पुणे शहर म्हणजे जिथे माणसाची वर्दळ असते, वाहनांची ये-जा नेहमी सुरू असते. या गजबजलेल्या पुण्यात हे एक असे मंदिर आहे, जे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. एका टेकडीवर देवीआईचा वास आहे आणि ती टेकडी म्हणजे तळजाई टेकडी. या टेकडीवरच तळजाईमातेचे मंदिर आहे. पुणेकरांसाठी तळजाई टेकडी म्हणजे मोकळा श्वास घेण्यासाठी हाकेच्या अंतरावर असलेले ठिकाण. तळजाई टेकडी ही स्वारगेटपासून जवळ आहे. तिथे एक पक्षी अभयारण्य आहे. तळजाई टेकडी हे चांगले पर्यटनस्थळही आहे. आज तळजाई टेकडीला भेट देणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढत आहे; पण या मंदिराचा इतिहास फार मोजक्याच लोकांना माहीत आहे. म्हणूनच पुणेकरांच्या आवडत्या तळजाई टेकडीवर ‘ही’ देवी आई कशी वसली? काय आहे या तळजाई देवीची गोष्ट? जाणून घेऊ या…

कधीही पाणी न आटणाऱ्या तळ्यातील देवीआईची गोष्ट

शा. ग महाजन लिखित ‘पुणे शहरातील मंदिरे’ या पुस्तकानुसार पाचगाव पर्वती अभयारण्याजवळ तळजाईचा डोंगर आहे. या परिसरामध्ये रावबहादूर ठुबे यांचे वास्तव्य होते. ते देवीचे निस्सीम भक्त होते. आज ज्या ठिकाणी हे मंदिर आहे, त्या मंदिराच्या मागे एक तळे आहे. असे म्हटले जाते, “हे तळं कधीच आटत नाही.” आजही या तळ्यामध्ये पाणी असल्याचे पाहायला मिळते. ठुबे यांना देवीने दृष्टांत दिला होता, “मी तळजाई टेकडीवरील तळ्यात आहे. मला बाहेर काढ.” त्यानंतर या ठुबे यांना तळ्यामध्ये लक्ष्मी, पद्मावती, तुळजापूरची भवानीमाता” अशा तांदळा स्वरूपातील मूर्ती सापडल्या.

देवीला ‘तळजाई’ हे नाव कसे पडले?

तळ्यात सापडलेल्या देवीच्या मूर्तीला तळजाई देवी हे नाव देण्यात आले होते. त्यानंतर ठुबे यांनी तिन्ही देवींची प्राणप्रतिष्ठा केली. ते हयात असेपर्यंत त्यांनी या देवीची सेवा केली; पण ते गेल्यानंतर हा परिसर ओस पडला. त्यानंतर काही वर्षं हा परिसर निर्मनुष्यच होता. तळजाई टेकडीवर तळजाईमातेचे मंदिर ठुबे यांनी नक्की कधी उभारले याची माहिती सध्या तरी उपलब्ध नाही.

हेही वाचा – ताज हॉटेल जुनं की गेट वे ऑफ इंडिया? या ऐतिहासिक वास्तूंचा रंजक इतिहास जाणून घ्या

हेही वाचा – ‘हुजूरपागा’ शाळा आणि पेशवाईचा काय आहे संबध? जाणून घ्या रंजक इतिहास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणी केले मंदिराचे पुनरुज्जीवन?

काही वर्षांनंतर देवीने आणखी एका भाविकाला दृष्टांत दिला आणि ते भक्त होते आप्पा थोरात. त्यानंतर थोरात यांनी देवीची सेवा पुन्हा सुरू केली. त्यानंतर थोरात यांनी मंदिराचा गाभारा बांधला. समोर सभामंडप बांधला. प्रवेशद्वाराशेजारी डाव्या बाजूला छोटे मारुतीचे मंदिर उभारले. त्यानंतर तळ्याकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग तयार केला. त्यानंतर येथे भाविकांचा वावर सुरू झाला. येथे नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो. या ऐतिहासिक मंदिराच्या पुनरुज्जीवनाची कामे गेल्या काही वर्षांत झाली आहेत. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराने या मंदिराच्या वैभवात आणखी भर घातली. तुम्ही कधी तळजाई टेकडीला भेट दिली नसेल, तर आता नक्की भेट द्या.