काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी अमेठीमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी अजानचा आवाज ऐकून राहुल गांधी यांनी मध्येच भाषण थांबवले. अजान पूर्ण होईपर्यंत ते स्तब्ध राहिले.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. भाजपला ‘धोबीपछाड’ देण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधकांनी कंबर कसली आहे. राहुल गांधी यांनी देशभरात रॅली आणि प्रचारसभांचा तडाखा लावला आहे. राहुल गांधी स्वत: अमेठीमधून रिंगणात उतरले आहेत. प्रचारासाठी शनिवारी त्यांनी अमेठीमध्ये सभा घेतली होती. भाषणात राहुल गांधी यांनी मोदींवर टीकेची झोड उठवली होती. भाषण रंगात आले असतानाच अजानचा आवाज ऐकू आला. त्यामुळे राहुल यांनी मध्येच भाषण थांबवले. अजान पूर्ण होईपर्यंत ते स्तब्ध राहिले.

अमेठी मतदारसंघातून काँग्रस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाने स्मृती इराणी यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार झाली आहे. राहुल गांधी यांना रोखण्यासाठी अमेठीमध्ये भाजपानं आपली ताकद पणाला लावली आहे.

राहुल गांधी यांनी या सभेत मोदींवर जोरदार हल्ला चढवला. काळापैसा परत आणण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली होती तर चोर रांगेमध्ये उभे का नव्हते? सर्व प्रामाणिक लोक रांगेत का होते? बेरोजगार आणि शेतकरी रांगेत का होते? कारण चौकीदाराला तुमच्या खिशातून पैसे काढून देशातील १५ बड्या चोरांच्या खिशात घालायचे होते, असं सांगतानाच तुमच्या भावनेशी खेळत मोदींनी १५ लाख रुपये देणार असल्याची थापही मारली, अशी टीका राहुल यांनी केली.