लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी पार पडणार आहे. महायुतीचे काही मतदारसंघातील उमेदवार अद्याप घोषित झाले नाहीत. उद्या यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसने आज देशातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे आता भाजपाचे पीयूष गोयल आणि भूषण पाटील यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज हरियाणामधील गुडगाववमध्ये राज बाबर, हिमाचर प्रदेशच्या कांगड़ा लोकसभेसाठी आनंद शर्मा, हिमाचर प्रदेश हमीरपुरमधून सतपाल रायजादा आणि महाराष्ट्रातील उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यासंदर्भातील माहिती काँग्रेसच्यावतीने ट्विटरवरुन देण्यात आली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीचे नेते आणि महायुतीच्या नेत्यांनी सध्या सभा आणि मेळाव्यांचा धडाका लावला आहे. या निवडणुकीत आपल्याच पक्षांचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी महायुती आणि आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.