केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस उरलेले आहेत. त्यामुळे तेथील राजकीय वातावरण कमालीचे तापलेले आहे. सत्ताधारी LDF, काँग्रेसप्रणीत UDF आणि भाजपाप्रणीत NDA या तीन प्रमुख आघाड्यांमध्ये केरळ विधानसभेचा सामना रंगणार आहे. दरम्यान, आज (मंगळवार) मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत, भाजपावर निशाणा साधला आहे.

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत मुख्यमंत्री पिनरायी विजयन म्हणतात, पाच वर्षांपूर्वी काँग्रेसबरोबर मॅच फिक्सिंग करून भाजपाने राज्यातील पहिली जागा जिंकली होती. यावेळी त्याचं हे खातं आम्ही नक्की बंद करू. तसेच, या निवडणुकीत भाजपाचा मतांचा वाटा कमी होईल, असेही मुख्यमंत्री विजयन म्हणाले.

दरम्यान, या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) केरळमध्ये ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन यांच्यासाठी प्रचार करताना पिनराई विजयन सरकारवर टीका केली होती. “केरळमध्ये सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रंट(एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत विरोधी आघाडी यूनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट(यूडीएफ)ची केवळ नावं वेगळी आहेत आणि दोन्ही आघाड्यांमधील मॅच फिक्सिंग हे केरळच्या राजकारणातील सर्वात वाईट रहस्य आहे.” असं मोदी म्हणाले होते..

Kerala Elections – “LDF ने सोन्याच्या काही तुकड्यांसाठी केरळला धोका दिला”

तसेच, एलडीएफवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदींनी गोल्ड स्मगलिंग स्कॅन्डलचा उल्लेख केला. ज्यामध्ये मुख्यमंत्री पिनारायी विजयनच्या कार्यालयावर देखील आरोप झाले होते. “जूडासने चांदीच्या काही नाण्यांसाठी लॉर्ड क्राइस्टचा विश्वासघात केला होता… तशाचप्रकारे एलडीएफने देखील सोन्याच्या काही तुकड्यांसाठी केरळला धोका दिला.” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

केरेळमध्ये ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून, २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.