रत्नागिरी-सिंधुदुर्गात विनायक राऊत, तर रायगडमध्ये सुनील तटकरे विजयी

कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढल्यामुळे, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी जागा राखल्याने सामना बरोबरीत सुटला आहे.

कोकणच्या या तीन जिल्ह्यंमध्ये मिळून लोकसभेच्या दोन जागा आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत यापकी रायगड मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तटकरे यांचा निसटता पराभव केला होता. या वेळीही याच दोन प्रतिस्पर्ध्यामध्ये मुख्य लढत झाली. पण गेल्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली होती. शेतकरी कामगार पक्षाने स्वतंत्र उमेदवार उभा न करता तटकरेंना पाठिंबा दिला, तर आत्तापर्यंत गिते यांच्याशी राजकीय वैमनस्य असलेले सेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत गिते यांच्या पाठीशी ताकद उभी केली. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणेच याही वेळी प्रत्येक फेरीगणिक विजयाचे पारडे दोन्ही बाजूंकडे झुकत राहिले. पण अखेर डावपेचांमध्ये सरस ठरलेल्या तटकरे यांनी बाजी मारली. त्याचबरोबर सलग सात वेळा खासदार झालेल्या गिते यांच्याबद्दल नाराजी नसली तरी बदल हवा, अशी मतदारांमध्ये भावना होती. मतदान यंत्रातूनही ती प्रभावीपणे व्यक्त झाल्यामुळे तटकरेंचा विजय सोपा झाला.