ग्रामीण भागात उत्साह, शहरी मतदारांचे सोयीने मतदान

यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात आज सकाळी ७ वाजतापासून मतदानास प्रारंभ झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री उशिरा मतदानाची नेमकी आकडेवारी कळेल. या निवडणुकीत २४ उमदेवार रिंगणात होते. मात्र, काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारातच मुख्य लढत असल्याचे चित्र आज स्पष्ट  झाले. मतदारसंघात १९ लाख १४ हजार ७८५ मतदार संख्या आहे. २ हजार २०६ केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले.

Nagpur, BJP MLA sister, deprived of voting,
नागपूर : भाजप आमदाराच्या भगिनीचेच नाव मतदार यादीतून वगळले
Bhiwandi Lok Sabha Constituency, election 2024, Maha Vikas Aghadi, mahayuti, Suresh mhatre alias Balya Mama
भिवंडी लोकसभा मतदारसंघ विकास कामांमध्ये ढ; महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा यांची टीका
Lok Sabha Election 2024 Phase 1 Live Updates in Marathi
Lok Sabha Election 2024 Phase 1 : विदर्भात ५ जागांसाठी आज मतदान; नक्षलग्रस्त, संवेदनशील भागांत चोख सुरक्षा व्यवस्था
Unemployment inflation are the important issues trend in CSDS pre election survey
बेरोजगारी, महागाई हेच महत्त्वाचे मुद्दे; ‘सीएसडीएस’ निवडणूकपूर्व सर्वेक्षणातील कल

मतदारसंघात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड, मतदार यादीत नाव नसणे, मतदान केंद्र ऐनवेळी बदलणे, अशा अडचणींमुळे मतदानासाठी उत्साहाने आलेल्या मतदारांचा खोळंबा झाला. सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ५ टक्के मतदान झाले होते. दुपारी रणरणत्या उन्हात मात्र अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह अधिक होता. ग्रामीण भागात महिलांनी मोठय़ा प्रमाणात मतदानात सहभाग घेतला. शहरी मतदार सोयीने मतदानासाठी बाहेर पडला. यावेळी वृद्ध, दिव्यांग मतदारांसाठी केलेल्या व्हिलचेअर, रॅम्प आदी उपाययोजनांचा मोठा फायदा मतदारांना झाला. काही मतदान केंद्रांवर लहान मुलांसाठी पाळणाघराची केलेली व्यवस्थाही मतदान टक्केवारी काही अंशी वाढण्यास सहाय्यकारी ठरली.

काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे हे सकाळी ८ वाजता येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आपल्या मूळ गावी हरू (ता. दारव्हा) येथे मतदानासाठी गेले. तेथे आईचा आशीर्वाद घेऊन त्यांनी सहपरिवार मतदान केले. शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांनी सकाळी दारव्हा येथे श्रीरामाचे दर्शन घेऊ न अनेक गावांमध्ये भेटी देत दुपारी २ वाजताच्या सुमारास वाशीम येथे मतदानाचा हक्क बजावला. प्रहारच्या वैशाली येडे यांनी राजूर (ता. कळंब) येथे मतदान केले. याशिवाय यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी यवतमाळ येथे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दारव्हा येथे मतदान केले.

‘चला हवा येऊ  द्या’ फेम अंकुर वाढवे हा कलाकार मतदानासाठी खास मुंबईहून पुसद येथे आला होता. त्याने पुसदच्या पाटबंधारे वसाहतीतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे जिल्हा परिषद शाळेत मुंडावळ्या बांधून नवरदेव मतदानाला आला. भूषण केवटे याचे आज लग्न होते. मतदानाचा अधिकर बजावून तो विवाहासाठी रवाना झाला, तर आर्णी येथील केयुरी डहाके या वधूने विवाहापूर्वी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य महत्त्वाचे असल्याचा संदेश दिला.

