पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कायमच काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. गांधी घराण्याने देशावर राज्य केले असे उदाहरण कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणांमध्ये देत असतात. इतकंच नाही तर त्यावरून टीकाही करत असतात. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आमच्या पक्षात घराणेशाहीला स्थान नाही असा दावा करणाऱ्या मोदींना हे बहुदा माहित नाही की लोकसभा निवडणुकांच्या वेळी जे उमेदवार भाजपाने दिले आहेत त्यात घराणेशाही हा मुद्दा धरला तर भाजपाने काँग्रेसला मागे टाकले आहे.

भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी ३८ टक्के उमेदवार हे घराणेशाहीतले आहेत. तर काँग्रेसमध्ये हे प्रमाण २६ टक्के आहे. शिवसेनेत हे प्रमाण ३० टक्के आहे तर राष्ट्रवादीचा आकडा सर्वाधिक म्हणजेच ५९ टक्के इतका आहे. मात्र ज्या काँग्रेसवर सातत्याने टीका केली जाते त्या काँग्रेसपेक्षा भाजपाची घराणेशाही जास्त आहे हेच दिसून येते. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

 

 

कोणत्या पक्षात कशी आणि किती घराणेशाही आहे हे यादीवरूनच स्पष्ट होतं

भाजपाच्या २३ उमेदवारांपैकी ९ उमेदवार हे घराणेशाहीतले आहेत

१) हिना गावित, लोकसभा मतदार संघ-नंदुरबार, हिना गावित या महाराष्ट्राचे माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत

२) सुभाष भामरे, लोकसभा मतदारसंघ- धुळे, माजी आमदार गोजराताई भामरे यांचा मुलगा

३) रक्षा खडसे, लोकसभा मतदारसंघ-रावेर, माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या कन्या

४) भारती पवार, लोकसभा मतदारसंघ-दिंडोरी, माजी आमदार ए. टी. पवार यांच्या कन्या

५) पूनम महाजन, लोकसभा मतदारसंघ- मुंबई उत्तर मध्य, भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या

६) कांचन कुल, लोकसभा मतदारसंघ-बारामती, रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी

७) सुजय विखे पाटील, लोकसभा मतदारसंघ-अहमदनगर, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा

८) प्रीतम मुंडे, लोकसभा मतदारसंघ-बीड, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या

९) रणजीतसिंह निंबाळकर लोकसभा मतदारसंघ -माढा (अद्याप घोषणा बाकी)- माजी खासदार हिंदुराव निंबाळकर यांचा मुलगा

 

काँग्रेसची यादी पुढीलप्रमाणे

१) कुणाल रोहिदास पाटील, लोकसभा मतदारसंघ-धुळे, माजी आमदार रोहिदास पाटील यांचा मुलगा

२) चारूलता टोकस, लोकसभा मतदारसंघ-वर्धा, दिवंगत खासदार प्रभा राव यांच्या कन्या

३) अशोक चव्हाण, लोकसभा मतदारसंघ-नांदेड, दिवंगत केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र

४) प्रिया दत्त, लोकसभा मतदारसंघ-मुंबई उत्तर मध्य, माजी खासदार सुनील दत्त यांची मुलगी

५) मिलिंद देवरा, लोकसभा मतदारसंघ- मुंबई दक्षिण, माजी खासदार मुरली देवरा यांचा मुलगा

६) विलास औताडे, लोकसभा मतदारसंघ-जालना, माजी आमदार केशवराव औताडे यांचा मुलगा

या यादीवरूनच हे स्पष्ट होते की घराणेशाहीत भाजपाने काँग्रेसलाही मागे टाकले आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी एक ब्लॉग लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीला पक्षात स्थान नसल्याचे म्हटले होते. मात्र ही यादीच या प्रश्नाचे उत्तर आहे असेच दिसते आहे.