Most Connected Railway Station in India: भारतात रेल्वे ही सर्वांत मोठी आणि महत्त्वाची वाहतूक व्यवस्था आहे. लांबचा प्रवास करण्यासाठी सर्वांत सोईस्कर आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था आहे. कमी खर्चात, आरामदायक आणि देशाच्या जवळपास प्रत्येक भागात पोहोचणारी ही सेवा प्रत्येक प्रवाशासाठी महत्त्वाची असते. पण अनेक वेळा आपल्याला ज्या गावी जायचं असतं, तिथे आपल्या जवळच्या स्थानकावरून थेट ट्रेन नसते. त्यामुळे प्रवासात दोन-तीन वेळा बदल करावे लागतात, वेळही जास्त लागतो व प्रवासही त्रासदायक होतो. पण भारतात एक असे रेल्वेस्थानक आहे, जिथून तुम्हाला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाणारी ट्रेन सहजपणे मिळू शकते. हो, अगदी कोणत्याही दिशेला जाणारी. देशातलं एकमेव असं रेल्वेस्थानक कुठे आहे ते जाणून घ्या…
हे स्थानक उत्तर मध्य रेल्वे विभागात मोडते आणि देशातील प्रमुख रेल्वेमार्गांवर असलेले हे जंक्शन भारतभर प्रवास करणाऱ्यांसाठी एक केंद्रबिंदू ठरलं आहे. दिवस-रात्र, २४ तास येथे गाड्यांची सतत ये-जा सुरूच असते. उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये येथून थेट ट्रेन सेवा सुरू असते.
हे रहस्यमय रेल्वेस्थानक म्हणजे मथुरा जंक्शन. उत्तर प्रदेशातील पवित्र नगरी मथुरामध्ये असलेले हे स्थानक भारतातील एकमेव असे स्थानक आहे, जिथून देशाच्या चारही दिशांना थेट ट्रेन उपलब्ध असतात. येथून उत्तर भारतातील जम्मू-काश्मीरपासून ते दक्षिणेतील कन्याकुमारीपर्यंत, पूर्वेतील आसामपासून ते पश्चिमेतील गुजरात आणि महाराष्ट्रापर्यंत थेट ट्रेन सेवा चालते. विशेष म्हणजे दिल्लीतून दक्षिण भारतात जाणाऱ्या बहुतेक गाड्या मथुरा जंक्शनवरूनच जातात. त्यामुळे हे स्थानक एक महत्त्वपूर्ण जंक्शन बनले आहे.
दररोज जवळपास १९७ रेल्वेगाड्या येथे थांबतात, त्यामध्ये राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी, दुरंतो, सुपरफास्ट, एक्स्प्रेस, तसेच लोकल DEMU/MEMU गाड्यांचा समावेश आहे. रेल्वे संचालनालयातर्फे १८७५ साली सुरू झालेल्या मथुरा जंक्शनमध्ये एकूण १० प्लॅटफॉर्म्स आहेत, जे देशातील प्रगत आणि सुविधा-संपन्न स्थानकांपैकी एक मानले जाते. येथून एकाच वेळी पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या सगळ्या दिशांकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.
त्याशिवाय मथुरा ही भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असल्यामुळे लाखो भाविक येथे दरवर्षी दर्शनासाठी येतात. त्यामुळेही येथील रेल्वेस्थानक कायमच वर्दळीने भरलेले असते. मथुरा जंक्शनवरून दररोज शेकडो प्रवासी देशाच्या विविध भागांमध्ये थेट प्रवास करतात. त्यामुळे प्रवासादरम्यान ट्रेन बदलण्याच्या त्रासापासून वाचायचं असेल, तर मथुरा जंक्शनसारखं दुसरं ठिकाण नाही.