चोर, दरोडेखोरांपासून घराचे संरक्षण करण्यासाठी मजबूत दरवाजे आणि कुलूप लावले जाते. यात वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता अनेक जण घरांना आता हायटेक दरवाजे, कुलूप घरांना लावली जात आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे घरांना कुलूप तर दूरची गोष्ट आहे, सादे दरवाजेही लावले जात नाही. जेथे प्रत्येक घराच्या खिडक्या नेहमी खुल्या असतात. महाराष्ट्रातील या गावाबद्द्ल बहुतेकांना माहित असेल पण ज्यांना माहित नाही त्यांचीसाठी ही आश्चर्याची गोष्ट असेल.

या गावातील लोकांची देवावर अतूट श्रद्धा आहे, म्हणूनच ते महागड्या वस्तूंनी भरलेले घर देवाच्या विश्वासावर सोडून कामा- धंद्याला जातात. विशेष म्हणजे येथील खुल्या सरकारी बँकेच्या शाखेलाही कुलूप नाही. मग चला आज या गावाविषयी थोडी माहिती घेऊया.

महाराष्ट्रातील या गावाचे नाव शनि शिंगणापूर असे आहे. हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात येते. इतर गावांच्या तुलनेत आकाराने लहान असलेले हे गाव जगात सुप्रसिद्ध आहे. याचे कारण म्हणजे या गावात न्यायदेवता शनिदेवाची ५ फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे. येथे दररोज हजारो लोक दर्शनासाठी गर्दी करतात. शनि भक्तांचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी स्वतः न्यायदेवता शनि वास करतो, तेथे कोणीही कसल्याही गोष्टींना धक्का पोहचवू शकत नाही.

शनिदेव करतात लोकांचे रक्षण

लोकांची शनिदेवावर इतकी श्रद्धा आहे की, तिथे राहणारे लोक आपली घरं, दुकान, कारखान्यांना दरवाजे- कुलूप लावत नाहीत. लोकांचा असा विश्वास आहे की, जेव्हा शनिदेव स्वतः तिथे राहून त्यांचे रक्षण करत आहेत, तर दरवाजे, कुलूपांना खर्च का करावा. त्यांचा हा विश्वास अद्याप खोटा ठरला नाही. कारण एवढी वर्षे उलटून गेली तरी आजतागायत या गावात एकही चोरी, दरोड्याची अनुचित घटना समोर आलेली नाही, त्यामुळे लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

देशातील पहिली लॉकलेस बँकही याच गावात आहे. २०११ मध्ये युको बँकेने तेथे शाखा उघडली. गावातील लोकांचा विश्वास पाहून बँकेच्या अधिकार्‍यांनी आवारातील दरवाजे व कुलूप लावले नाही. पण बँकेत मोठी रोकड असल्याने अधिकारी तणावात राहत होते. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी आवाराबाहेर २४ तास सुरक्षा रक्षक नेमले होते. मात्र नंतर ते सर्व रक्षक एक एक करून हटवण्यात आले. आता दरवाज्याच्या नावावर फक्त काचेचा दरवाजा लावण्यात आला आहे, जेणे करून बँकेच्या आत कोणताही प्राणी जाऊ नये.

शनिदेवाने दिला होता आशीर्वाद

या गावाविषयी एक आख्यायिकाही प्रचलित आहे. पौराणिक कथेनुसार, गावात एकदा जोरदार पाऊस झाला. त्या पावसात माती हटवताना तेथील जमिनीत एक मोठा काळा खडक दिसला, जेव्हा लोकांनी त्या खडकाला स्पर्श केला तेव्हा त्यातून लाल रंगाचा रक्तासारखा पदार्थ वाहत होता. ज्या दिवशी दगड सापडला त्या दिवशी गावच्या सरपंचाला शनिदेवाचे स्वप्न पडले. शनिदेव म्हणाले की, ते स्वतः या गावात राहून लोकांचे रक्षण करतील, पण त्याआधी त्यांचे मंदिर बांधून घ्यावे. त्यानंतर मंदिर बांधले गेले तेव्हापासून त्या घरांमध्ये दरवाजे न लावण्याची (लॉकलेस व्हिलेज ऑफ इंडिया) परंपरा सुरू झाली. जी परंपरा आजही सुरु आहे.