18 March 2019

News Flash

अश्वत्थ भट

मी एन. एस. डी.ची ऑफिशियल कागदपत्रं त्या दिवशी हॉस्टेलवरच विसरून मुंबईला परतलो.

माझ्या सगळ्या सख्ख्या मावसभावंडांमध्ये मी नेहमीच वयानं मोठा असल्यामुळे चपलेला च्युइंग गम चिकटावा तसं लहानपणापासूनच ‘दादा’पण मला येऊन चिकटलं. समजावून, प्रेमानं सांगून, वेळप्रसंगी बाथरूममध्ये कोंडण्याची किंवा चड्डीत झुरळ सोडण्याची भीती घालून मी माझ्या सगळ्या भावंडांना ‘मला ‘दादा’ म्हणू नका..’ हे सांगण्यात यशस्वी झालो खरा; पण आपल्याला कुणी मोठं भावंडं नाही, या गोष्टीची सल नेहमीच बोचत राहिली.

राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात माझी निवड झाल्याची बातमी माझा मित्र- आजचा आघाडीचा संकलक जयंत जठार यानं मला दिली. मी हॉस्टेलवर झोपा काढत पडलो होतो. त्यानंतर प्रत्यक्ष जाऊन लिस्टवर आपलं नाव पाहणं, हर्षांनं बधिर होणं, मग स्कूलमधले कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करणं या सगळ्यात दुपार झाली. माझी दिल्लीहून मुंबईसाठी परतीची ट्रेन संध्याकाळी पाचची होती. हॉस्टेलवर परत आलो तेव्हा लॉनवरच काही मुलं लाइनीत उभी असलेली दिसली. निरखून पाहिल्यावर कळलं की ही माझ्याबरोबरच एन. एस. डी.च्या परीक्षेला बसलेली मुलं होती. त्या सगळ्यांची ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधील प्रवेशाकरिता निवड झाली होती. समोर एक उंचपुरा, गोरा मुलगा मिशीला पीळ भरत उभा होता. त्याचे भेदक डोळे माझ्यावर रोखले गेले. ‘‘सिलेक्शन हुआ है?’’ मला वाटलं, हा आपलं अभिनंदन करेल, म्हणून मी हात पुढे केला. पण तो तितक्याच कठोरपणे म्हणाला, ‘‘लाइन में लग जाओ!’’ म्हणजे निवड झाल्याचा आनंद विरायच्या आतच रॅगिंग सुरू झालं होतं तर! आता हे रॅगिंग कुठपर्यंत जाईल याचा विचार मी करत असतानाच त्या मुलानं माझ्या हातात एक माचिसची काडी दिली. ‘‘दो महिने बाद स्कूल जॉइन करने जब वापस आएगा तो ये तिल्ली पास में होनी चाहिये. ये तेरा विसा है. इसके बिना स्कूल में एंट्री नहीं.’’

मी एन. एस. डी.ची ऑफिशियल कागदपत्रं त्या दिवशी हॉस्टेलवरच विसरून मुंबईला परतलो. ती नंतर जयंतानंच मला आणून दिली. पण ती माचिसची काडी मात्र मी प्राणपणानं जपून आणली होती. जाताना ते भेदक डोळे पुन्हा माझ्यावर रोखले गेले. ‘‘और सुन.. जब आएगा तब महाराष्ट्र से जितने एन. एस. डी. पास आऊट्स हुए हैं, उन सबके नाम याद होने चाहिये.’’ आता ही नावं कुठून मिळवायची, हा प्रश्न माझ्या जिभेवरून पडजिभेकडे मी कसाबसा ढकलला. त्यानं हात पुढे केला. ‘‘अश्वत्थ भट.. जम्मू काश्मीर.’’  मघापासून मिलिट्री कंपनी मेजरच्या तोऱ्यात गुरकावणारा हा मुलगा आपलं स्वत:चं नाव सांगतोय, हे कळायला मला दीड सेकंद गेलं. मग मीही हात पुढे केला.. ‘‘चिन्मय मांडलेकर.. मुंबई, महाराष्ट्र.’’ ही माझी आणि माझ्या या मोठय़ा भावाची पहिली भेट!

