scorecardresearch

UPI किंवा Scan Code ने चुकीच्या खात्यावर, क्रमांकावर पैसे ट्रान्सफर झाल्यास काय करावे? ४८ तासांत मिळतो Refund जर…

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची यासंदर्भात एक सविस्तर नियमावली उपलब्ध असून ती बँकांना बंधनकारक आहे.

UPI किंवा Scan Code ने चुकीच्या खात्यावर, क्रमांकावर पैसे ट्रान्सफर झाल्यास काय करावे? ४८ तासांत मिळतो Refund जर…
आरबीआयचे यासंदर्भातील काही नियम आहेत

सध्या इंटरनेट बँकिंग आणि यूपीआयचा वापर करणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगदी किराणामालापासून ते तिकीटांपर्यंत अनेक ठिकाणी लोक ऑनलाइन व्यवहार करताना दिसतात. देशभरामध्ये ऑनलाइन व्यवहार वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहनही दिलं जात आहे. मात्र यूपीआय किंवा नेट बँकिंग करताना चुकून एखाद्या अनोखळी व्यक्तीच्या खात्यावर पैसे गेल्यास काय करावं हे तुम्हाला ठाऊक आहे का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची यासंदर्भात एक सविस्तर नियमावली उपलब्ध असून ती बँकांना बंधनकारक आहे. रिझर्व्ह बँकेने ही नवी नियमावली नुकतीच अपडेट केली आहे. चुकून एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या फोन नंबरवर अथवा खात्यावर पैसे गेल्यास ४८ तासांमध्ये म्हणजेच दोन दिवसांमध्ये हे पैसे रिफंड म्हणून मिळवता येतात.

यूपीआय आणि नेट बँकींगचे व्यवहार झाल्यानंतर स्मार्टफोनवर एक मेसेज येतो. हे मेसेजच तुम्हाला अशापद्धतीने चुकीचे व्यवहार झाले तर पैसे परत मिळवून देण्यास फायद्याचे ठरतात. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार केल्यानंतर हे मेसेज लगेच डिलीट करु नका. या मेसेजमध्ये पीपीबीएल क्रमांक असतो. चुकून वेगळ्याच क्रमांकावर पैसे गेले असतील तर पीपीबीएल क्रमांकाच्या मदतीनेच रिफंड मिळवता येतो.

आरबीआयने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार, चुकीच्या व्यक्तीच्या नावाने पैसे गेले असतील तर ते खातेधारकाला परत मिळवून देण्याची जबाबदारी ही बँकची असते. हे पैसे खातेधारकाला ४८ तासांमध्ये परत मिळवून देणं बँकांना बंधनकारक आहे. जर यामध्ये बँकेने सहकार्य केलं नाही तर bankingombudsman.rbi.org.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवता येते. चुकीच्या क्रमांकावर पैसे ट्रान्सफर झाल्यास बँकेच्या मॅनेजरला एक पत्र लिहून द्यावं लागते. त्यामध्ये खाते क्रमांक, खातेधारकाचं नावं. ज्या खात्यावर पैसे गेले आहेत त्यासंदर्भातील माहिती (खाते क्रमांक, फोन नंबर) लिहून द्यावा लागातो.

रिफंड कसा मिळवावा याच्या पाच स्टेप
१) चुकून चुकीच्या खात्यात पैसे गेल्यानंतर सर्वात आधी बँकेत फोन करुन यासंदर्भातील सर्व माहिती द्यावी. याचवेळी या व्यवहाराचा जो रेफ्रन्स क्रमांक म्हणजेच एसएमएसने येणारा पीपीबीएल क्रमांकही बँकेला कळवावा.

२) त्यानंतर बँकेत जाऊन आपली तक्रार नोंदवला.

३) बँक मॅनेजरला रितसर पत्र द्या.

४) ज्या खात्यावर किंवा फोन क्रमांकावर पैसे गेले आहेत त्यासंदर्भातील माहिती द्यावी. तसेच पैसे नेमके कुठे पाठवायचे होते याची माहितीही म्हणजेच खाते क्रमांक अथवा फोन नंबर यासारखी द्यावी.

५) व्यवहार झाल्याचा रेफ्रन्स क्रमांक, व्यवहार कधी झाला त्याची तारीख, किती रकमेचा व्यवहार झाला आणि आयएफएससी कोड या पत्रात आवर्जून लिहावा.

६) हे पत्र मॅनेजरकडे द्यावे. यानंतर पुढील व्यवहारांची पडताळणी करुन पैसे निश्चित खात्यावर वळवणे हे बँकेचं काम असतं असं आरबीआयच्या नियमांमध्ये म्हटलं आहे.

ही काळजी घ्या
यूपीआय किंवा नेट बँकिंग करताना काळजी घेणं गरजेचं असतं. यूपीआय करताना ज्यांना पैसे पाठवत आहात त्याचं नावं आणि क्रमांक बरोबर आहे का हे निश्चित केलं पाहिजे. क्यूआर कोडच्या माध्यमातून यूपीआय व्यवहार करताना कोड स्कॅन केल्यानंतर दुकानदाराकडे किंवा विक्रेत्याकडे खात्याशी संलग्न नाव तपासून पहावे. असं केल्याने तुम्ही त्याच व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवताय हे निश्चित होईल. नेट बँकींग करताना घाई करु नका. हे व्यवहार झाल्यानंतर येणारे मेसेज काही दिवस तरी नोट पॅडवर सेव्ह करुन ठेवा.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या