संजय मंडलिकांच्या मदतीला चंद्रकांत पाटील, सतेज पाटील

कोल्हापूर : राजकारणाचा कॅलिडोस्कोप कसा बदलेल आणि कोणता रंग धारण करेल याची शाश्वती देता येत नाही. असेच काहीसे कोल्हापूर जिल्ह्यत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. जिल्ह्यच्या राजकारणावर प्रभुत्व असलेल्या तीन प्रमुख नेत्यांचे नातेसंबंध पूर्णत: बदलल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना खासदारच नव्हे, तर केंद्रात मंत्री रूपात पाहणारे भाजपचे नेते, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे आता, त्यांनी आमची मैत्री पहिली, दुश्मनी पाहू नका, इतपत आR मक झाले आहेत. तर, मंत्री पाटील यांनी वर्षभरापूर्वी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची चौकशी करण्याचा इरादा व्यक्त केला होता. आता हे दोन पाटील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या विजयासाठी एकवटले आहेत.

लोकसभा – विधानसभा निवडणुकीपासून कोल्हापूर जिल्ह्यच्या राजकारणाला वेगळे वळण लागले. सेनेचे संजय मंडलिक यांचा पराभव करून धनंजय महाडिक यांनी संसद गाठली. पुढे, त्यांचे चुलते महादेवराव महाडिक यांच्या धोरणामुळे महाडिक कुटुंबीयांची भाजपशी जवळीक वाढली. विधानसभा निवडणुकीत भाजपचे अमल महादेवराव महाडिक यांनी काँग्रेसचे सतेज पाटील यांचा पराभव केला, तर त्यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांना  पराभूत केले. पुढे, महाडिक यांच्या प्रभावाचा लाभ उठवत मंत्री पाटील यांनी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेमध्ये कमळ फुलवले.

पाटील-महाडिक संबंधात कटुता

अगदी, अलीकडेपर्यंत मंत्री पाटील आणि खासदार महाडिक यांचे संबंध मधुर राहिले. सदर बाजार परिसरात सांस्कृतिक सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री पाटील यांनी ‘धनंजय महाडिक दुसऱ्यांदा खासदार होऊ न केंद्रात मंत्री होतील, तर अमल  महाडिक यांचाही विजय होऊ न तेही मंत्री बनतील’ असे जाहीरपणे विधान करुन महाडिक प्रेमाची प्रचिती घडवली होती. आता लोकसभा निवडणुकीत मात्र पालकमंत्री पाटील यांच्या भूमिकेत बदल झाला आहे. या निवडणुकीत ते महाडिक प्रेमाला जागणार अशी चर्चा सुरु झाली होती. महाडिकांना मत म्हणजे एकार्थाने मोदींना मत अशी मांडणी करणारे संदेश प्रसारित होत राहिले. हस्ते – परहस्ते तशी समाज माध्यमांतून पेरणी केली जात असल्याने मतदारांमध्येही ‘दादां’ची निश्चित भूमिका कोणती? यावरून संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, या चर्चांना चंद्रकांतदादांनी एका तडाख्यात उडवून लावले असून आपला इरादा स्पष्ट शब्दांत  व्यक्त केला आहे. युतीधर्माला जागून त्यांनी मंडलिक यांच्या विजयासाठी काटेकोर यंत्रणा कार्यरत केली आहे. खेरीज त्यांनी महाडिक यांना उद्देशून ‘आमची मैत्री पहिली , दुश्मनी पाहू नका ‘ असा रोखठोक इशारा दिला आहे.

पाटील – पाटील मैत्र जुळले

आजरा  नगरपरिषदेच्या वेळची गोष्ट. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार  सतेज पाटील यांना उद्देशून ‘सयाजी हॉटेल, वॉटर पार्क यांच्या जमिनी कुठून आल्या’, अशी विचारणा करून याच्या मुळाशी चौकशीची सूत्रे नेण्याचा इरादा व्यक्त केला होता. त्यावर आमदार पाटील यांनी,  ‘महसूलमंत्री चंद्रकांत पाटील केवळ सूडाचे राजकरण करत आहेत. ‘दादां’ची दादागिरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही’, असे प्रत्युत्तर दिले होते. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. लोकसभा  निवडणुकीत आमदार पाटील यांच्या हाती बाण आहे. याच दिशेने चंद्रकांतदादांची पावले पडत आहेत. याचवेळी एकेकाळी अंतर असणारे मंत्री आणि आमदार पाटील यांची ‘गोकुळ’ दुध संघावरून जवळीक वाढली असून हा सहजासहजी घडलेला योगायोग असल्याचे राजकीय अभ्यासक मानत नाहीत. मंत्री पाटील यांनी महाडिक यांच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेल्या गोकुळ दुध संघाच्या बहुराज्यता निर्णयाला जोरदारपणे विरोध करून आमदार पाटील, चंद्रदीप नरके, हसन मुश्रीफ या तिन्ही आमदारांची सहानुभूती मिळवली आहे. गोकुळच्या मुद्यावरून पाटील – पाटील मैत्र रंगले असून ते संजय मंडलिक यांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.