कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या विराजमान होणार आहेत तर डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होणार आहेत यावर आत्ता शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा पेच सोडवणं काँग्रेससाठी सोपं नव्हतं. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु होती. माझ्यासोबत १३६ आमदार आहेत असं डीके शिवकुमार यांनी ठणकावून सांगितलं होतं. तसंच राहुल गांधींना भेटल्यानंतरही ते उपमुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते असंही सांगतिलं जातं आहे. अशात सोनिया गांधींनी शिष्टाई केली आणि डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास सहमती दर्शवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकचे मुख्यमंत्री नेमके कोण होणार यावर तीन दिवस बराच खल चालला. चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र सिद्धरामय्या की डीके शिवकुमार कुणाचं नाव फायनल करायचं? यावर एकमत होत नव्हतं. शेवटी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनी एक फोन फिरवून डीके शिवकुमार यांच्याशी चर्चा केली आणि निर्णय झाला. सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर डीके शिवकुमार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री होण्यास तयार झाले. काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

डीके शिवकुमार मुख्यमंत्रीपद हवं म्हणून अडून बसले होते

डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदावर अडून बसले होते. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी बुधवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली. तसंच राहुल गांधी आणि के.सी वेणुगोपाल यांचीही या दोन्ही नेत्यांनी भेट घेतली होती. आपली बाजू या दोन्ही नेत्यांनी आपल्या परिने मांडली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी बुधवारी रात्री उशिरा डीके शिवकुमार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री होण्यासाठी तयार झाले. आता शनिवारी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांचा शपथविधी होणार आहे.

डीके शिवकुमार यांनी मागच्या चार वर्षांपासून कर्नाटकात जी कामं केली त्याचा हवाला देत मुख्यमंत्रीपद मलाच हवं हे सांगत होते. मात्र शिवकुमार यांनी हेदेखील स्पष्ट केलं होतं की आपण पक्षाला ब्लॅकमेल करणार नाही. काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांनी माझ्यावर कर्नाटक जिंकून आणा अशी जबाबदारी टाकली होती. ती पण मी पूर्ण केली आहे असंही शिवकुमार यांचं म्हणणं होतं. मात्र सोनिया गांधी यांचा एक फोन आला आणि शिवकुमार हे उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader sonia gandhi has big role in dk shivkumar accepting deputy cm post of karnataka do you know what is it scj
First published on: 18-05-2023 at 15:37 IST