scorecardresearch

भूकंप आलाच तर जीव वाचवण्यासाठी काय कराल?

भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती उद्भभवल्यास या गोष्टी लक्षात ठेवा.

earthquake safety tips
भूकंप आल्यावर काय करावे?

सोमवारपासून टर्की आणि सीरियामधील काही भागांमध्ये पाच मोठे भूकंपाचे धक्के बसले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. हजारोंच्या संख्येमध्ये नागरिक जखमी झाले आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे या परिसरामधील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. इमारती, घरांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मदत म्हणून भारतामधील काही एनडीआरएफच्या टुकड्या टर्कीमध्ये पाठवण्यात आल्या आहेत.

भारतामध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. याचे प्रमाण कमी असल्यामुळे भूकंपाबाबत जागरुकता तुलनेने कमी आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरामध्ये भूकंपसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये तेथील एक इमारत कोसळली. या अपघातामध्ये त्या इमारतीमध्ये सहा वर्षीय मुस्तफा थोडक्यात बचावला. घरच्या पलंगाखाली लपून राहिल्याने त्याला फारशी इजा झाली नव्हती. ही कृती करण्याची प्रेरणा डोरेमॉन या कार्टूनमधील नोबिता पात्राकडून मिळाल्याचे त्याने सांगितले. कार्टूनच्या एका भागामध्ये भूकंप आल्यावर काय करायचे हे दाखवण्यात आले होते, तेच पाहून मुस्तफाने आपला जीव वाचवला होता.

विश्लेषण : भूकंप दरवर्षी का होतात? त्यामागचं वैज्ञानिक कारण काय?

भूकंप सुरु असताना काय करावे?

  • सर्वप्रथम शांत राहा. घाबरु नका. घाबरल्यामुळे चुकीचे निर्णय घेऊ शकता.
  • आधी स्वत:ची काळजी घ्या. शक्य असेल तेव्हाच इतरांना मदत करा.

घर, ऑफिस, शाळा अशा ठिकाणी असल्यास –
– पलंग, टेबल यांच्या खाली लपून राहा. यामुळे छतावरुन कोसळणाऱ्या गोष्टींपासून तुमचे रक्षण होईल.
– खिडकी, काचा, आरशा यांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा.
– इमारतीमध्ये असल्यास लिफ्टचा वापर करणे टाळा. आधीच लिफ्टमध्ये असल्यास पुढच्या मजल्यावर उतरण्याचा प्रयत्न करा.
– जेवण बनवत असल्यास गॅस-सिलेंडर लगेच बंद करा. मेणबत्ती किंवा काडीपेटीचा वापर टाळा.
– घरामध्ये पाळीव प्राणी असल्यास त्यांना मोकळं सोडा, जेणेकरुन त्यांना हालचाल करता येईल.

Turkey Fifth Earthquake : टर्कीमध्ये पाचवा भूकंप! शेकडो इमारती जमीनदोस्त, मृतांचा आकडा ५००० वर

घराबाहेर असल्यास –
– उंच इमारती, मोठ्या झाडांपासून लांब राहा. मोकळ्या जागी राहण्याचा प्रयत्न करा.
– गाडी चालवत असल्यास वेग कमी करत सुरक्षित जागा पाहून गाडी थांबवा आणि गाडीबाहेर पडा.
– शहरामध्ये गाडी चालवत असल्यास उड्डाण पूलांच्या खाली उभे राहू नका.

भूकंप बंद झाल्यानंतर काय करावे?

– शक्य झाल्यास टिव्ही, रेडिओ किंवा मोबाईलद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.
– परिस्थिती निवळल्यावर इतरांना मदत करायला जा.
– स्वयंपाकघरामधील सिलेंडर ताबडतोब बंद करा. तसेच विद्युत उपकरणांचा वापर करु नका.
– मोकळ्या जागी जाण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये असल्यास दरवाजा किंवा खिडक्या उघडताना काळजी घ्या.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 15:07 IST