25 February 2020

News Flash

रामटेक मतदारसंघातील मतमोजणीदरम्यान गोंधळ

काँग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांनी ईव्हीएम यंत्रासह इतर विषयांबाबत पंधराहून अधिक आक्षेप नोंदवले.

संग्रहित छायाचित्र

काँग्रेस उमेदवार गजभिये यांच्याकडून अनेक तक्रारी

नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघातील पहिल्या फेरीतील मतमोजणीची आकडेवारी सकाळी १०.४२ वाजले तरी जाहीर केली जात नसल्याने संताप व्यक्त करत काँग्रेससह इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातला. प्रशासनाने समजूत घातल्यावर ते शांत झाले. मतमोजणीदरम्यान काँग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांनी ईव्हीएम यंत्रासह इतर विषयांबाबत पंधराहून अधिक आक्षेप नोंदवले.

रामटेक मतदारसंघातील मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू झाली. सुरुवातीला उमरेड विधानसभा क्षेत्रातील एका केंद्रावरील एका ईव्हीएमची बॅटरी १०० टक्के डिस्चार्ज तर दुसऱ्या ईव्हीएममध्ये २ सीयू क्रमांक दाखवले जात होते. यावर गजभिये यांनी आक्षेप घेतला. या यंत्रावरील व्हीव्हीपॅटची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली. या मतदारसंघातील आठव्या फेरीपर्यंत सुमारे १० ते १२ ईव्हीएमची बॅटरी संपणे, विविध पक्षांच्या उमेदवारांची आकडेवारी न दिसणे, सीयू क्रमांक समरूप नसणे याबाबत तब्बल १५ ते १७ आक्षेप किशोर गजभिये यांनी नोंदवले.

शासनाच्या माहिती व जनसंपर्क कक्षाकडून मात्र एकही लेखी तक्रार नसल्याचा दावा करण्यात आला. किशोर गजभिये यांनी शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या विनंतीवरून खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल आणि भाजपचे आमदार व शासनाच्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य आमदार सुधीर पारवे यांचे मतमोजणी प्रतिनिधी म्हणून प्रशासनाने केलेल्या नियुक्तीवरही बोट ठेवले.

नियमांना तिलांजली दिल्याचा आरोप

नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या एका याचिकेवर उच्च न्यायालयात जिल्हाधिकारी यांनी लेखी स्वरूपात एआरओ यांच्या टेबलावर एकही ईव्हीएमची मतमोजणी होणार नसल्याचे सांगत उमेदवारांच्या प्रतिनिधी नियुक्तीस नकार दिला. न्यायालयाचा हा नियम रामटेक लोकसभा मतदारसंघातही लागू होतो. परंतु येथे नियमांना तिलांजली देत एकही उमेदवाराचा प्रतिनिधी नसताना ईव्हीएमची मतमोजणी एआरओच्या टेबलावर झाल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांनी केला.

First Published on May 24, 2019 2:11 am

Web Title: lok sabha election 2019 mess during the votes counting in ramtek constituency
Next Stories
1 भाजप मुख्यालयात राहुल गांधींच्या पराभवाची चर्चा..
2 वैचारिक लढाई निर्णायक वळणावर
3 युती-आघाडीची कोकणात बरोबरी
Just Now!
X