चांगल्या मित्राची, दोस्ताची अशी कोणती व्याख्या नाहीये. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाचे दोस्त आणि दोस्ती कुणाशी ना कुणाशी होत असते. फारच थोडे लहानपणापासून एकलकोंडे असतात ते अगदी मोठे झाल्यावरही असो, तर ही दोस्ती कुणाशी काही काळापुरती होते, कुणाशी होते आणि अल्पकाळात संपुष्टातही येते, तर कुणाशी अगदी आयुष्याच्या शेवटापर्यंत टिकून रहाते.”आम्ही लंगोटी यार आहोत,”हे वाक्यच दोस्तीची व्याख्या सांगून जातं. दोस्ती ही त्याने त्याच्याशी आणि तिने तिच्याशी करायची असं अजिबात नसतं. ती स्वभाव,विचार, आवडीनुसार अगदी कुणाशीही होऊ शकते. मात्र ती निखळ, निस्वार्थ, निधर्मी, निरामय आणि नितळ असावी इतकंच. पण तुम्हाला माहितीये का, हा ‘दोस्त’ शब्द नेमका कुठून आला? चला याची रंजक माहिती जाणून घेऊयात..
‘कहाणी शब्दांची: मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी हा अर्थ दिला आहे.
जिवाभावाच्या सवंगड्याला आपण म्हणतो दोस्त. हा शब्द आपल्याकडं फारसी भाषेमधून आला असला, तरी तो मूळचा फारसी नाही. तो आहे अवेस्ताच्या पेहलवी भाषेतला. पेहलवी भाषेमध्ये झुश्त हा शब्द आहे. त्यावरून तो फारसी भाषेने उचलला आणि केला दुष्त किंवा दोष्त. पुढे आधुनिक फारसीमध्ये त्याचाच झाला दोस्त. मराठीतही तो त्याच अर्थानं आला आणि आपला जिवलगच झाला. हिंदी, मराठी कवी शायरांचा तर तो सखाच झाला. ‘दोस्त माझा मस्त’ पासून ‘दोस्त दोस्त ना रहा’ पर्यंत सगळीकडे त्याचा संचार सुरू झाला आणि मग दोस्तीच्या आणाभाकाही दिल्या-घेतल्या जाऊ लागल्या. दोस्तीचं घर तर काळजातलंच.
हेही वाचा >> “अण्णा” आणि “आप्पा” यांच्यामध्ये फरक काय? कोण थोरलं, कोण धाकटं? जाणून घ्या
दोस्त दोस्त शब्द जिथे जिथे येतो तिथे आपलं सहज लक्ष जातं. कवी, गीतकार संदीप खरे यांची चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही! ही कविता प्रत्येकाच्याचं जवळची..इथपासून ते “तुझी माझी दोस्ती तुटायची नाही”, “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे” इथपर्यंत दोस्तांवर अनेक गाणी कविता आल्या.
तुम्हालाही ही माहिती नव्यानं कळली असेल तर तुमच्या दोस्तांना नक्की शेअर करा.