Half Yearly Season Ticket : मुंबई लोकल ट्रेन हा मुंबईकरांच्या जगण्याचा अविभाज्य घटक झाला आहे. त्यावर मुंबईकरांचं आयुष्य अवलंबून आहे. शिवाय लांबून येण्यासाठी म्हणजे अगदी नाशिक ते मुंबई, पुणे ते मुंबई असं अंतर कापण्यासाठीही अनेक प्रवासी ट्रेनचा पर्याय निवडतात. भारतातल्या जवळपास सगळ्याच लहान-मोठ्या शहरांमध्ये रेल्वे हे प्रवासाचं एक उत्तम माध्यम मानलं जातं. रोज प्रवास करणारे प्रवासी हे रोज तिकिट काढण्याच्या भानगडीत पडत नाहीत ते महिन्याचा, तीन महिन्यांचा वगैरे पास काढतात. यालाच सिझन तिकिट असंही म्हटलं जातं. हाफ इयरली सिझन तिकिट म्हणजे काय? हे आपण जाणून घेणार आहोत.

काय असतं हाफ इयरली सिझन तिकिट?

हाफ इयरली सिझन तिकिट या नावातच त्याचा अर्थ दडला आहे. ठराविक दोन स्टेशन्सच्या अंतरासाठी सहा महिन्यांचा पास काढणं म्हणजेच असतं हाफ इयरली सिझन तिकिट. समजा तुम्ही मुंबईत आहात तर डोंबिवली किंवा कल्याण या स्टेशनपासून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत तुम्ही हाफ इयरली सिझन तिकिट म्हणजेच सहा महिन्यांचा पास काढलात तर सहा महिन्यांत तुम्ही कितीही वेळा रेल्वेने ये जा करु शकता. शिवाय एकदा असा पास काढला की सहा महिन्यांची चिंता नाही. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

सहा महिन्यांचं सिझन तिकिट काढण्याचे फायदे काय?

प्रवाशांचा तिकिटाच्या रांगेतला वेळ वाचतो, शिवाय सहा महिन्यांचा पास एकदम काढल्याने दर महिन्याचे पैसे वाचतात.

ट्रेन पकडण्यासाठी तिकिटाच्या लांब रांगेत उभं रहावं लागत नाही.

सहा महिन्यांचा पास हा सेकंड क्लास, फर्स्ट क्लास आणि एसीलाही चालतो, म्हणजेच किफायतशीर किंमतीत सुखकर प्रवास करता येतो.

सहा महिन्यांचा पास तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरुपात मिळतो.

हाफ इयरली सिझन तिकिट ऑफलाइन काढण्याची प्रक्रिया काय?

१) जवळच्या रेल्वे स्टेशनवर पोहचा. तिथे सहा महिन्यांच्या सिझन तिकिटाचा फॉर्म मागून घ्या.

२) सहा महिन्यांच्या सिझन तिकिटासाठी जो फॉर्म दिला जाईल तो स्वच्छ अक्षरात भरा. त्यात तुमचं वय आणि नाव तसंच संपूर्ण पत्ता लिहायला विसरु नका. शिवाय कुठून कुठपर्यंत पास हवा आहे ते देखील नोंदवा.

३) या अर्जासह आधार कार्ड किंवा पॅन कार्डची फोटोकॉपी द्या, शिवाय एक पासपोर्ट साईझ फोटोही द्या आणि पैसे भरा पुढच्या पाच ते दहा मिनिटांत तुम्हाला हाफ इयरली सिझन तिकिट मिळेल.

४) हाफ इयरली पास खिशाला परवडतो कारण रोज कुठलंही तिकिट येताना आणि जाताना काढण्याच्या तुलनेत हा पास स्वस्त असतो.

हाफ इयरली पास ऑनलाइन कसा काढाल?

UTS नावाचं रेल्वेचं अॅप आहे ते तुमच्या मोबाइलवर डाउनलोड करा. त्यानंतर त्यात हाफ इयरली सिझन तिकिट हा पर्याय निवडा. तुमचे सगळे तपशील, नाव, वय, आधारची कॉपी आणि फोन नंबर भरा त्यानंतर ऑनलाइन पेमेंट करा आणि सहा महिन्यांचं सिझन तिकिट ऑनलाइन मिळवा.

हाफ इयरली सिझन तिकिट मिळवण्यासाठी वयाची मर्यादा असते का?

हाफ इयरली तिकिट मिळवण्यासाठी वयाची काहीही मर्यादा नसते. पाच वर्षांच्या वरील व्यक्तीला हे तिकिट ऑनलाइन किंवा ऑफलाइन काढता येतं.

हाफ इयरली तिकिटाची नोंदणी मुदत संपल्यानंतर पुन्हा करता येते का?

होय. हाफ इयरली सिझन तिकिट तुम्हाला सहा महिन्यांची मुदत संपल्यावर पुन्हा काढता येतं.