श्रीलंकेमधील चर्चचमध्ये आणि हॉटेल्समध्ये काल इस्टर संण्डेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २९० जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेमधील या साखळी हल्ल्यांचा वापर आता निवडणुकांच्या प्रचारासाठी केला आहे. २०१४ पूर्वी भारतातही श्रीलंकेसारखीच स्थिती होती असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘काल (रविवारी) श्रीलंकेमध्ये बॉम्बस्फोट झाले. या स्फोटामध्ये इस्टरच्या पवित्र दिवशी शेकडो लोक मारले गेले. ते देवाची प्रर्थना करत असतानाच त्यांना मृत्यू आला,’ असं वक्तव्य मोदी यांनी दिंडोरीमधील सभेमध्ये केले आहे. मोदींचे सरकार सत्तेत येण्याआधी म्हणजेच २०१४ आधी भारतातही अशीच परिस्थिती होती असं मोदी पुढे बोलताना म्हणाले. ‘२०१४ आधी भारतामध्ये काय परिस्थिती होती. तेव्हा देशाच्या या ना त्या कोपऱ्यामध्ये रोज बॉम्बस्फोट होत होते,’ अशी टिका मोदींनी मुंबई, पुणे आणि गुजरातमधील स्फोटांचा संदर्भ देऊन केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला तोंड देण्यास समर्थ नव्हते. त्यांनी अशा हल्ल्यानंतर केवळ आश्रूच गाळले असं मोदी आघाडी सरकारच्या कार्यकाळावर टिका करताना म्हणाले. ‘स्वत:ला अनुभवी म्हणवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार फक्त शोकसभांचे आयोजन करायचे आणि जगभरात पाकिस्तानच्या नावाने रडत फिरायचे,’ असं मोदी म्हणाले. मी पंतप्रधान झाल्यानंतर या परिस्थितीमध्ये बदल झाल्याचेही मोदी यावेळी बोलताना म्हणाले. ‘जेव्हा हा चौकीदार सत्तेत आला तेव्हा आम्ही पाकिस्तानमधील दहशतवादाचे कारखाने उद्धवस्त केले. त्यामुळे आज जम्मू काश्मीरमधील काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहिला आहे. तिथेही आपल्या सुरक्षादलांकडून दहशतवाद्यांना कंठस्थान घातले जात आहे,’ असं मोदींनी यावेळी बोलताना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर ही निवडणूक ळडवण्याचा निर्णय घेतला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताला एक शक्तीशाली आणि निर्णय घेत पाकिस्तानला उत्तर देणाऱ्या सरकारची गरज असल्याचा प्रचार भाजपाकडून केला जात आहे.

भाजप सरकारची जास्तच गरज: सुब्रमण्यम स्वामी

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय कालच भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला भाजपा सरकारची जास्तच गरज असल्याचे म्हटले आहे. “श्रीलंकेतील दहशतवादी घटनेनंतर आपल्याला भाजप सरकारची जास्तच गरज आहे. काँग्रेस दहशतवाद्यांबद्दल स्नेह असणारा पक्ष आहे. आता दिग्विजय सिंग कोलंबोत जे घडलं ते हिंदू दहशतवाद आहे, असं म्हणतील,” असं ट्विट स्वामी यांनी केले आहे.

श्रीलंकेमधील साखळी बॉम्बस्फोटांनंतर मृतांचा आकडा वाढत असतानाच दुसरीकडे भारतात त्यावरुन राजकारण सुरु झाल्याबद्दल अनेकांनी ट्विटवरुन आक्षेप नोंदवला आहे.

एवढ्या लवकर हा राजकारणाचा मुद्दाही झाला

दहशतवादी हल्ल्याचा असा वापर समजण्यापलीकडचा…

शेजाऱ्यांच्या दु:खाचेही राजकारण

हल्ल्याचा राजकारणासाठी होत असलेला वापर पाहून धक्काच बसला

खालच्या स्तराचं राजकारण

दरम्यान कोलंबोतील तीन चर्च आणि तीन हॉटेल्समध्ये झालेल्या या आठ साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा २९०वर पोहोचला असून यात ५ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये ५०० हून अधिक लोक जखमी झाले असून एकूण ४० परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi used the sri lanka terror attack at a poll rally
First published on: 22-04-2019 at 16:34 IST