यवतमाळ येथील दादासाहेब मांडळे शाळेतील मतदान केंद्राचे व्यवस्थापन केवळ महिलांकडून केले गेले. अशी आठ ‘सखी मतदान केंद्र’ आज कार्यान्वित होते. येथे ३२ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या मतदान केंद्रावर मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शहरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक नगर परिषद शाळेत मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी दिव्यांग कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. प्रशासनाच्या या दोन्ही उपक्रमांचे मतदारांनी कौतुक केले.

मतदान प्रक्रियेदरम्यान काही केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी उद्भवल्या. मतदारसंघात चारपेक्षा अधिक केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदारांचा खोळंबा झाला. त्यामुळे काही ठिकाणी ४० मिनिटे ते एक तास उशिराने मतदान प्रक्रिया सुरू झाली. यवतमाळातील म्युनसिपल हायस्कूल, वेणी कोठा (ता. कळंब) येथील जिल्हा परिषद शाळा आदी ठिकाणी या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, या तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. यादरम्यान मतदारसंघात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र सुरळीत मतदान पार पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.९६ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही सरासरी टक्केवारी ६०च्या घरात गेली. ५ वाजेनंतर शहरी भागातील मतदान केंद्रावर बऱ्यापैकी गर्दी होती. २०१४ मध्ये मतदानाची टक्केवारी ५८.८० इतकी होती. त्यात यावेळी काही अंशी वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

आता २३ मेपर्यंत उमेदवारांसह नागरिकांनाही निकालाची दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भंडारा-गोंदियात सरासरी ६७ टक्के मतदान

गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मिळून २२८४ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. सहा विधानसभा मतदारसंघातील १८ लाख ८ हजार ९४८ मतदार आहेत. त्यातील सरासरी ६७ टक्के सरासरी मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असली तरी १० वाजेपर्यंत पाहिजे तसा प्रतिसाद बघावयास मिळाला नाही. तिरोडा व गोंदिया शहरातील मतदान केंद्रावरही गर्दी नव्हती. मात्र, गोंदियातील काही मतदान केंद्रावर नवमतदारांनी मतदान करीत आपण देशासाठी मतदान करीत असल्याचे सांगितले, तर एकोडी येथील नवमतदाराला विचारणा केली असता शिक्षणासाठी मी मतदार करीत असल्याचे सांगितले, यावर विद्यमान सरकारने तर शिक्षणच बंद करीत सर्व योजना बंद केल्या, मग कसे करणार मतदान यावर मात्र लगेच भूमिका बदलत देशासाठी मतदान करणार, असे सांगितले. यावरून युवक जो नवमतदार आहे तो आपल्या भविष्याची शिक्षणाची नोकरीची रोजगाराबद्दलची काय योजना आहे, सरकार काय करते, याकडे दुर्लक्ष करीत फक्त देशप्रेम यावरच मतदान करीत असल्याचे चित्र दिसून आले.

गोंदिया व भंडारा येथील काही मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड आल्याने मतदारांना त्रास झाला. निवडणूक निरीक्षक पार्थ यांनी गोंदिया शहरातील सिंधी शाळा, कुडवा जिल्हा परिषद शाळा, बीएचजे हायस्कूल वसंतनगर, एकोडी, तिरोडा शहरातील मतदान केंद्राची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. कादबंरी बलकवडे यांनी फुलचूर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तिरोडा तालुक्यातील खमारी बूथवर १०७  वर्षीय तुरजाबाई शिवजी भांडारकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाप्रती जनजागृती व्हावी, यासाठी मतदारांनी समाज माध्यमावर आपले मतदानाचे छायाचित्र काढून प्रसारित केले. गोंदिया येथील नमाद महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सहकुटुंब मतदान केले, तर गोंदियात माजी आमदार राजेंद्र जैन यांनीही गोंदियात कुटुंबासह मतदान केले.

आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सहकुटुंब मतदान केले. गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी येथील मतदान केंद्रावर सपत्निक मतदान केले. या लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमदेवार नाना पंचबुद्धे यांनी सहकुटुंब भंडारा शहरातील नूतन शाळेच्या केंद्रावर मतदान केले, तर भाजप उमदेवार सुनील मेंढे यांनी भंडारा शहरातील नूतन शाळेतील केंद्रावर मतदान केले.

