शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केला आहे. राऊत म्हणाले, “मोदी, शाह आणि फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूर लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी नागपुरातील कार्यकर्त्यांना रसद पुरवली होती.” राऊत यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. देशमुख यांनी राऊतांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. देशमुख म्हणाले, “गडकरींच्या पराभवासाठी देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना गडकरींविरोधात काम करण्याचे आदेश दिल्याची नागपूर भाजपात चर्चा आहे.”

अनिल देशमुख म्हणाले, “संपूर्ण नागपूरला माहिती आहे की नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील लोकांनी काम केलं आहे. नागपुरात याचीच चर्चा आहे. तुम्ही (प्रसारमाध्यमांनी) हवं तर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना जाऊन विचारावं की त्यांनी या निवडणुकीत नेमकं कोणतं काम केलं होतं?”

खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ या ठाकरे गटाच्या मुखपत्रातील रोखठोक या स्तंभात म्हटलं आहे की, “नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्रितपणे प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही हे लक्षात आल्यावर फडणवीस नाईलाजाने नागपुरात गडकरींच्या प्रचारात उतरले. नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी फडणवीस यांनी सर्व प्रकारची रसद पुरवल्याची चर्चा संघ परिवारही करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक याबाबत उघडपणे बोलत आहेत.” यावर अनिल देशमुख म्हणाले, “राऊत म्हणतायत ती गोष्ट शंभर टक्के खरी आहे.”

शरद पवार गटातील आमदार म्हणाले, “नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने मतदारसंघात खूप काम केलं. परंतु, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमच्यापेक्षा दोन पावलं पुढे जाऊन काम केलं आहे. फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी गडकरींना पराभूत करण्यासाठी काम केलं आहे. एका अर्थाने फडणवीसांमार्फत त्यांच्या कार्यकर्त्यांना रसद पुरवण्यात आली, जेणेकरून गडकरी या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले पाहिजेत.”

हे ही वाचा >> “सपाचा कायदा-सुव्यवस्थेशी ३६ चा आकडा, त्यांनी दहशतवाद्यांना…”, मिर्झापूरमधून पंतप्रधान मोदींचा टोला

राऊतांनी बडबड करू नये : काँग्रेस नेते विकास ठाकरे

दरम्यान, संजय राऊत यांच्या या दाव्यानंतर नागपूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (काँग्रेस) उमेदवार विकास ठाकरे यांनी म्हटलं आहे की “संजय राऊत यांनी वायफळ बडबड करू नये. आम्ही आमच्या ताकदीवर ही निवडणूक लढलो आहोत. आम्हाला कोणीही मदत केली नाही.” विकास ठाकरे यांच्या या वक्तव्यावरही अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशमुख म्हणाले, “आम्ही (राष्ट्रवादीचा शरद पवार गट), काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट मिळून एकत्रितपणे ही निवडणूक लढलो आहोत. आम्ही आमच्या ताकदीवर ही निवडणूक जिंकणार आहोत. त्यात भाजपाकडूनही भर पडली असेल तर आम्ही त्यामुळे आनंदी आहोत.”