|| विद्याधर कुलकर्णी

निवडणुकीतील रोजगार

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचार रथाचे चालक.. रथावर बसून प्रचारपत्रके वाटणारे कार्यकर्ते..  कण्र्यावरून प्रचाराची वर्दी देणाऱ्या रिक्षांच्या फेऱ्या.. उमेदवारांच्या कार्याची माहिती नाटय़ाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचविणारे पथनाटय़ सादर करणारे कलाकार..  अशा साऱ्यांची गेल्या दहा दिवसांपासून जणू लगीनघाई सुरू आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर म्हणजे ८ एप्रिल रोजी पुणे आणि बारामती मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचार यंत्रणा कामाला लागल्या. तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या स्वपक्षातील लोकांची भेट घेऊन त्यांना प्रचारामध्ये सामील करून घेण्यात काही उमेदवारांचे चार-पाच दिवस गेले. गुढीपाडव्यापासून प्रचाराची सुरुवात करीत विजयाची गुढी उभारण्याचा निर्धार करण्यात आला. तेव्हापासून प्रचाराने गती घेतली. रविवारी (२१ एप्रिल) प्रचाराच्या तोफा थंडावणार असून उर्वरित तीन दिवसांत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी सर्वच उमेदवार आणि त्यांच्या प्रचार यंत्रणेत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

भारतीय जनता पक्ष उमेदवाराच्या प्रचाराची सूत्रे जंगली महाराज रस्त्यावरील निवडणूक कार्यालयातून, तर काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची सूत्रे काँग्रेस भवन येथून हलविण्यात येत आहेत. पदयात्रा आणि जाहीर सभांबरोबरच मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रचार रथ, उमेदवाराच्या कार्याची माहिती ध्वनिवर्धकावरून देत फिरणाऱ्या रिक्षा आणि पथनाटय़ाचे सादरीकरण अशा पारंपरिक आणि समाजमाध्यमांचा प्रभावी वापर असा आधुनिक मार्गही अवलंबण्यात आला आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय दोन रथ, १६ ते २० रिक्षा, सायकल रिक्षा सध्या प्रचार करण्यामध्ये गुंतल्या आहेत. रथ, रिक्षाचालक आणि सायकलरिक्षाचालक अशा अनेकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. पथनाटय़ सादर करणाऱ्या हौशी कलाकारांना मानधनाबरोबरच भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. वेगवेगळ्या मार्गानी असंख्य हात प्रचार कार्यामध्ये गुंतले आहेत.