बालाकोट एअर स्ट्राइक आणि त्यानंतर दुसऱ्यादिवशी काश्मीरच्या आकाशात पाकिस्तानी फायटर विमानांबरोबर झालेल्या डॉगफाइटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपाने आज उत्तर दिले. बालकोट एअर स्ट्राइक कसा यशस्वी ठरला. पाकिस्तानचे एफ-१६ विमान कसे पाडले. त्याचे मुद्देसूद प्रेझेंटेशन करुन राज ठाकरेंचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानांनी अचूक बॉम्बफेक केली पण तिथे दहशतवादी नव्हते. आपण पाकिस्तानचे एफ-१६ फायटर विमान पाडले नाही. आपल्याला खोटे सांगितले जात आहे. पाकिस्तानचे दहा दहशतवादी मेले असते तर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने सोडले नसते. इम्रान खानला पाकिस्तानात जिवंत जाळला असता हे राज ठाकरे यांचे आरोप आहेत.

या सर्व आरोपांना आज भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रेझेंटेशनद्वारे उत्तर दिले. एअर स्ट्रइकनंतर तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना युद्ध नको होते. युद्धबंदी हवी होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा तीच मागणी होती. त्यासाठी त्यांनी पत्रक काढले होते. एफ-१६ पाडलं नाही हे पाकिस्तान म्हणत होते. कारण हे मान्य केले तर जगासमोर पाकिस्तानची लाज जाईल. एफ-१६ पाडलं नाही हीच गोष्ट राज ठाकरेही बोलत होते. अजित डोवाल यांना अटक करा अशी मागणी पाकिस्तानी मीडियामधून येत होती. राज ठाकरे सुद्धा तेच बोलत होते. अजित डोवाल यांना पकडा सत्य काय ते बाहेर येईल. इम्रान खानच्या प्लानप्रमाणे राज ठाकरे का बोलतात? हा प्रश्न कोणाला पडला तर त्यात चूक काय. त्याचे उत्तर राज यांनी दिले पाहिजे अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली.