फुटबॉल हा खेळ जगातील सर्वाधिक देशांमध्ये खेळला जातो. क्रिकेटपेक्षाही जगभरात फुटबॉलची क्रेझ जास्त आहे. फुटबॉलपटूंचा चाहता वर्गही जगभरात सर्व देशांत पसरलेला आहे. भारतातही फिफा विश्वचषक आणि फुटबॉल कमालीचे लोकप्रिय आहे. फुटबॉलपटू हे कोट्यवधींचे मालक असतात. पण इतके बक्कळ पैसे कमावूनही अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू मैदानात फुटबॉल खेळताना त्यांच्या मोज्यांना छिद्र असल्याचे दिसून आले आहे. इतके पैसे कमावूनही फाटके मोजे घालण्यात काय हशील? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर पाहू यामागे नेमके कारण काय?

मोज्यांना छिद्र पाडल्याबद्दल अनेकांनी यामागे काहीतरी अंधश्रद्धा असल्याचे म्हटले होते. तर काहींनी वैज्ञानिक कारण असल्याचा कयास लावला. पण खरे कारण काहीतरी वेगळेच आहे. फुटबॉलपटू मैदानात असताना गुडघ्यापर्यंत मोजे घालत असतात. हे मोजे पायांना घट्ट असतात. त्यामुळे धावताना त्यावर अधिक ताण येऊ नये म्हणून अनेक खेळाडू पायाच्या मागच्या बाजूला मोज्यांना दोन छिद्र पाडताना दिसून येतात.

फुटबॉल खेळताना पायाच्या स्नायूंवर ताण पडू नये आणि रक्त पुरवठा व्यवस्थित व्हावा, यासाठी खेळाडू मोज्यांना छिद्र पाडण्याची युक्ती राबवितात. या छोट्याश्या युक्तीमुळे खेळादरम्यान पायात पेटके येण्यापासून टाळण्याचा प्रयत्न खेळाडूंकडून करण्यात येतो.

अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारा फुटबॉलपटू गॅरेथ बेल याने २०१६ साली वारंवार होणाऱ्या पायाच्या दुखापतींवर उपाय शोधण्यासाठी मोज्यांना छिद्र पाडण्याची शक्कल लढवली. तेव्हाचा त्याचा प्रशिक्षक झिनेदन झिदान यांने म्हटले की, त्याचा खेळ चांगला होत असेल तर मोज्यांना छिद्र असल्याने काहीही फरक पडत नाही.

पण यामागे वैज्ञानिक आधार आहे?

बीइन स्पोर्ट्स या वृत्तवाहिनीचा निवेदक रिचर्ड किज यांनी म्हटले की, मोज्याना छिद्र पाडण्याचा ट्रेंड आता भलताच प्रचलित होत आहे. पण आता हे कुठेतरी थांबायला हवे, असेही त्यांनी म्हटले.

इंग्लिश फुटबॉलपटू काइल वॉकर याने पहिल्यांदा छिद्र पाडण्याची कल्पना राबवली होती. वॉकरच्या म्हणण्याप्रमाणे असे केल्याने पायाला थोडा आराम मिळतो. पण याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही की रक्तप्रवाह सुरळीत राहिल. स्पेनमध्ये मोज्यांना छिद्र पाडण्यावर मनाई करण्यात आली आहे. आता हा प्रकार अती व्हायला लागला आहे.