भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारतीय रेल्वेच्या नावावर याआधीही अनेक विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत, मात्र आता त्यात एका नव्या विक्रमाची भर पडली आहे. कर्नाटकातील हुबळी येथील श्री सिद्धरुद्ध स्वामीजी रेल्वे स्थानकावर जगातील सर्वात मोठे रेल्वे प्लॅटफॉर्म बांधण्यात आले आहे. या रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी १५०७ मीटर आहे. या रेल्वे प्लॅटफॉर्मचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. हा प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी एकूण २० कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे.
गोरखपूर जंक्शनला सोडले मागे..
कर्नाटकातील श्री सिद्धरुद्ध स्वामीजी रेल्वे स्थानकावर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या रेल्वे प्लॅटफॉर्मने उत्तर प्रदेशातील गोरखपूर जंक्शन येथे बांधलेल्या प्लॅटफॉर्मला मागे टाकले आहे. वास्तविक, याआधी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जंक्शन जगातील सर्वात मोठे रेल्वे प्लॅटफॉर्म होते. त्याची लांबी १३६६.३३ मीटर आहे. तिसऱ्या क्रमांकावर केरळमधील कोल्लम जंक्शन येथे बांधण्यात आलेला रेल्वे प्लॅटफॉर्म आहे.
रेल्वेमंत्र्यांनी ट्विट करून दिली माहिती..
भारतीय रेल्वेच्या या नवीन विश्वविक्रमाबद्दल देश आणि जगाला माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात मोठे रेल्वे प्लॅटफॉर्म देशाला समर्पित करत आहेत.
( हे ही वाचा: भारतातील ‘या’ रेल्वे स्थानकांवर आहेत सर्वात जास्त प्लॅटफॉर्म; मुंबईतील ‘या’ स्थानकाचा देखील आहे समावेश)
पूर्वी याठिकाणी पाच प्लॅटफॉर्म होते..
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, हुबळीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिश हेगडे म्हणाले की, हुबळी यार्डच्या पुनर्बांधणीचा एक भाग म्हणून जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म बांधण्यात आला होता. हुबळी स्थानकावर यापूर्वी पाच रेल्वे प्लॅटफॉर्म होते, मात्र येथील प्रचंड गर्दी हाताळण्यासाठी या प्लॅटफॉर्मची क्षमता वाढवण्याची गरज होती. त्यामुळेच त्यात तीन नवीन फलाटांची भर पडली आहे. या तीनपैकी, प्लॅटफॉर्म क्रमांक ८ चा आकार १५०७ मीटर आहे, ज्याला जगातील सर्वात मोठ्या रेल्वे प्लॅटफॉर्मचा मान मिळाला आहे.