Why is Snapchat logo a ghost? स्नॅपचॅट (Snapchat) हे आजच्या तरुण पिढीतील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक मानले जाते. परंतु, तुम्ही कधी विचार केला आहे का की, या प्लॅटफॉर्मच्या लोगोमध्ये नेमकं भूताचंच चित्र का वापरलं गेलं असावं? आणि तेही एक हसतमुख, हलकं- फुलकं भूत?
स्नॅपचॅटने आपला लोगो म्हणून भूत निवडण्यामागे काही खास आणि विचारपूर्वक कारणं आहेत. या लोगोचं नाव Ghostface Chillah आहे. Ghostface Chillah हे नाव प्रसिद्ध रॅपर Ghostface Killah च्या नावावरून घेण्यात आलं आहे.
तात्कालिकता आणि अदृश्यता (नजरेस न दिसणारे) यांचं प्रतीक
स्नॅपचॅटवर पाठवलेले फोटो, व्हिडीओ आणि मेसेजेस हे पाहिल्यानंतर काही वेळातच आपोआप नाहीसे होतात. भूत म्हणजे अदृश्य होणं, क्षणभंगुरता आणि विस्मृती हेच त्या भूताच्या प्रतिमेद्वारे दर्शवण्यात आलं आहे. हा लोगो वापरकर्त्यांना सांगतो की, “तुमचं इथे जे काही आहे ते काही या क्षणासाठीच आहे… जसं की भूत!”
तरुणांशी जुळणारी मजेदार ओळख/Less social media. More Snapchat.
Ghostface Chillah हे हसतं, खेळकर आणि फाजील गडबड करणाऱ्या स्वभावाचं भूत आहे. ते गांभीर्याला फाटा देऊन सोशल मीडियावरील वातावरण अधिक हलकं आणि आनंददायक करण्याचा प्रयत्न करतं. स्नॅपचॅटचं ग्राहक म्हणून मुख्य लक्ष्यही तरुण वर्गच असल्यामुळे हा लोगो त्यांच्यासाठी आकर्षक ठरतो.

स्मरणीय, ओळखण्यास सोपं ब्रँडिंग
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या गर्दीत स्नॅपचॅटचा लोगो लगेच लक्ष वेधून घेतो. त्यांचे पांढराशुभ्र भूत पिवळ्या पार्श्वभूमीवर ठसठशीतपणे उठून दिसतं. हा लोगो कोणत्याही अॅप आयकॉनमध्ये लगेच ओळखता येण्याजोगा आहे.
जगभरातील लोकप्रियता आणि वापर
सध्या दररोज १९० दशलक्षांहून अधिक वापरकर्ते स्नॅपचॅट वापरत आहेत. फोटो शेअरिंग, स्टोरीज, AR फिल्टर्स, Bitmoji आणि ‘Snap Map’ यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे हा प्लॅटफॉर्म संवादाच्या पारंपरिक मार्गांना मागे टाकत आहे. यामध्ये ‘भूता’च्या लोगोचं महत्त्वाचं योगदान आहे. ते प्लॅटफॉर्मची असलेली मूळ भावना प्रकट करतं.
स्थापकांचे दृष्टिकोन
स्नॅपचॅटचे सह-संस्थापक इव्हान स्पीगेल आणि त्यांच्या टीमने सुरुवातीला यासाठी एक असा लोगो शोधायचं ठरवलं होतं की तो गंभीर आणि पारंपरिक नसून मजेदार आणि अनोखा असेल. त्यामुळे त्यांनी Ghostface Chillah या प्रतिकात्मक भुताला निवडलं. “आम्ही एक असं काहीतरी शोधत होतो, जे बाजारात वेगळं दिसेल आणि गंमतीशीरही वाटेल,” असं त्यांनी मत व्यक्त केलं होतं.
भूत म्हणजे फक्त भीती नव्हे, डिजिटल युगात अदृश्यता (नजरेस न दिसणारे), मजा आणि तरुणाईच्या संवादशैलीचं प्रतीक ठरू शकतं, हे स्नॅपचॅटने सिद्ध करून दाखवलं आहे. Ghostface Chillah हा लोगो आज केवळ एक आयकॉन नाही, तर तो सोशल मीडियाच्या नव्या परिभाषेचं प्रतिनिधीत्व करतो.