प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचं गेल्या वर्षी निधन झालं. आता त्यांचं मृत्यूपत्र समोर आलं आहे. याद्वारे त्यांनी त्यांची ३,९०० कोटी रुपयांच्या मालमत्तेपैकी मोठा हिस्सा दान करण्याचा निर्णय घेतला होता, याबाबतची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या संपत्तीमधील काही रक्कम कुटुंबातील सदस्य व सहकाऱ्यांच्या नावे केली आहे. टाटा यांच्या मृत्यूपत्राच्या बातम्या पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल की मृत्यूपत्र म्हणजे नक्की काय असतं? आणि ते कसं तयार केलं जातं? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर इथे मिळेल.
मृत्यूपत्र (Will) म्हणजेच एक कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती तिच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती, मालमत्ता कशी व कोणाला वाटायची, जबाबदाऱ्या कोणाला सोपवायच्या, हे आधीच ठरवून ठेवते. भारतीय वारसा कायद्यांतर्गत (Indian Succession Act, 1925) मृत्यूपत्र तयार केलं जातं व त्याची अंमलबजावणी केली जाते.
मृत्यूपत्र हा एक असा लेखी दस्तऐवज आहे ज्यामध्ये व्यक्ती आपल्या मालमत्तेचं वाटप करतो, जबाबदाऱ्या ठरवतो, त्याच्या मृत्यूनंतरच्या इच्छा व्यक्त करतो, दानधर्माबद्दलचे निर्णय घेतो. मृत्यूनतर मालमत्तेवरून वारसांमध्ये वाद होऊ नयेत यासाठी त्याची तजवीज केली जाते.
मृत्यूपत्र कोण तयार करू शकतो?
मृत्यूपत्र तयार करण्यासाठी त्या व्यक्तीचं किमान वय २१ वर्षे इतकं असणं आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक असावी. म्हणजेच तो काय करतोय, त्याचे परिणाम काय होतील याचं त्याला भान असावं. तसेच ते स्वेच्छेने केलेलं असावं. म्हणजेच ती व्यक्ती कोणाच्याही दबावाखाली अथवा फसवणुकीने मृत्यूपत्र तयार करता येत नाही. कोणी तसा प्रयत्न केल्यास भारतीय वारसा कायद्यांतर्गत ते रद्द देखील होऊ शकतं.
मृत्यूपत्राचे प्रकार
१. साक्षीदारांसह तयार केलेलं मृत्यूपत्र : हा मृत्यूपत्राचा सामान्य प्रकार आहे. ज्यावर दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या असतात.
२. हस्तलिखित मृत्यूपत्र (Holographic Will) : हे मृत्यूपत्र तयार करणाऱ्याने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं असतं, भारतात त्याला साक्षीदाराची गरज असते.
३. तोंडी मृत्यूपत्र : काही विशिष्ट परिस्थितीत हे मृत्यूपत्र मान्य आहे. जसे की युद्धभूमीवर जवान आपली इच्छा व्यक्त करतो. मात्र, हा प्रकार खूप दूर्मिळ आहे.
मृत्यूपत्र कसे तयार करतात?
लेखी मृत्यूपत्र कोणत्याही कागदावर लिहिता येतं. त्याला विशिष्ट कागदाची जसे की स्टॅम्प पेपरची वगैरे गरज नसते. मृत्यूपत्र कोणत्याही भाषेत लिहिता येत, मात्र ते कोणालाही वाचता येईल आणि समजण्यास सोपं असावं. मृत्यूपत्र तयार करणाऱ्याने त्याची स्वतःची ओळख, पूर्ण नाव व पत्ता लिहायला हवा. त्याच्या संपूर्ण संपत्तीचा तपशील द्यायला हवा, जसे की घर, जमीन, बँक खाती, दागिने व इतर मालमत्ता. वारसांची नावं, त्यांच्यात संपत्तीचं वाटप कसं करावं ते सविस्तर लिहिलेलं असावं.
एका नियुक्त (Executor) व्यक्तीचा त्यात उल्लेख असावा, जो मृत्यूपत्राची अंमलबजावणी करेल. उदाहरणार्थ विश्वासू मित्र किंवा नातेवाईक. दानधर्म, मुलांची काळजी घेण्यासंदर्भातील इच्छा देखील त्यात लिहिता येतात. जबाबदाऱ्यांचं वाटप करता येतं. मृत्यूपत्राच्या प्रत्येक पानावर स्वाक्षरी करावी. किमान दोन साक्षीदार असावेत, त्यांच्याही स्वाक्षऱ्या असायला हव्यात. तसेच साक्षीदार (Beneficiary) हे मृत्यूपत्रात लाभार्थी नसावेत. साक्षीदाराने मृत्यूपत्र लिहिणाऱ्याला त्यावर स्वाक्षरी करताना पाहिलेलं असावं.
मृत्यूपत्राची नोंदणी ऐच्छिक असते. महाराष्ट्रात सब-रजिस्ट्रार कार्यालयात मृत्यूपत्राची नोंदणी करता येते. या नोंदणीमुळे मृत्यूपत्राची कायदेशीर वैधता वाढते. तसेच भविष्यातील वाद टळतात. मात्र, या नोंदणीवेळी मृत्यूपत्र तयार करणारी व्यक्ती व साक्षीदारांना सब-रजिस्ट्रार कार्यालयात हजर राहावं लागतं. रजिस्ट्रारसमोर त्यावर स्वाक्षऱ्या कराव्या लागतात. त्यानंतर मृत्यूपत्र सुरक्षित ठिकाणी ठेवावं. बँक लॉकर किंवा वकिलाकडे ठेवणं उत्तम. कुटुंबातील विश्वासू व्यक्तीला, अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दिलेल्या व्यक्तीला त्याबद्दल माहिती द्यावी.