योगी, आझम खान यांच्यावर तीन, तर मेनका आणि मायावतींवर दोन दिवसांची प्रचारबंदी

निवडणूक प्रचारात धार्मिक आणि जातीय आधारावर मतदारांना प्रभावित केल्यावरून निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ आणि सपचे आझम खान यांच्यावर तीन दिवसांची तर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती आणि भाजपच्या मेनका गांधी यांच्यावर दोन दिवसांची प्रचारबंदी घातली आहे.

मंगळवारी (१६ एप्रिल) सकाळी सहा वाजल्यापासून या नेत्यांना इलेक्ट्रॉनिक, मुद्रित वा ध्वनिमुद्रित अशा कोणत्याही माध्यमातून आपला प्रचार, जाहिरात करता येणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान १८ एप्रिल रोजी होणार असून प्रचार मंगळवारी संपेल. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यासाठीच्या या अखेरच्या महत्त्वाच्या दिवशी या नेत्यांना प्रचार करता येणार नाही.

विशेष म्हणजे मायावती आणि योगींनी धर्माच्या आधारावर मते मागूनही आयोगाने त्यांच्यावर तत्काळ ठोस कारवाई केली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने टीका केल्यानंतर आयोगाने कारवाई सुरू केली आहे.

आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल योगी आणि मायावती यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने कोणती कारवाई केली, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी यासंदर्भातील सुनावणीदरम्यान केली. नोटिशीला मायावतींनी उत्तर दिले नाही. त्यावर तुम्ही काय केले, असा सवाल न्यायालयाने निवडणूक आयोगाला केला होता.

देवबंद येथील प्रचारसभेत मायावती यांनी मुस्लीम मतदारांनी काँग्रेसला मत न देता सप-बसप आघाडीलाच द्यावे, असे आवाहन केले होते. मायावतींचे हे आवाहन दोन समाजात द्वेष निर्माण करणारे असल्याचे निवडणूक आयोगाने कारवाईच्या निवेदनात नमूद केले आहे. धर्माच्या वा जातीच्या आधारे मत मागणे हा आचारसंहितेचा भंग ठरतो. त्यामुळे मायावतींवर कारवाई करण्यात आली आहे. मतदारांना केलेले आवाहन बहुजन समाजासाठी होते. मुस्लीम समाज हा त्याचा हिस्सा असल्याचे स्पष्टीकरण मायावती यांनी आयोगाला दिले होते.

मेरठमधील सभेत योगींनी ‘अली आणि बजरंगबली’ अशी शेरेबाजी केली होती. अलीचा संबंध इस्लाम आणि बजरंगबलीचा संबंध हिंदू धर्माशी जोडून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न योगींनी केल्याची तक्रार आयोगाकडे करण्यात आली होती. योगींची ही शेरेबाजी अत्यंत प्रक्षोभक होती. राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने धर्मनिरपेक्ष व्यवहार करणे योगींचे कर्तव्य असल्याची कठोर टिप्पणी आयोगाने केली आहे. मायावती यांच्या मुस्लीम मतदारांना केलेल्या आवाहनाला प्रत्युत्तर म्हणून आपण ही शेरेबाजी केल्याचे योगींचे म्हणणे होते. पीलीभीत येथील सभेत गेल्या आठवडय़ात मेनका गांधी यांनी, मुस्लीम मतदारांनी मते दिली नाहीत, तर मी निवडून आल्यानंतर त्यांची कामे करणार नाही, अशी धमकी दिली होती.

आझम खान यांनी मात्र कोणतीही धार्मिक टीका केली नसली, तरी जयाप्रदा यांचे नाव न घेता त्यांच्यावर हीन पातळीवर टीका केली आहे.

योगी आदित्यनाथ, भाजप

बंदी : ३ दिवस

कारण : मेरठ येथील सभेत विरोधक अलीच्या बाजूने असतील, तर आम्ही बजरंग बलीच्या बाजूने आहोत, असे वक्तव्य केले होते.

आझम खान, समाजवादी पक्ष

बंदी : ३ दिवस

कारण : महिला अवमान.

रामपूर येथील सभेत जयाप्रदा यांचे नाव न घेता त्यांच्यावर हीन पातळीवरील टीका.

मेनका गांधी. भाजप

बंदी : २ दिवस

कारण : धार्मिक तेढ. पीलीभीत येथील सभेत, मते न दिल्यास कामे न करण्याची मुस्लीम समाजाला धमकी.

मायावती, बहुजन समाज पक्ष

बंदी : २ दिवस

कारण : धार्मिक आवाहन. मुस्लीम समाजाने मते वाया जाऊ देऊ नयेत आणि बसपला मते द्यावीत, असे आवाहन केले होते.