बारामती लोकसभा मतदारसंघातून आघाडीकडून उमेदवारी मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी प्रतिज्ञापत्रात जंगम 21 कोटी 26 लाख रुपये आणि स्थावर 18 कोटी 40 लाख अशी मालमत्ता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार करोडपती असणाऱ्या सुप्रिया सुळे यांचया नावावर एकही गाडी नाही आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे गाडी नसल्याचं कळल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा उमेदवार अर्ज बुधवारी भरण्यात आला. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमदेवार पार्थ पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार विश्वजीत कदम, काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

खासदारांच्या संपत्तीत 142 टक्क्यांची वाढ; शत्रुघ्न सिन्हा, सुप्रिया सुळे टॉपर

लोकसभा निवडणूक 2014 मध्ये पुन्हा निवडून आलेल्या 153 खासदारांच्या संपत्तीत तब्बल 142 टक्क्यांची वाढ झाली आहे. याचा अर्थ प्रत्येक खासदाराच्या संपत्तीत 13.32 कोटींची वाढ झाली आहे. खासदारांच्या या यादीत भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा पहिल्या, बीजू जनता दलाचच्या खासदार पिनाकी मिश्रा दुसऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्या क्रमांकासहित टॉपवर आहेत.

इलेक्शन वॉच अॅण्ड असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली आहे. यानुसार 153 खासदारांच्या संपत्तीत प्रत्येक वर्षी (2009 ते 2014) किमान 7.81 कोटींची वाढ झाली. एडीआरने 2014 मध्ये पुन्हा निवडून आलेल्या 153 खासदारांनी दिलेल्या आर्थिक माहितीची तुलना करुन पाहिली असता ही आकडेवारी समोर आली आहे.

पाहणीनुसार, 2009 मध्ये खासदारांची संपत्ती किमान 5.50 कोटी इतकी होती. ही संपत्ती दुपटीने वाढली असून 13.32 कोटी झाली आहे. पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीत सर्वात जलदगतीने वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यांच्या संपत्तीत 116.73 कोटींची वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांची संपत्ती 15 कोटी होती. हा आकडा 2014 मध्ये 131 कोटींवर पोहोचला.

बीजू जनता दलाच्या खासदार पिनाकी मिश्रा यांच्या संपत्तीत 107 कोटींची वाढ झाली. 2014 मध्ये त्यांची सपंत्ती 137 कोटी झाली. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा क्रमांक असून 2009 मध्ये त्यांची संपत्ती 51 कोटी होती, जी 2014 मध्ये 113 कोटी इतकी झाली.