12 July 2020

News Flash

२३२. शब्द-सामर्थ्य

‘शब्द’ हा शब्दच मोठा गूढ आहे. दोन पातळ्यांवर या शब्दाची व्यापकता उघड होते.

(संग्रहित छायाचित्र)

‘शब्द’ हा शब्दच मोठा गूढ आहे. दोन पातळ्यांवर या शब्दाची व्यापकता उघड होते. म्हणूनच या शब्दगुणानं आकाशाला असीम सर्वव्यापकत्व लाभलं आहे. शब्दाची पहिली पातळी आहे ती सर्वपरिचित असूनही लक्षात न येणारी आहे. उदाहरणार्थ, हे शब्द आधी वाचा.. ‘महापूर’, ‘तांडव’, ‘सृष्टिसौंदर्य’, ‘घाटरस्ता’, ‘दहीहंडी’, ‘तुकाराम’ आदी.. आता हे अवघ्या काही अक्षरांचे शब्द ऐकताच मनात त्यांचं किती व्यापक रूप उत्पन्न होतं! म्हणजे ‘महापूर’ या एकाच शब्दात पाण्याचा अफाट वेगवान प्रवाह, त्यात पाण्याखाली गेलेली घरं, पाण्याच्या तडाख्यानं कोसळलेल्या इमारती, वाहत जात असलेली माणसं वा गुरं.. ही वा अशी अनेक चित्रं मन:पटलावर साकार होतात. ‘घाटरस्ता’ या अवघ्या चार अक्षरी शब्दांत वृक्षवल्लींनी वेढलेल्या दरी-डोंगरांचा कित्येक किलोमीटरचा वळणावळणांचा रस्ता सामावलेला असतो. ‘तुकाराम’ म्हणताच तुकाराम महाराजांचं दिव्य चरित्र, म्हणजेच त्या चरित्रातले अनेक प्रसंग आणि त्यांचे अनेक अभंगही आठवू लागतात. अर्थात, शब्दाचं उच्चारण हे मनात त्या शब्दानुसारची अनेक रूपं प्रकट करतं. तेव्हा शब्दाची ही अनुभवातली पातळी नित्याची असूनही आपल्या लक्षात येत नाही. शब्दाची दुसरी पातळी ही आध्यात्मिक आहे. ती आहे नामाची! या सृष्टीची उत्पत्ती ‘ओमकारा’पासून झाली, असं सनातन तत्त्वज्ञान सांगतं. अर्थात, ईश्वरवाचक ‘ॐ’ प्रथम प्रकटला आणि त्यातून सृष्टी साकारायला सुरुवात झाली. ‘अ’ म्हणजे आरंभ, ‘उ’ म्हणजे उत्थान अर्थात विकास आणि ‘म’ म्हणजे मौन अर्थात लय, अशी ‘ॐ’ची फोड सांगतात. म्हणजे अवघ्या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही या ‘ॐ’मध्ये सामावली आहे. मांडुक्य उपनिषदात तर म्हटलं आहे की, ‘‘ओम इति एतद् अक्षरम् इदं सर्व तस्योपव्याख्यानं भूत, भवद्, भविष्यदिति सर्वम ओमकार एव। यत् च अन्यत् त्रिकालातीतम् तद् अपि ओमकार एव॥’’ म्हणजेच, ॐ अ-क्षर आहे, अर्थात शाश्वत आहे आणि त्यातच सर्व भूत, भविष्य आणि वर्तमान अर्थात उत्पत्ती, स्थिती आणि लय सामावली आहे. इतकंच नव्हे, तर यापलीकडे जे त्रिकालातीत आहे तेदेखील ओमकारच आहे! फार मोठय़ा गूढ अशा सद्गुरू तत्त्वाचाच हा संकेत आहे. त्रिकालातीत म्हणजे भूतकाळाआधी अर्थात सृष्टीच्या उत्पत्तीआधी आणि भविष्यकाळानंतर म्हणजे सृष्टी लय पावल्यावरही व्याप्त असणारं जे सद्गुरू तत्त्व आहे, तेच ओमकार आहे. म्हणूनच एकनाथ महाराजही सद्गुरूंचं वर्णन ‘ओमकारस्वरूपा सद्गुरू समर्था’ असंच करतात! स्वामी स्वरूपानंद यांच्या ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’वरील ‘स्वरूप चिंतन’ या सदरात ‘ॐ नमोजी आद्या’ या ओवीचा आपण जाणलेला गूढार्थही तसाच होता! आद्य म्हणजे जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा जे होतं आणि जेव्हा काहीही उरणार नाही तेव्हाही विद्यमान राहील, असं जे काही आहे त्या ओमकारस्वरूप सद्गुरू तत्त्वाला माझा नमस्कार असो! गुरू नानकही म्हणतात : ‘एक ओमकार सत्नाम’ – म्हणजे एक ओमकारच सत्यस्वरूप नाम आहे! तेव्हा सृष्टीचा आरंभ ओमकार अर्थात नाद आहे आणि त्या नादानं पूर्णव्याप्त नाम हेच शाश्वत आहे. ‘शब्दा’ची ही आत्मानुभूतीची व्यापक पातळी आहे! जो या शब्दरूप भासत असलेल्या नामात निमग्न होतो, त्याच्या अंत:करणात अंतर्नाद निनादू लागतो आणि मग जीवनातला शब्दपसारा ओसरत अंतर्मनाला अक्षय शांतीचा प्रत्यय येऊ  लागतो.

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 2:03 am

Web Title: article by ekatmayog akp 94
Next Stories
1 एकात्मयोग : २३१. जगत् आणि जगदात्मा
2 २३०. पंचधा सृष्टी
3 २२९. चिद्विलास
Just Now!
X