अश्वत्थचं कुटुंब त्यावेळी दिल्लीच्या एका एम. आय. जी. (मिडल इन्कम ग्रुप) वस्तीत राहत होतं. आई, वडील, मोठा भाऊ. भाऊ दिल्लीत राहत नसे. त्यामुळे आई-वडीलच. पण मुळात भट कुटुंबीय श्रीनगरचे. ‘‘सेवन्टीज के जमाने में मेरे दादाजी के पास ‘इम्पाला’ गाडी थी.’’ त्यानं एकदा मला सांगितलं होतं. घराच्या आवारात स्वत:च्या मालकीचं मोठं देऊळ असण्याइतक्या मोठय़ा घरात अश्वत्थचं बालपण गेलं. स्वत:च्या बागा होत्या. त्यांच्या मालकीच्या प्रॉपर्टीवरच एक खाजगी तळं होतं. काश्मीरच्या नंदनवनात दहशतवादाचा भ्स्मासुर शिरला आणि त्यात लाखो घरं बेचिराख झाली. त्यातलंच एक घर अश्वत्थचं होतं. एन. एस. डी.च्या त्याच्या खोलीत एका थंड रात्री आम्ही दोघंच बोलत बसलो होतो तेव्हा अश्वत्थनं मला ही गोष्ट सांगितली होती. एका रात्री ही मुलं आईकडून गोष्टी वगैरे ऐकून झोपली. स्वप्नांचा पहाटे तीन ते सहाचा शो सुरू झाला असेल-नसेल तेव्हा त्यांना झोपेतून जागं करण्यात आलं. वडील उठवून सांगत होते, की त्यांना कुठेतरी जायचं आहे. जिवाच्या भीतीनं या मंडळींनी फक्त नेसत्या वस्त्रांनिशी रातोरात आपलं महालासारखं घर सोडलं. आई प्रेमानं कानात सांगत होती की, ‘हे काही दिवसांसाठीच आहे. आपण  लवकरच घरी परत येणार आहोत.’ त्यानंतर आजतागायत अश्वत्थच्या आईनं ते घर पुन्हा पाहिलेलं नाही. काही वर्षांपूर्वी स्वत: अश्वत्थ तिथे गेला होता. त्यावेळी त्या घराचे भग्नावशेष पाहून तो परत आला होता. आपली जन्मभूमी सोडून ही सगळी मंडळी दिल्लीला आली. ‘‘मोस्ट ऑफ माय रिलेटिव्ज् डिड नॉट मेक इट. बस से उतार उतार कर गोलीयां मारी उनको.’’ अश्वत्थ कमालीच्या निर्विकारपणे हे सगळं सांगत होता.

आलिशान आयुष्य मागे सोडून दिल्लीच्या एका वस्तीत दोन खोल्यांच्या घरात अश्वत्थच्या आईनं आपला संसार थाटला. तिथंच ही मुलं लहानाची मोठी झाली. शिकली. एखाद्या आडदांड मुलानं आपलं नवंकोरं खेळणं हिसकावून घ्यावं तसं नियतीनं एका रात्रीत त्यांचं सगळं वैभव, सगळं ऐश्वर्य हिरावून घेतलं. पण अश्वत्थची आई तक्रार न करता या सगळ्याला सामोरी गेली. मात्र, हलाखीच्या परिस्थितीत वाढूनही अश्वत्थच्या चेहऱ्यावरचं खानदानी तेज लपून राहत नाही. तसाच आपल्यावर झालेल्या या अक्षम्य अन्यायाविरुद्धचा अंगारही त्याच्या डोळ्यांतून लपून राहत नाही. परंतु घरच्या संस्कारांनी आणि स्वत:च्या चांगुलपणानं त्यानं या अंगाराचा भस्मासुर होऊ दिला नाही. ‘आजचा बळी हा उद्याचा माथेफिरू होतो..’ हे निसर्गनियमाला धरूनच आहे. पण अश्वत्थनं स्वत:चं तसं होऊ दिलं नाही. आपल्यावर झालेला अन्याय हा एका मोठय़ा राजकीय-सामाजिक दुष्टचक्राचा भाग आहे, त्यासाठी कुठलाही एक धर्म, एक जमात सरसकट जबाबदार नाही, याचा विसर त्यानं स्वत:ला पडू दिला नाही. आणि रंगभूमीची प्रकाशवाट गवसल्यावर त्या अंधाऱ्या मार्गाला जायचा तर प्रश्नच नव्हता.

दिल्लीतल्या तीन वर्षांच्या वास्तव्यात मी अश्वत्थच्या घरी अनेक वेळा गेलो, राहिलो. त्याच्या आईनं माझ्यावर मुलासारखा जीव लावला. त्यांना आपापसात गोड कश्मिरीतून बोलताना ऐकलं की कानात कुणीतरी मोरपीस घालून गुदगुल्या करतंय असं वाटायचं. मी मराठी असल्यामुळे अश्वत्थच्या वडिलांचं माझ्यावर विशेष प्रेम. ‘‘कश्मिरी हिंदुओं के लिए खुलकर बोलनेवाला एक ही लीडर था उस वखत. और वो मराठी था. बालासाब ठाकरे!’’ ते आपल्या गोऱ्या हातांची मूठ खुर्चीच्या दांडय़ावर आपटत म्हणायचे.