वर्धेत मतदान शांततेत, ५५ टक्के मतदानाची नोंद

वर्धा : मतदानविषयक विविध तक्रारीचे चर्चेत राहिलेले आजचे मतदान अनुचित प्रकार न घडता आटोपले असून सायंकाळपर्यंत सरासरी ५५.३८ टक्के मतदानाची नोंद झाली.

वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान सुरू होताच व्होटर स्लीपच्या तक्रारी प्रामुख्याने सुरू झाल्या. बहुतांश केंद्रावर मतदार या पावतीशिवायच पोहोचले. केंद्रस्तर अधिकारी (बीएलओ) वर्ग या कामात उदासीन राहिल्याने हा गोंधळ सुरू झाल्याचा आरोप सर्वच पक्षनेत्यांनी केला. शेवटी मतदारांनी आपापल्यापरीने केंद्र व मतदार क्रमांक शोधून मतदान केले.

पिपरी मेघे व अन्य दोन गावात ईव्हीएम एक तास बंद पडले होते. अधिकाऱ्यांनी धावाधाव करीत मतदार सुरळीत केले. नागठाणा येथील गावकऱ्यांनी महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मुद्यावरून मतदानावर बहिष्कार टाकला होता. अखेर स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन समजूत काढल्यानंतर दुपारी मतदान सुरू झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी काँग्रेस उमेदवार श्रीमती टोकस यांच्या विरोधात तक्रार केली. काँग्रेस उमेदवार स्वत:चे छायाचित्र व निवडणूक चिन्ह असलेल्या पावत्या वाटत असून हा आचार संहितेचा भंग असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. मतदानाची मुदत सायंकाळी सहापर्यंत असूनही मतदान केंद्रावर रांगा होत्याच.

सायंकाळी पाचपर्यंत झालेले मतदान याप्रमाणे- धामणगाव- ५३.१३, मोर्शी- ५५.८७, आर्वी- ६१.३६, देवळी- ५३.८३, हिंगणघाट- ५५.६५ व वर्धा- ५३.३०. यामध्ये पुरुषांचे ५९.१७ तर महिलांचे ५१.३९ टक्के मतदान असून इतर २२.२२ टक्के मतदान आहे.

गडचिरोली-चिमूरमध्ये सरासरी ६१.३३ टक्के मतदान

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६१.३३ टक्के मतदान झाले आहे. भाजपाचे अशोक नेते, काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यासह पाच उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी, आरमोरी तसेच गोंदिया जिल्हय़ातील आमगाव या चार विधानसभा क्षेत्रात दुपारी ३ वाजता मतदान केंद्र बंद करण्यात आले.

गडचिरोली मतदारसंघ हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दुर्गम व नक्षल प्रभावित गावात सकाळी ७ वाजतापासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत १८.१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर १ वाजेपर्यंत ४३.४३ टक्के मतदान झाले, तर दुपारी ३ वाजेपर्यंत ५७.३२ टक्के मतदान झाले. अनेक दुर्गम भागात मतदान केंद्र नसल्यामुळे पाच ते सहा किलोमीटरचा पायदळ प्रवास करून नागरिक मतदानासाठी येत आहे. मतदारांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. मात्र, अनेक ग्रामस्थांना उमेदवार कोण आहे यांची सुद्धा कल्पना नाही. केवळ पक्षाकडे बघून मतदान करतानाचे चित्र गडचिरोलीतील ग्रामीण भागात आहे. नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली अहेरी, आरमोरी तसेच गोंदिया जिल्हय़ातील आमगाव विधानसभा क्षेत्रातील मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजता बंद करण्यात आली. या भागात नक्षल कारवाया तसेच निवडूणक प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक पथकाला जाण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता निवडणूक विभागाने दुपारी ३ वाजता या चार विधानसभा क्षेत्रातील मतदान प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. तसेच ब्रम्हपुरी व चिमूर या दोन मतदारसंघात मतदान प्रक्रिया सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालली.