गुगल मॅपचा वापर हल्ली आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतो. प्रत्येक मोबाईलमध्ये गुगल मॅपच्या मदतीने आपलं सध्याचं लोकेशन, समोरच्याचं लोकेशन, कुठून कुठे किती वेळात पोहोचणार याची इत्थंभूत माहिती आपल्याला एका क्लिकवर मिळते. पण यातली सर्वात महत्त्वाची माहिती मिळते ती म्हणजे कोणत्या मार्गे आपण प्रवास करणार आहोत किंवा करायचा आहे. हे मार्ग गुगल मॅपवर निळ्या, लाल, पिवळ्या अशा रंगांमध्ये दाखवले जातात. या रस्त्यांना दिलेल्या क्रमांकांमुळे आपल्याला पत्ते सांगणं आणि शोधणं सोपं होऊन जातं. मग ते गुगल मॅपवर असो किंवा प्रत्यक्ष कागदावरच्या नकाशावर! पण या रस्त्यांना हे क्रमांक दिले कसे जातात? जाणून घेऊयात!

आकड्यांचा खेळ सारा!

तर हा सगळा खेळ आकड्यांचा आहे. आपल्याला अगदी NH1 अर्थात राष्ट्रीय महामार्ग १ ते अगदी तीन अंकी क्रमांक असलेले महामार्गही पाहायला मिळतात. उदाहरणार्थ पुणे-मुंबई हा प्रसिद्ध एक्स्प्रेसवे अर्थात द्रुतगतीमार्ग क्रमांक आहे NH48. त्यामुळे नकाशावर हव्या त्या ठिकाणाचा मार्ग शोधायचा असेल, तर आपल्याला हे क्रमांक माहिती असणं आवश्यक ठरतं. या महामार्गांना हे क्रमांक देण्याची मोठी रंजक पद्धत वापरली जाते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI ची १९८८ साली स्थापना करण्यात आली. तेव्हापासून देशातील सर्व महामार्गांची देखभाल व व्यवस्थापन एनएचएआयकडून केलं जातं. या व्यवस्थापनाकडून देशात सुमारे दीड लाख किलोमीटरहून जास्त लांबीच्या महामार्गांचं व्यवस्थापन केलं जातं. हे काम अधिक सुलभ व्हावं, यासाठी महामार्गांना क्रमांक देण्याची पद्धत उपयोगी ठरली.

कसे दिले जातात क्रमांक?

महामार्गांना हे क्रमांक देण्यासाठी आकड्यांचं जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व आहे दिशांचं. या दोन्ही गोष्टींचा वापर करून कोणत्या महामार्गाला कोणता क्रमांक द्यायचा, हे ठरवलं जातं. यात प्रामुख्याने महामार्गांचे दोन प्रकार पडतात.

पहिला पूर्व-पश्चिम किंवा पश्चिम-पूर्व महामार्ग. अशा महामार्गांना विषम संख्या क्रमांक म्हणून दिली जाते. ही क्रमवारी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. उदाहरणार्थ, लेह ते उरी हा देशाच्या पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे जाणारा महामार्ग आहे. तो देशाच्या सर्वात उत्तरेकडे आहे. त्यामुळे त्याचा क्रमांक NH01 आहे.

अशा प्रकारे पूर्व-पश्चिम जाणाऱ्या सर्व महामार्गांचे क्रमांक विषम पद्धतीने दक्षिणेपर्यंत जातात. दक्षिणेकडे सर्वात शेवटी तमिळनाडूच्या थुंदीपासून केरळमधल्या कोचीपर्यंत येणाऱ्या महामार्गाला NH85 हा क्रमांक देण्यात आला आहे.

‘गौडबंगाल’ हा शब्द मराठी भाषेला कसा मिळाला? काय आहे नेमका अर्थ?

उत्तर-दक्षिण दिशा असणाऱ्या महामार्गांचा समावेश दुसऱ्या प्रकारात होतो. या महामार्गांना सम संख्या क्रमांक म्हणून दिली जाते. हे आकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढत जातात. उदाहरणार्थ, आसाममधील दिब्रुगड ते मिझोरममधील तुईपंगकडे येणाऱ्या महामार्गाला NH02 क्रमांक देण्यात आला आहे. तर सगळ्यात पश्चिमेकडे पंजाबमधल्या अबोहरपासून राजस्थानमधल्या पिंडवाडापर्यंत येणाऱ्या महामार्गाला NH62 क्रमांक देण्यात आला आहे.

तीन अंकी महामार्ग!

पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण अशा दोन महामार्गांना सम व विषम संख्या क्रमांक म्हणून दिली जाते. पण हे सगळे क्रमांक दोन अंकी आहेत. काही महामार्गांना तीन अंकी क्रमांक दिले जातात. त्यांना सबसिडियरी अर्थात सोप्या शब्दांत उपमहामार्ग म्हणतात. हे महामार्ग एका मुख्य महामार्गाला जोडलेल्या उपशाखाच असतात.

उदाहरणार्थ NH44 अर्थात ४४ क्रमांकाच्या महामार्गाच्या तीन उपशाखांना NH144, NH244 आणि NH344 असे क्रमांक देण्यात आले आहेत. त्यांचे शेवटचे दोन आकडे म्हणजे त्या मुख्य महामार्गाचा क्रमांक असतो. तर पहिला आकडा सम आहे की विषम यावरून त्याची दिशा कोणती याची माहिती मिळते. उदाहरणार्थ १४४ क्रमांकाच्या महामार्गाचा पहिला आकडा १ अर्थात विषम संख्या आहे. त्यामुळे त्याची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असेल. तर २४४ क्रमांकाच्या महामार्गाचा पहिला आकडा २ अर्थात विषम संख्या आहे. त्यामुळे त्याची दिशा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारी असेल.

Story img Loader