भाजपाचे शत्रु अर्थात बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा हे ६ एप्रिलला काँग्रेस प्रवेश करणार आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. ६ एप्रिलला त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची औपचारिक घोषणा होणार आहे. भाजपाने पटना साहिब या ठिकाणाहून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे ते नाराज होतेच शिवाय याआधीही गेल्या काही महिन्यांपासून ते विरोधकांसोबतच दिसत होते. त्यामुळे ते भाजपा सोडणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. ते आता निश्चित झालं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला जय श्रीराम करत काँग्रेसला हात दिला आहे.

केंद्रीय मंत्री असलेले रविशंकर प्रसाद यांना पटना साहिब येथून तिकिट देण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेस कडून शत्रुघ्न सिन्हा आणि भाजपाकडून रविशंकर प्रसाद अशी लढत या ठिकाणी होऊ शकते. ‘मोहब्बत करनेनाले कम न होंगे, शायद तेरी महफिल में लेकिन हम न होंगे’ असं ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं होतं. हा शेर ट्विट केल्यानंतर तर शत्रुघ्न सिन्हा भाजपा सोडणार हे निश्चितच मानलं जात होतं. तशी चर्चाही राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. आता त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ६ एप्रिलला याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे.