सरकारी सवलतींचा त्याग करण्यापासून ते देशाच्या शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी कराच्या रूपाने पैसा देणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या योगदानातूनच देश चालतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील प्रचारसभेत मध्यमवर्गीय मतदारांना साद घातली.

मुंबईतील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वांद्रे- कुर्ला संकुलात झालेल्या प्रचार सभेत मोदी यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील सहभागी होते. या सभेत मोदी यांनी मुंबईचे प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा यांचा ऊहापोह केला. मुंबईकरांना हवेचा बरोबर अंदाज येतो. या वेळीही ते रालोआलाच पाठिंबा देतील, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.

देशावर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना आम्ही त्यांच्या देशात घुसून मारले असून यापुढेही त्यांनी आगळीक केल्यास पाताळातून बाहेर काढून त्यांना मारू, असा इशारा देत मोदी यांनी अनेक दहशतवादी हल्ले सोसलेल्या मुंबईकरांना सुरक्षेची हमी दिली. देशातील विविध योजनांना, पायाभूत क्षेत्र विकासाला पैसा पुरवून देश चालवतो. अशा मध्यमवर्गाचा काँग्रेस जाहीरनाम्यात साधा उल्लेखही नाही, अशा शब्दांत मोदी यांनी काँग्रेस मध्यमवर्गविरोधी असल्याचा दावा केला.

साध्वी प्राज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे पोलिसांमध्ये नाराजी पसरली आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांचे शौर्य, त्याग, बलिदान यांचे कौतुक पंतप्रधान मोदी यांनी केले. आजवर ३३ हजार पोलीस शहीद झाले असून पोलिसांचे देशातील पहिले स्मारक नवी दिल्ली येथे उभारण्याचे काम भाजप सरकारने केले, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

मराठीतून सुरुवात..

मोदी यांनी भाषणाची सुरुवात ‘ कसं काय मुंबई, सगळे ठीक आहे ना‘, अशी मराठीतून केली. उद्धव हे माझे लहान भाऊ असल्याचा पुनरुच्चार करत मुंबादेवी, सिद्धीविनायक यांना नमन करत मोदी यांनी मुंबईकरांच्या भावनेला हात घातला. मोदी यांनी आपल्या भाषणात डबेवाले, काळी-पिवळी टॅक्सी, मच्छिमार, व्यापारी अशा सर्व प्रमुख समाजघटकांचा उल्लेख केला.

‘भगव्यासाठी युती’

भगव्यासाठी भाजप-सेना युती झाली असून मोदी सरकार राम मंदिर उभारणारच, ३७० कलम रद्द करणार व दहशतवाद्यंना मारणारच, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मोदी हेच पुढील पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘मोदीजी को हराना बच्चोंका खेल नहीं है, ये मुंबई का आर्थर रोड जेल नहीं है‘ अशा कविता रामदास आठवले यांनी ऐकवल्या.

भाषण सुरू असतानाच गर्दी ओसरू लागली

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या सभेतून भाजप आणि शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असताना गर्दी ओसरू लागली होती. मोदींचे भाषण सुरू होताच ‘भारत माता की जय. मोदी.मोदी’ या घोषणाबाजीत गर्दीने त्यांचे स्वागत केले. मात्र पुढल्या पाच मिनिटांतच काही लोक मैदानाबाहेर पडू लागले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अगोदर भाषण झाल्याने शिवसैनिकांनी बहुधा मैदान सोडले असावे, असे संबंधितांकडून सांगण्यात आले.

लांडगे-कोल्हे आणि पोपट

जंगलात निवडणूक लागली आणि लांडगे, कोल्हे एकत्र आले. त्यांनी सोबत एक पोपट घेतला. पण समोर वाघ आणि सिंह एकत्र आल्याचे त्यांना माहिती नव्हते. आता सिंह-वाघ एकत्र आल्याने निकाल काय लागणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि मनसेवर नाव न घेता निशाणा साधला.