Candidate’s First List of Congress : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्या असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे उमेदवारांची यादीही समोर आलेली नाही. जागा वाटप आणि उमेदवारांबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरू आहेत. त्यातच, काँग्रेसची पहिली यादीही व्हायरल होत आहे. याबाबत काँग्रेसने आता स्पष्टीकरण दिलंय.

“भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने अजून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची कोणतीही यादी अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. लवकरच योग्य त्या माध्यमांद्वारे आम्ही ती यादी जाहीर करू”, असं महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महाविकास आघाडीची १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून, २८८ पैकी २५०पेक्षा अधिक जागांचा तिढा सुटला आहे. अद्यापही २५ ते ३० जागांवर पक्षांनी सहमती होऊ शकलेली नाही. जागावाटपात काँग्रेस आणि शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पक्षाच्या वाट्याला प्रत्येकी १००च्या आसपास, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला ७५ ते ८० जागा येतील, असे सांगण्यात आले.

हेही वाचा >> ‘मविआ’चे जागावाटप अंतिम टप्प्यात; २५ ते ३० जागांचा तिढा कायम; आज पुन्हा बैठक

महाविकास आघाडीच्या नेत्यांची शुक्रवारी पुन्हा बैठक होणार आहे. बैठकीला शिवसेना नेते (ठाकरे) खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आणि इतर नेते उपस्थित होते. आतापर्यंत २५० वर जागांवर एकमत झाले असून उर्वरित जागांचा तिढाही लवकरच सुटेल असे सांगण्यात आले. आघाडीच्या प्रत्येक मित्रपक्षाकडून किमान १२ जागांचा आग्रह धरण्यात आला आहे. त्यामुळे या मित्रपक्षांना कोणत्या जागा द्यायचा याचा तिढा सोडवूनच पुढील जागा निश्चित केल्या जाणार आहे.

काँग्रेसची पहिली यादी २० ऑक्टोबरपर्यंत येणार

महाविकास आघाडीचे जागावाटप उद्या शुक्रवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता विजय वडेट्टीवार यांनी वर्तविली. काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबरला येण्याची अपेक्षा आहे. काँग्रेसच्या वाट्याला आतापर्यंत ८४ जागा आल्या आहेत. २० तारखेला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्याचदिवशी उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते, असे वडेट्टीवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

7