दसरा आणि दिवाळी म्हटलं की सोनं खरेदीला उधाण येतं. सध्या मुंबईत सोन्याचा दर १ लाख २५ हजार प्रति तोळा (१० ग्रॅम) इतका आहे. तरीही लोकांचा सोनंखरेदीचा उत्साह कायम आहे. दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. या कालावधीतही सराफा बाजार फुलून गेलेला असतो. सोनं पाच वर्षांपूर्वी किंवा १० वर्षांपूर्वी अगदी २५ वर्षांपूर्वी किती स्वस्त होतं याची चर्चा अनेकजण करताना दिसतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सोन्याचा होन किती ग्रॅमचा होता? सोन्याचं चलन त्यांनी का अस्तित्वात आणलं आणि त्या होनचं विशेष नाव काय होतं? आज या निमित्ताने आपण जाणून घेऊन शिवरायांच्या काळातील सोन्याच्या होनबाबत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुठली दोन चलनी नाणी होती?
६ जून १६७४ म्हणजेच शिवराज्याभिषेकाच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘सुवर्णहोन’ हे चलन अस्तित्वात आणले शिवरायांच्या मृत्युसमयी स्वराज्याच्या तिजोरीच्या झालेल्या मोजणीवरून सभासद संदर्भ असा की, तिजोरीत सर्व नाणी मिळून ७९ लाखाच्या पुढे होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवराई होन हे एक शिवकालीन चलन होते. ते सोन्यापासून बनवले गेले होते. होन वजन सुमारे २.७ ते २.९ ग्राम असे.
शिवराई होन हे सुवर्ण नाण्याचं नाव, तर शिवराई हे तांब्याचं नाणं
शिवराज्याभिषेकाच्या आधी दोन प्रकारची नाणी पाडण्यात आली. शिवराई होन हे नाणं सोन्याचं होतं. तर शिवराई नावाचं एक नाणं होतं जे तांब्याचं होतं. सोन्याचं होन आणि तांब्याची शिवराई असं म्हटलं जात होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नाणी चलनात आणल्याने शिवराई होन असं सोन्याच्या नाण्याला म्हटलं गेलं.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी काय सांगितल?
“होन हे २.७ ते २.९ ग्रॅमचं नाणं होतं. राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची नाणी पाडून घेतली होती. शिवराई हे तांब्याचं नाणं होतं. त्याचे ग्रॅम वेगवेगळे होते. होन हा शब्द तसा जुना आहे. शिवाजी महाराजांनी जी नाणी पाडून घेतली त्याला नाण्याला शिवराई होन असं म्हटल जातं. शिवराई हे तांब्याचं नाणं होतं ते भारत स्वतंत्र होण्याच्या आधी काही कालखंडांमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रात होतं. इंग्रजांनी जेव्हा त्यांचं चलन आणलं आणि ते मजबूत चलन झालं तेव्हा इंग्रजांनी हळू हळू छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडून घेतलेली नाणी किंवा इतर राजांनी पाडून घेतलेली नाणी जमा केली आणि वितळवून टाकली. शिवराई होन आणि तांब्याची शिवराई यांची निर्मिती पेशवाईपर्यंत होत होत होती. सोन्याच्या नाण्याला शिवराई होन असंच म्हटलं गेलं. सुवर्णाचे होन हे सध्याच्या घडीला कमी उरले आहेत. साधारण २० ते २१ च्या आसपास आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय, दिल्लीचं राष्ट्रीय संग्रहालय या ठिकाणी हे सुवर्ण होन पाहण्यास मिळतात. रायगडला ही नुकताच एक होन मिळाला जो निलीमा अवकीरकर यांनी छत्रपती संभाजीराजेंना दिला आहे. सातारा संस्थानाकडे काही नाणी आहेत. महाराष्ट्रात सुवर्ण होन सध्या कमी प्रमाणात आहेत.” अशी माहिती इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी लोकसत्ता ऑनलाइनला दिली.
शिवराई होन हे सुवर्ण नाणं का आणलं गेलं?
१५६५ मध्ये विजयनगर साम्राज्याचा सम्राट सदाशिवराया याला बहामनी सुलतानांनी पराभूत केलं. त्यानंतर जवळपास १०० वर्षे परकिय चलन चलनात होतं. त्यावर पर्शियन अक्षरं कोरली होती. पर्शियन भाषेचा चलनावरचा प्रभाव झुगारुन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्ण होन हे चलन अस्तित्तवात आणलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा निर्णय महत्त्वाचा ठरला. १६७४पासून १९व्या शतकापर्यंत शिवराई नाणे चलनात राहिले. महाराजांनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी अशीच नाणी पडून चलनात आणली. १९ व्या शतकात शिवराई बंद करण्यासाठी इंग्रजांना फार प्रयत्न करावे लागले असंही काही इतिहासकार त्यांच्या लेखांमध्ये सांगतात.