सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह काँग्रेसकडून जोरदार प्रचार केला जात आहे. अलीकडेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना विषारी सापाशी केली होती. आता मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना नालायक बेटा संबोधून, अशा मुलांमुळे घर कसं चालेल असा सवालही प्रियांक खरगे यांनी उपस्थित केला आहे.

कर्नाटकात गुलबर्गा येथे सोमवारी निवडणुकीचा प्रचार करताना प्रियांक खरगे यांनी मोदींवर टीका केली. “जर घरातील मुलगा नालायक असेल तर घर कसं चालेल?”, असं ते म्हणाले. प्रियांक खरगे बंजारा समाजातील एका रॅलीत संबोधित करत होते. “जेव्हा तुम्ही गुलबर्गा येथे आलात, तेव्हा तुम्ही बंजारा समाजातील लोकांना चिंता न करण्याचं आवाहन केलंत. तुम्ही बोललात की, दिल्लीत बनारसचा मुलगा बसला आहे. परंतु, मुलगा जर नालायक असेल तर घर कसं चालेल? पीएम मोदींनी स्वतःला बंजारा समाजाचा मुलगा संबोधल्याने आरक्षणाची समस्या निर्माण केली आहे”, असंही खरगे म्हणाले.

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्यांना विषारी समजा किंवा समजू नका. पण या विषामुळे तुम्ही मरुन जाल. मोदी हे काय चांगले व्यक्ती आहेत का? तर तसं अजिबात नाही. तुम्ही त्यांना चांगलं समजत असाल आणि त्यांच्या जवळ जाल तर अशी निद्रा निजाल की पुन्हा तुम्हाला जाग येणार नाही.”

हेही वाचा >> Karnataka Election: “…तर मला विषारी साप बनणं मंजूर”, पंतप्रधान मोदी यांचं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मल्लिकार्जुन खरगेंनी दिलं स्पष्टीकरण

मल्लिकार्जुन खरगेंवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “मी जे वक्तव्य केलं ते व्यक्तीगत नव्हतं. माझं म्हणणं होतं की मोदींची विचारधारा विषारी सापासारखी आहे. ही विचारधारा तुम्ही चाटायला गेलात तर तुमचा मृत्यू निश्चित आहे, असं मला म्हणायचं होतं”, असं स्पष्टीकरण आता खरगे यांनी दिलं आहे.