स्वत: अश्वत्थ मी आणि माझं करणाऱ्यांतला कधीच नव्हता. एकदा तो माझ्या डॉर्मेट्रीत आला. ‘‘आर. के., कल क्या कर रहा है?’’ ‘आर. के.’ हे अश्वत्थनं मला दिलेलं लाडाचं नाव. आर. के.- रंगकर्मी! दुसऱ्या दिवशी रविवार होता. बूड वर करून झोपण्यापलीकडे काहीही करयचं नाही, असं मी ठरवलं होतं. ‘‘कल तू मेरे साथ दरियागंज चलेगा.’’ माझे झोपण्याचे सारे मनसुबे उधळून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या स्कूटरवर मागे बसून मी दरियागंजला गेलो. दिल्लीत दर रविवारी दरियागंज या भागात पुस्तकांचा भलामोठा बाजार लागतो. सुरेन्द्र मोहन पाठकच्या ‘खुनी जालसाज’पासून ‘शेक्सपीयर कंप्लीट वर्कस्’  किंवा दान्तेच्या ‘डिवाईन कॉमेडी’पर्यंत कुठलंही पुस्तक तुम्हाला तिथे मिळू शकतं. फक्त तीन ते चार किलोमीटर लांब पसरलेल्या या पुस्तक बाजारात पायपीट करायची तयारी हवी. ‘‘लायब्ररी के लिये किताबें उठानी है. अवर लायब्ररी नीड्स टू बी अपडेटेड.’’ काही आठवडय़ांपूर्वीच मी आणि अश्वत्थ ‘स्टुडंट्स युनियन’च्या लायब्ररी कमिटीवर नियुक्त झालो होतो. पण या नियुक्तीचा अर्थ आपण लायब्ररियनकडे रिक्विझेशन फॉर्म भरून देऊन अधूनमधून ‘फॉलोअप’पर विचारपूस करत राहायची, एवढाच मी घेतला होता. स्वत: पुस्तकं खरेदी करून ती ओझी स्कूटरवरून वाहत स्कूलपर्यंत न्यायची- या लष्कराच्या भाकऱ्या कशाला? मी माझा मुद्दा मांडताच अश्वत्थनं भर रस्त्यात माझ्या पाठीत सणसणीत गुद्दा घातला. ‘‘रिक्विझेशन का फॉलोअप करता रहेगा तो पुरा साल निकल जाएगा और किताबें भी नहीं आएगी. लायब्ररी अपनी है. किताबें हमारी है. सो व्हाय वेट फॉर एनीबडी?’’ त्यानंतरचे पाच ते सात रविवार आम्ही जवळजवळ शंभर ते दीडशे पुस्तकं विकत घेऊन, वाहून स्कूलच्या लायब्ररीत दाखल केली. आजही एन. एस. डी.ला गेलो की एकदा लायब्ररीत जाऊन सगळ्या पुस्तकांवरून मी हात फिरवून येतो.

एन. एस. डी.च्या तीन वर्षांत अश्वत्थनं धाकटय़ा भावासारखा मला जीव लावला. एन. एस. डी. पास करून अश्वत्थ ‘लंडन अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टस्’ला (लॅम्डा) दोन वर्षांचा कोर्स करायला निघून गेला. तिथून परत येताना अश्वत्थ एक नवीन कला शिकून आला होता.. ‘क्लाऊनिंग’! परंपरागत विदूषकाच्या या कलेला पश्चिमेकडच्या काही लोकांनी खूप कन्टेम्पररी केलं आहे. अ‍ॅक्टिंग, मायमिंग याचबरोबर ‘क्लाऊनिंग’ हे एक वेगळं शास्त्र म्हणून उदयाला आलेलं आहे. आज अश्वत्थला फोन केला तर तो जगाच्या पाठीवर कुठे असेल याचा काही नेम नसतो. मध्यंतरी त्यानं ‘मन्टो’वर एक एकपात्री दीर्घाक केला होता. त्याचे त्यानं जगभरात प्रयोग केले. आताही ‘क्लाऊनिंग वर्कशॉप्स’च्या निमित्तानं त्याची जगभर भ्रमंती सुरू असते. आपल्या मुळांपासून एका रात्रीत  उखडला गेलेला हा माणूस आज खऱ्या अर्थानं विश्वबंधू झालेला आहे.

माझे वडील गेल्यानंतर अश्वत्थ जग पालथं घालून मला भेटायला आला होता. काही दिवस माझ्या घरी राहिला. बाबा गेल्यानंतरच्या हरवलेल्या अवस्थेत मनाला आधार मिळाला. तो निघत असताना मी त्याला माचिसची एक काडी दिली. म्हटलं, ‘‘अगली बार मिलेंगे तब वापस करना.’’ त्यानंतर अश्वत्थची आणि माझी भेट चार वर्षांनी माझ्या लग्नात स्टेजवरच झाली. अश्वत्थनं आहेराचं पाकिट माझ्या हातात देत त्याच्याकडे नजरेनंच इशारा केला. मी उघडून पाहिलं. त्यात एक माचिसची काडी होती.

चिन्मय मांडलेकर

aquarian2279@gmail.com

First Published on December 17, 2017 1:14 am

Web Title: jayant jathar chinmay mandlekar