त एक हायड्रॉलिक सिस्टीम कार्यरत असते. दुसरे इंजिन असंतुलित (अद्याप चालू केलेले नाही) होते, ज्यामुळे दबाव निर्माण होतो. म्हणूनच हा विशिष्ट आवाज येतो,” ते म्हणाले.
सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा PTU सक्रिय होते, तेव्हा ते दोन हायड्रॉलिक सिस्टीममध्ये वेगाने स्विच करते, ज्यामुळे हायड्रॉलिक द्रवपदार्थाचा परस्पर प्रवाह निर्माण होतो. या परस्पर क्रियांमुळे मोठा आवाज निर्माण होतो.
हा आवाज इंजिनामधील कोणत्याही समस्येचे किंवा धोक्याचे लक्षण नाही आणि तो A320 च्या हायड्रॉलिक सिस्टीम ऑपरेशनचा नियमित भाग आहे. “यात काळजी करण्यासारखे काही नाही. हा विमानाच्या यंत्रणेचा एक भाग आहे,” असे राजगोपालन यांनी ठामपणे सांगितले. राजगोपालन म्हणाले की, A320 मधील PTU हे एक हायड्रॉलिकली पॉवर्ड युनिट आहे, जे विमानाच्या दोन हायड्रॉलिक सिस्टीममध्ये किमान दाब राखण्यासाठी अस्तित्वात आहे.