तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com

बुलेट राजा
मी पाचवीला होतो. बाबांनी हिरव्या रंगाची डिझेलवर चालणारी बुलेट गाडी आणली होती. गाडी पाहून आम्ही तिघेही भावंडे हरखून गेलो होतो. तिच्याभोवती आम्ही फेऱ्या मारायचो. तिघेही गाडीवर बसायचो. मात्र कोणाचेही पाय जमिनीवर टेकायचेच नाहीत. गावात फक्त आमच्याकडेच बुलेट गाडी होती. त्यामुळे आम्ही शायिनग मारायचो. बाबांना बुलेट चालवताना पाहिले की खूप आनंद व्हायचा. आपणही बुलेट चालवायची असे वाटायचे. प्रत्यक्षात मात्र दहा वष्रे लागली बुलेट चालवणे शिकायला. दहावीत असताना गाडी शिकायला सुरुवात केली. पण मला फक्त फिरवता येत होती. वडिलांनी गाडी चालू करून द्यायची आणि मी चालवायची असे दोन वष्रे चालले. कारण त्या वेळी माझे वजन अगदीच कमी होते. बारावीत मात्र मी गाडी चालवायला शिकलो. पण लायसन्स मिळत नव्हते म्हणून गल्लीतच गाडी फिरवायचो, फार लांब जायचो नाही. १९९६ सालातली ती सायंकाळ मला अजूनही लख्खपणे आठवते. वडील कृषी खात्यात अधिकारी असल्याने त्यांना कामानिमित्ताने पुण्याला जावे लागे. अशाच एका रात्री वडिलांना आणण्यासाठी ३५ किमी अंतरावरील म्हसवड येथे गेलो. बुलेट स्टँडला लावली आणि पाणी पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो. परत येऊन बघतो तर काय गाडी गायब. आजूबाजूला चौकशी केली तर कोणाला काही माहीत नव्हते. बाबांना फोन करावा तर ते चिडतील याची भीतीच जास्त. काय करावे काही सुचेना, भीती आणि काळजीने डोळ्यात पाणी आले. वडिलांच्या रागापेक्षा माझी आवडती बुलेट गायब झाली याचे जास्त दु:ख होते. पळतच पोलीस स्टेशन गाठले. रडतच सर्व कहाणी पोलिसांना सांगितली. एका पोलिसाने मला गप्प बसवून पाणी दिले प्यायला. पोलिसांनी गाडी काढली. त्यात बसून स्टँडवर गेलो, आजूबाजूच्या परिसरातही दोन फेऱ्या मारल्या, पण माझ्या गाडीचा काही मागमूस लागेना. वडिलांना फोन करायला गेलो तर तो बंद होता. आता मात्र धीर सुटला. रडायला लागलो. रात्रीचे साडेअकरा झाले होते. स्टँडवर कोणीच नव्हते. मी एकटाच. एवढय़ात गाडीचा आवाज आला. मी सरळ पळत त्या गाडीला आडवा गेलो. नंबर पाहिला, माझीच गाडी होती आणि चालवणारे होते माझे वडील.. रडतच सर्व कहाणी त्यांना सांगितली तर ते हसायला लागले. वडील गाडी घेऊन त्यांच्या मित्राला सोडायला गेले होते. गाडी मिळाल्याचा आनंद झाला, पण खरं सांगू, त्या वेळी वडिलांचा रागही आला होता. पण तेव्हापासून मी माझ्या बुलेटवर जास्त प्रेम करायला लागलो. ती माझी राणी आणि मी तिचा बुलेट राजा..
अमोल पिंजारी,
निबवडे
(ता. आटपाडी, जि. सांगली)

हॅट्स ऑफ शाइन
नोकरी म्हटली की स्थलांतर आलेच. कामानिमित्त घराबाहेर पडतानाचा मूड, उपलब्ध वाहन अर्थातच बाइक व्यवस्थित असेल तर पुढील प्रवास सुखकारक असतो. मी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात होंडा शाइन खरेदी केली. उत्तम आसनव्यवस्था, शॉक अ‍ॅब्झार्बर्सची अद्ययावत तंत्रप्रणाली या जमेच्या बाजूंमुळे मी शाइनला पसंती दिली. खरेतर सर्वच बाबतींत शाइन इज फाइन असे म्हटले तरी ते अतिशयोक्त ठरणार नाही. वाहन चालवताना सुरक्षेचे, वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचा माझा आटोकाट प्रयत्न असतो. बाइकची मंद, सॉफ्ट फायिरग मला संमोहिनी घालते. एकदा का मी बाइकवर स्वार झालो की, मग काँक्रीटच्या जंगलातून मला मुक्ती मिळते व मी रानावनाचा, पशुपक्ष्यांचा, झाडाझुडपांचा सोबती बनून जातो. माझ्या आरोग्याप्रमाणेच मी बाइकच्याही आरोग्याची काळजी घेतो. तिची विहित कालावधीत सíव्हसिंग करतो. वाहन ठीक तर काम नीट, असा माझा मंत्र आहे. त्यामुळे शाइनची सर्वतोपरी काळजी घेणे हे मी माझे आद्यकर्तव्य समजतो. माझ्या करिअरला यशस्वितेचं कोंदण प्राप्त करून देणारी माझी शाइन माझी लाइफ आहे. नेहमीच चलते रहोचा संदेश देणाऱ्या या माझ्या लाइफला हॅट्स ऑफ.. -रा. कों. खेडकर, पेडगाव (परभणी)

गाडीवरून पडणे, एक कला
मी बाइकवेडा असलो तरी बाइकलाच जास्त वेडा करतो. लहानपणापासून म्हणजे कळायला लागल्यापासून व गाडीची समज यायला लागल्यापासून मी गाडी चालवायला शिकलो. माझ्या वडिलांची गाडी मी चोरून बाहेर घेऊन जायचो. घरी आल्यानंतर बाबांची बोलणी खाल्ल्याचे वाईट कधीच वाटले नाही, कारण गाडी चालवण्याचा आनंदच वेगळा असायचा. गाडी बाहेर घेऊन गेलो की गावाबाहेरच्या मदानात मित्रांकडून ती शिकून घेण्याचा माझा परिपाठ असायचा. एकदा तर मित्राला घेऊनच नाल्यात पडलो. मला काही झाले नाही, पण मित्राला खूप लागले. मला खूप भीती वाटली. मी त्याला घेऊन डॉक्टरकडे गेलो. मी बऱ्याचदा गाडीवरून पडलो आहे. आता मात्र त्याचे प्रमाण कमी झाले आहे. तरी बाइक चालवण्याचा मला कधी कंटाला येत नाही. एकदा तर कॉलेजच्या मॅडमसमोरच मी गाडीवरून पडलो. आता माझ्याकडे आरटीआर आपाचे गाडी आहे. आधी सुझुकी होती. तिच्यावरून मी खूप वेळा पडलो आहे. आता मात्र नीट चालवतो.
    आनंद ओगले, अंबेजोगाई.