रामदास कदम, दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत अद्याप प्रचारात नाहीत 

औरंगाबाद : मराठवाडय़ातील प्रचारात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यानंतरची प्रमुख नेत्यांची फळी मैदानात उतरलीच नव्हती. रामदास कदम, दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत हे प्रमुख चेहरे मराठवाडय़ात मतदारांना दिसले नाहीत.

शिवसेनेचे प्रमुख नेते अशी ओळख असणारे बहुतांश नेते का आले नाहीत, याची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. रामदास कदम हे सुरुवातीच्या काळात औरंगाबादचे आणि नंतर नांदेडचे पालकमंत्री होते. औरंगाबाद येथे ते आणि चंद्रकांत खैरे यांचे मतभेद दर्शवणाऱ्या अनेक घटना घडल्या होत्या. तरीही त्यांची सभा कन्नड तालुक्यात होईल, असे शिवसेनेच्यावतीने कळवण्यात आले होते. नंतर अपरिहार्य कारणामुळे त्यांची सभा होऊ शकली नाही, असे कळविण्यात आले.

दिवाकर रावते सुरुवातीच्या काळात शिवसेनेचे संपर्क नेते होते. मराठवाडय़ात त्यांनी यात्रा काढली होती. परभणीचे पालकमंत्री होते. मात्र त्यांनाही पुढे बदलण्यात आले. असे असले तरी शेतीप्रश्नांचा त्यांचा अभ्यास अधिक असल्यामुळे मराठवाडय़ातील शेतकऱ्यांशी संवाद साधणारी एखादी सभा होऊ शकेल, असे सांगितले जात होते. मात्र ते मराठवाडय़ात आले नाहीत. या अनुषंगाने रावते यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी सध्या पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला विजय मिळावा यासाठी काम करीत आहे. मराठवाडय़ातील शेतीप्रश्न माहीत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात काम करताना येथील सुबत्ता आणि मराठवाडय़ातील शेतकरी यांची तुलना नेहमी करतो. बाळासाहेबांच्या शिकवणुकीनुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असेच आमचे धोरण आहे.’

केवळ तेच नाही तर डॉ. दीपक सावंत,  खासदार संजय राऊत ही मंडळी मराठवाडय़ात अद्याप तरी फिरकली नाही. एरवी छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांना किमान औरंगाबादला तरी हजेरी लावणारे हे नेते मराठवाडय़ात प्रचारादरम्यान उस्मानाबाद, परभणी या लोकसभा मतदारसंघांत आले नसल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभांवरच मराठवाडय़ात प्रचाराची मदार होती. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आणि नितीन बानगुडे पाटील यांच्या सभा झाल्या आहेत.

प्रत्येक नेत्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे ते कदाचित या भागात आले नसतील. पण मी मराठवाडय़ात सभा घेतल्या आहेत.

– नीलम गोऱ्हे, प्रवक्त्या, शिवसेना