राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार प्रचारासाठी जनतेच्या प्रत्यक्ष भेटी-गाठी घेण्यावर भर देत आहेत. त्यासाठी ते दिवस-रात्र एक करीत आहेत. काल रात्री ते रस्त्यावरुन धावत जाऊन लोकांच्या भेटी घेताना तर आज बैलगाडी हाकताना, रेल्वेतून तसेच रिक्षातून प्रवास करताना दिसले. मात्र, त्यांच्या या खटाटोपाचे रुपांतर मतांमध्ये होऊ शकेल का? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील इस्कॉन मंदिराच्या श्री जगन्नाथ रथयात्रेत त्यांनी धार्मिक गीतांवर ठेका धरला होता. तसेच काल रात्री ते पनवेलमध्ये रस्त्यावरुन धावताना दिसले. त्यामुळे पार्थ पवार हे सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहेत.

दरम्यान, आज मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ यांचा प्रचार दौरा सुरू आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून ते प्रचारात व्यस्त असून मावळमधील शिवणे येथे त्यांनी बैलगाडी हाकली. एका ठिकाणी त्यांनी रिक्षातूनही प्रवास केला. परंतू, त्यांच्या या स्टंटबाजीचे रूपांतर मतात होणार का? हा मोठा प्रश्न असून पार्थ यांच्याकडून येणाऱ्या काळात आणखी किती स्टंट बघायला मिळतील हा चर्चेचा विषय आहे.