माजी मंत्री गणेश नाईक यांच्या ट्रस्टचे पावणे एमआयडीसीतील बावखलेश्वर मंदिर न्यायालयाच्या आदेशाने पाडण्यात आले. शिवसेनेनेच हे मंदिर पाडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्याबाबत पत्रकबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेने यावर आक्षेप घेतला असून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा हा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

शिवेसनेने म्हटले की, शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी मिलिंद सूर्यराव, दर्शन भणगे, दिलीप घोडेकर, सुमित्र कडू, समीर बागवान यांनी नेरूळ वाशी आणि सानपाडा या ठिकाणांहून ही पत्रके जप्त केली आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली असून पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन देवून कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे विजय नाहटा यांनी म्हटले आहे.

हे पत्रक वादग्रस्त असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. या पत्रकात उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र काढून मंदिरावर कारवाईला जबाबदार धरण्यात आले आहे. तर पत्रकाच्या मागील बाजुला टीकात्मक कविता प्रकाशित करण्यात आली आहे.

या पत्रकाचे वाटप राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. निवडणूक प्रचारात मंदिराच्या कारवाईचा मुद्दा घेवून भावनिक आवाहन करून चिथावणी दिली जात असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रचार संपण्यास अवघा काही तासांचा अवधी शिल्लक असताना मंदिराच्या मुद्द्यावर प्रचार करून राष्ट्रवादीने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ही पत्रके आम्ही छापली व वितरित केली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी स्पष्ट केले.