सद्य:स्थितीत शेती व्यवसायात उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांचे भन्नाट नवनवे प्रयोग सुरू आहेत. त्यात आपण अनेक वेळा ऐकले असेल की, शेतकऱ्यांचे फळबागेतून मिळणारे उत्पन्न घटत आहे. मात्र, अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खंडाळा तालुक्यातील ७१ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात नवीन प्रयोग केला आहे. आधुनिक फळबागेची लागवड करत लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. मेक्सिको या देशात होणाऱ्या ड्रॅगन फ्रुटची बाग शंकर पवार यांनी आपल्या शेतात फुलवली आहे. विशेष म्हणजे त्यांना या पिकाबद्दल फारशी माहिती नव्हती, तसेच कोणत्याही प्रकारचे खास प्रशिक्षणही त्यांनी घेतलेले नाही. त्यामुळे त्यांनी चक्क यूट्युबवरून धडे घेत या ड्रॅगन फ्रुटची यशस्वी लागवड केली. तसे बघायला गेले तर गाव अगदी छोटेसे, सतत पाण्याची कमतरता आणि खडकाळ जमीन यामुळे अधिक उत्पन्न मिळणे कठीण होते. मात्र इच्छाशक्ती, कष्ट यांना योग्य व्यवस्थापनाची जोड दिल्यास हमखास यश मिळते हे शंकर पवार या शेतकऱ्याने दाखवून दिले. चला तर मग पाहू या या प्रयोगशील शेतकऱ्याची ही प्रेरणादायी यशोगाथा.

खडकाळ माळावर ‘ड्रॅगन फ्रुट’ची बाग –

पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा वर्षाअंती हिशेब केला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यापुढे कर्जाचा डोंगर उभा राहून त्यातून सावरताना नाकीनऊ येतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी शंकर पवार यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकरी निश्चितच प्रगती साधू शकतो हे दाखवून दिले आहे. खंडाळा या दुष्काळी तालुक्यातील वहागाव (अहिरे) येथील शंकर विष्णू पवार यांनी सेंद्रिय ‘ड्रॅगन फ्रुट’ची बाग फुलवली आहे. शंकर पवार हे पूर्वी मुंबईत व्यवसाय करीत होते. त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे जमीन मिळाली आहे. त्यानंतर व्यवसायातून निवृत्ती घेतल्यानंतर ते गेली सहा-सात वर्षे गावी राहत आहेत. आता ड्रॅगन फ्रुट या विदेशी समजल्या जाणाऱ्या फळाचीदेखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. खंडाळ्यासारख्या दुष्काळी भागात खडकाळ जमिनीवर पाण्याविना फळबाग फुलवणे तितके सोपे नव्हते. मात्र त्यांनी योग्य मार्गदर्शन, व्यवस्थापन करत हा प्रयोग यशस्वी केला.

Wardha, dr babasaheb ambedkar jayanti, 15 days Campaign Launched , Caste Validity Certificate, Backward Class Students, caste validity for admission, caste validity for student,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्व, घ्या विशेष मोहिमेत जात पडताळणी प्रमाणपत्र
Funny Answer Sheets Viral
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांने सांगितला नवा उपाय; व्हायरल उत्तरपत्रिका वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात
Record Number of Students Register for MHTCET
अभियांत्रिकी, औषधनिर्माण प्रवेशासाठी स्पर्धा, सीईटीसाठी किती विद्यार्थ्यांची नोंदणी?
UPSC Recruitment 2024 Recruitment Process Is Being Conducted By Central Public Service Commission For The Posts Of Economic Officer
UPSC Recruitment 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; १ लाखांपेक्षा अधिक पगार, ‘या’ पदासाठी भरती सुरू

ठिबकसिंचनाचा अवलंब करून पाण्याची बचत –

शंकर पवार यांनी ड्रॅगन फ्रुटच्या बागेसाठी स्वतःची विहीर खोदली. सिंचनासाठी ठिबकसिंचनाचा वापर केला आहे. यामुळे पाण्याची बचत तर झालीच, पण विजेचीही बचत झाली. त्यानंतर पवार यांनी फळबागेसाठी ओसाड, खडकाळ जमीनचे सपाटीकरण करून ड्रॅगन फ्रुट लावण्यासाठी योग्य जागा तयार करून घेतली. यूट्युबवरून यासंदर्भात वेळोवेळी धडे घेत ड्रॅगन फ्रुटच्या इतर बागांना भेटी देत सर्व शेती पद्धत समजून घेतली. साधारणत: फळबाग उभारेपर्यंत ९ ते १० लाख रुपये खर्च आला असून योग्य व्यवस्थापन आणि मेहनतीमुळे ड्रॅगन फ्रुटची शेती आता ओसाड माळरानावर फुलली आहे.

सध्या ड्रॅगन फ्रुटला १२० ते १८० रुपये दर –

अलीकडच्या काळात राज्यात ड्रॅगन फ्रुटची लागवड वाढली आहे. सध्या ड्रॅगन फ्रुटला प्रति किलोस १२० ते १८० रुपये असा दर मिळत आहे. गत पंधरा ते वीस दिवसांपेक्षा दरात प्रति किलोस २० ते ३० रुपयांनी सुधारणा झाल्याने ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या आहारात ड्रॅगन फ्रुटचा वापर वाढलाय. डॉक्टरांकडूनदेखील ड्रॅगन फ्रुट खाण्याचा सल्ला दिला जातोय. त्यामुळे या फळास बाजारपेठेत मोठी मागणी आहे. ड्रॅगन फ्रुट हे एक प्रकारचे विदेशी फळ आहे. हे फळ दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक व आरोग्यदायी असल्याने लोकांमध्ये त्याचे आकर्षण वाढत आहे. ड्रॅगन फळाचे शास्त्रीय नाव हायलोसीरीयस अंडाटस असून कॅक्टस- कोरफड वर्गातील ही वनस्पती आहे. कोरडवाडू शेती म्हणजेच पाण्याची टंचाई असलेल्या क्षेत्रातदेखील हे पीक चांगल्या प्रकारे येते. ही झाडे कायमची जळून जात नाहीत. चांगला दर मिळाल्यास एकरी उत्पादनदेखील चांगले मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल या फळलागवडीकडे वाढता आहेत.

फळाचे गुणधर्म तरी काय? –

‘ड्रॅगन फ्रुट’ ही निवडुंग वेल आहे. त्यामुळे कोणत्याही जनावरापासून या पिकाला धोका नाही. याचे उगमस्थान मध्य अमेरिका असून आता उष्ण प्रदेशातही याचे उत्पन्न घेतले जाते. याची वेल छत्रीसारखी वाढत असल्याने तिला द्राक्षासारखा आधार द्यावा लागतो. त्यामुळे शेतामध्ये स्तंभ (पोल) उभारावे लागतात. झाडाचे आयुर्मान २८ ते ३० वर्षे असल्याने दीर्घकालीन उत्पादन मिळते. जुलै ते डिसेंबर या कालावधीत एका झाडाला ४० ते १०० फळे लागतात. यात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कॅल्शियम, फॉस्फरस, जीवनसत्त्व ब व क असे अन्नघटक असल्याने मधुमेह, कोलेस्टेरॉल, संधिवात, दमा, कर्करोग, डेंग्यू आदी आजारांवर गुणकारी आहेत.

दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनीही पारंपरिक शेती करतानाच आधुनिक शेतीतंत्राचा वापर करून उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन शंकर पवार यांनी शेतकऱ्यांना केले आहे.